घरमहाराष्ट्रछत्रपती संभाजीनगरात २ गटात राडा

छत्रपती संभाजीनगरात २ गटात राडा

Subscribe

दगडफेकीसह १५ वाहनांची जाळपोळ,  ५०० जणांवर दंगलीचा गुन्हा दाखल, पोलिसांच्या गोळीबारात एक जण गंभीर जखमी

रामनवमीच्या पार्श्वभूमीवर किराडपुरा भागातील राम मंदिरात तयारीसाठी जमलेल्या तरुणांच्या एका गटाचा दुसर्‍या गटाशी बुधवारी रात्री वाद झाला. हा वाद टिपेला पोहचताच दोन्ही गटांकडून एकमेकांवर तुफान दगडफेक करण्यात आली. अनियंत्रित झालेल्या या जमावाने पोलिसांसह इतर १५ वाहनांना लक्ष्य करून जाळपोळही केली. जमावावर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. तसेच जमावाला पांगवण्यासाठी सौम्य लाठीमारही करावा लागला, तर पोलिसांच्या गोळीबारात एक जण गंभीर जखमी झाला आहे.

रात्री ११.३० वाजता सुरू झालेला हा हिंसाचार पहाटे ३.३० वाजेपर्यंत पोलिसांनी नियंत्रणात आणला. सध्या शहरात तणावपूर्ण शांतता असून ३ हजार ५०० पोलिसांचा बंदोबस्त शहरात तैनात करण्यात आला आहे. या राडा प्रकरणात पोलिसांनी जिनसी पोलीस ठाण्यात ४०० ते ५०० जणांवर गुन्हा दाखल केला आहे, तर एकाला ताब्यात घेतल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. या राड्यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.

- Advertisement -

शहरतील मिश्र वस्तीत असलेल्या किराडपुर्‍यात रामनवमीची तयारी सुरू असताना रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास तरुणांचा एक गट परिसरातील धार्मिक स्थळाच्या दिशेने जात होता. त्याच वेळी तेथे मंदिराबाहेर आधीपासून उपस्थित असलेला गट आणि तेथून जाणार्‍या गटात बाचाबाची झाली. त्यातून वाद वाढल्याने शिवीगाळ आणि पुढे थेट दोन्ही बाजूंनी घोषणाबाजी सुरू झाली. काही क्षणातच एका गटाने दगडफेक सुरू केली. जीव वाचवण्यासाठी काही जण परिसरातील मंदिरात घुसले. त्यानंतर अनियंत्रित झालेल्या जमावाने जाळपोळ सुरू केली.

परिसरातील पोलिसांच्या वाहनांसह इतर वाहनेही दंगेखोरांनी जाळली. जमाव नियंत्रणात आणण्यासाठी काही धर्मगुरूंना बोलावण्यात आले, पण दंगेखोरांनी त्यांचेही ऐकले नाही. काही वेळात वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांसह मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. दंगेखोरांनी त्यांच्यावरही दगडफेक करून गाडीच्या काचा फोडल्या. अखेर पोलिसांनी लाठीचार्ज आणि अश्रूधुराच्या नळकांड्या फोडून जमावाला नियंत्रित केले.

- Advertisement -

शहरात शांतता, ३,५०० पोलिसांचा चोख बंदोबस्त
शासकीय मालमत्तेचे नुकसान करणे, दंगा भडकवणे, पोलिसांवर हल्ला करणे या कलमांतर्गत दंगेखोरांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी पोलिसांची ८ ते १० पथके तयार करण्यात आली आहेत. शहरातील वेगवेगळ्या भागात ३,५०० पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. शहरात शांततापूर्ण स्थिती आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन छत्रपती संभाजीनगरचे पोलीस आयुक्त निखिल गुप्ता यांनी केले आहे.

छत्रपती संभाजीनगरमधील परिस्थिती नियंत्रणात आहे. आपण सगळ्यांनी शांतता राखली पाहिजे. रामनवमीचा उत्सव आहे. आपल्या राज्यात सर्वधर्मीय सर्व सण एकत्र येऊन साजरे करतात. सर्वधर्मीयांना माझे आवाहन आणि विनंती आहे की रमजान आहे, रामनवमी आहे. इतकी वर्षे आपण सगळे जण सर्व सण गुण्यागोविंदाने साजरे करीत असतो. सर्वांनीच शांततेने उत्सवांना सहकार्य केले पाहिजे. राज्यातील कायदा-सुव्यवस्था अबाधित राहील यासाठी सहकार्य केले पाहिजे.
-एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

संभाजीनगरमध्ये रात्री जो तणाव निर्माण झाला होता तो आता शांत झाला आहे. भडकविणारे वक्तव्य करून परिस्थिती चिघळवण्याचा काही लोकांचा प्रयत्न आहे, मात्र अशा वेळी राजकीय नेत्यांनी कसे वागावे हे समजून घेण्याची आवश्यकता आहे. चुकीची वक्तव्ये करू नयेत. शहर शांत ठेवण्याची जबाबदारी सर्वांची असते. राजकीय रंग देण्याचा प्रयत्न कोणी करीत असेल, तर ते चुकीचे आहे. अशा प्रकारची वक्तव्ये करणे हे किती छोट्या बुद्धीने बोलले जाते याचा परिचय देणारे आहे. आता संभाजीनगरमध्ये शांतता आहे. हीच शांतता कायम राखली पाहिजे असा प्रयत्न सगळ्यांनी केला पाहिजे.

सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकार नपुंसक आहे, असे कुठलेही निरीक्षण नोंदविलेले नाही. उलट महाराष्ट्र सरकारने काय कारवाई केली हे पाहून राज्य सरकारविरोधात कोणतीही कारवाई केलेली नाही. आता त्याचा संदर्भ घेऊन जे बोलत आहेत त्यांना न्यायालय काय बोलते हे समजत नाही.
-देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

गुजरातच्या वडोदर्‍यात शोभायात्रेवर दगडफेक
गुजरातमधील वडोदरा शहरात रामनवमीनिमित्त काढलेली शोभायात्रा फतेहपूर रोड परिसरातून जात असताना या शोभायात्रेवर अचानक काही समाजकंटकांनी दगडफेक केली. या दगडफेकीमुळे काही दुचाकींचे नुकसान झाले. दगडफेकीनंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहचून संपूर्ण परिसराची नाकाबंदी केली. दगडफेक करणार्‍यांची ओळख पटवण्यासाठी पोलीस घटनास्थळी बसवलेले सीसीटीव्ही कॅमेरे स्कॅन करीत आहेत. असाच प्रकार भुतली झांपा परिसरातील मशिदीसमोरदेखील झाल्याचे म्हटले जाते.

हावडा येथील मिरवणुकीत दगडफेक, जाळपोळ
कोलकातातील हावडा येथे रामनवमीनिमित्त काढलेल्या मिरवणुकीवरदेखील काही समाजकंटकांकडून दगडफेक करण्यात आली. येथील शिवपुरी येथे संध्याकाळच्या सुमारास ही घटना घडली. विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांच्याकडून ही मिरवणूक काढण्यात आली होती. या घटनेत वाहनांचीदेखील जाळपोळ करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

राज्यातील भाजपप्रणित शिंदे सरकारच्या ९ महिन्यांतील कारभाराने महाराष्ट्राच्या प्रतिमेला मोठा धक्का बसला आहे. काही संघटनांच्या भडकाऊ भाषणांनी राज्यात धार्मिक वाद वाढत आहे, पण शिंदे-फडणवीस सरकार त्यावर काहीच कारवाई करीत नाही. सर्वोच्च न्यायालयाने तर महाराष्ट्र सरकार नपुंसक आहे. ते काहीच करीत नाही म्हणून धार्मिक वाद विकोपाला जात आहेत, असा संताप व्यक्त केला आहे. शिंदे सरकारला ही मोठी चपराक असून सत्तेवर राहण्याचा त्यांना अधिकार राहिलेला नाही. त्यामुळे त्यांनी तात्काळ राजीनामा दिला पाहिजे.
– नाना पटोले, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -