घरमहाराष्ट्रपाणी टंचाईमुळे शेतकऱ्याने केली आत्महत्या

पाणी टंचाईमुळे शेतकऱ्याने केली आत्महत्या

Subscribe

निळवंडे लाभक्षेत्रात येणाऱ्या राहाता तालुक्यातील केलवड येथील विठोबा धोंडिबा वैद्य (६०) या शेतकऱ्याने पाणी मिळत नसल्याने आत्महत्या केली आहे. वैद्य यांनी आत्महत्या करण्यापूर्वी विहिरीजवळ प्लॅस्टिकच्या पिशवीत ठेवलेली ‘सुसाईड नोट’ आढळून आली आहे.

निळवंडे लाभक्षेत्रात येणाऱ्या राहाता तालुक्यातील केलवड येथील विठोबा धोंडिबा वैद्य (६०) या शेतकऱ्याने निळवंडे धरणातील पाणी मिळत नसल्याने व कालव्याच्या कामात येणाऱ्या राजकीय हस्तक्षेपाला कंटाळून विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना आज, सोमवारी सकाळी उघडकीस आली. वैद्य यांनी आत्महत्या करण्यापूर्वी विहिरीजवळ प्लॅस्टिकच्या पिशवीत ठेवलेली ‘सुसाईड नोट’ आढळून आली आहे. त्यात ४८ वर्षे प्रतीक्षा करूनदेखील केवळ राजकीय हस्तक्षेपामुळे निळवंडेच्या पाण्याचा लाभ मिळत नसल्याचे म्हटले आहे. स्थानिक आमदारासह शासकीय यंत्रणा राहाता परिसरासाठी पाणी देण्यात अडचणी निर्माण करीत असल्याचा आरोप वैद्य यांनी केला असल्याने खळबळ उडाली आहे.

१८२ गावांमध्ये उद्या बंद ठेवण्याचे आवाहन

वैद्य यांचे पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, असा परिवार आहे. दरम्यान, या घटनेचा निळवंडे कालवा कृती समितीने तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला असून समितीने निळवंडेच्या लाभक्षेत्रातील १८२ गावांमध्ये उद्या बंद ठेवण्याचे आवाहन केले आहे. याप्रकरणी राहता पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून सुसाईड नोट बाबतचा उल्लेख टाळण्यात आल्याने संशय व्यक्त करण्यात येत आहे.

- Advertisement -

नेत्यांमुळे कामाला लागला ब्रेक

जलसंपदा विभागाकडे निळवंडे कालव्यासाठी २३५ कोटींचा निधी पडून असला तरी उत्तर नगर जिल्ह्यातील राजकीय नेत्यांच्या नकारात्मक भूमिकेमुळे नगर व नाशिक जिल्ह्यातील सीमावर्ती भागासाठी वरदान ठरणाऱ्या निळवंडे धरणाच्या पाण्याचा लाभ मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोष पसरला आहे. निळवंडेच्या पाण्यामुळे नगरमधील जवळपास १८२ व नाशिकमधील ६ गावांचा दुष्काळ हटण्यास मदत होणार आहे. मात्र स्थानिक राजकारणात अग्रेसर असणाऱ्या काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमुळे या कामाला ब्रेक लागला आहे.

पुढाऱ्यांविषयी कमालीची चीड

कासारे, पाणोडी, कनगर, धनगरवाडी, निळवंडे(संगमनेर) आदी गावांनी निळवंडे कालवा कृती समितीच्या जनजागृती सभांनंतर गावबंदीचे ठराव करूनही या नेत्यांना फरक पडलेला नाही. त्यामुळे वर्षानुवर्षे दुष्काळी परिस्थितीला सामोरे जाणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये पुढाऱ्यांविषयी कमालीची चीड निर्माण झाली आहे.याचे पडसाद आता उमटू लागले असून केलवड येथील विठोबा वैद्य या शेतकऱ्याने धरणातून निघणाऱ्या मुख्य कालव्याचे अकोले तालुक्यातील काम सुरु होत नसल्यानेच आत्महत्या केली असल्याचे बोलले जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -