घरताज्या घडामोडीराज्यसभेच्या निवडणुकीसाठी बुधवारी शरद पवार आणि फौजिया खान अर्ज भरणार

राज्यसभेच्या निवडणुकीसाठी बुधवारी शरद पवार आणि फौजिया खान अर्ज भरणार

Subscribe

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे बुधवारी राज्यसभा निवडणुकीचा अर्ज दाखल करणार आहेत. त्यांच्यासोबत पक्षाच्या दुसऱ्या उमेदवार म्हणून फौजिया खान याही अर्ज भरणार आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे बुधवारी राज्यसभा निवडणुकीचा अर्ज दाखल करणार आहेत. त्यांच्यासोबत पक्षाच्या दुसऱ्या उमेदवार म्हणून फौजिया खान याही अर्ज भरणार आहेत. राज्यसभेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी येत्या २६ मार्च रोजी निवडणूक होऊ घातली आहे. या निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत १३ मार्च रोजी संपत आहे. यापार्श्वभूमीवर शरद पवार आणि फौजिया खान बुधवारी दुपारी २ वाजता विधानभवनात अर्ज दाखल करतील, अशी माहिती राष्ट्रवादीच्या सूत्रांनी दिली.

राज्यातील महाराष्ट्र विकास आघाडीने राज्यसभेची निवडणूक एकत्र लढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार राष्ट्रवादी दोन, तर काँग्रेस आणि शिवसेना प्रत्येक एक जागा लढविणार आहे. मात्र, काँग्रेस आणि शिवसेनेने उमेदवाराबाबत अजून निर्णय घेतलेला नाही. काँग्रेसमध्ये प्रभारी मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह राजीव सातव, रजनी पाटील, अविनाश पांडे, संजय दत्त, सुशीलकुमार शिंदे आदींच्या नावाची चर्चा आहे. तर शिवसेनेत प्रियांका चतुर्वेदी, चंद्रकांत खैरे, अनंत गीते यांची नावे चर्चेत आहेत. दरम्यान, भाजपने राज्यसभेसाठी रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले आणि माजी खासदार उदयनराजे भोसले यांची नावे निश्चित केल्याचे बोलले जाते. तिसऱ्या जागेसाठी माजी मंत्री एकनाथ खडसे, राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा विजया रहाटकर यांची नावे चर्चेत आहेत.

- Advertisement -

बुधवारी राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक

मध्यप्रदेशातील घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने बुधवारी पक्षाच्या आमदारांची बैठक बोलावली आहे. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये संध्याकाळी सात वाजता होणाऱ्या बैठकीला शरद पवार उपस्थित राहणार आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -