घरमहाराष्ट्रमुंबई-गोवा महामार्गाचे काम डिसेंबर अखेर पूर्ण करणार

मुंबई-गोवा महामार्गाचे काम डिसेंबर अखेर पूर्ण करणार

Subscribe

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींचे आश्वासन

मुंबई-गोवा (राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६) महामार्गाचे काम डिसेंबर २०२३ अखेरपर्यंत पूर्ण होऊन जानेवारी २०२४ मध्ये रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे खुला होईल. यामुळे महाराष्ट्रातील कोकण विभागाच्या विकासाला मोठी चालना मिळेल, असे आश्वासन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिले. नितीन गडकरी यांनी गुरुवारी मुंबई-गोवा या राष्ट्रीय महामार्गाच्या कामाची हवाई पाहणी केली. त्यानंतर जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट बंदराला दिल्लीशी जोडणार्‍या मार्गासह १५ हजार कोटी रुपयांच्या नवीन ३ प्रकल्पांचा भूमिपूजन सोहळा नितीन गडकरी यांच्या हस्ते तालुक्यातील खारपाडा टोल प्लाझाजवळ पार पडला. यावेळी त्यांनी उपस्थितांना संबोधित केले.

यावेळी नितीन गडकरी म्हणाले की, भूसंपादन, परवानग्या, कंत्राटदारांच्या अडचणी यांसारख्या समस्यांमुळे कोकण विभागातील अनेक कामांना अनंत अडचणी येत होत्या, मात्र आता केंद्र सरकारच्या केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने ही जबाबदारी स्वीकारली आहे. यावेळी त्यांनी १३ हजार कोटी रुपयांच्या मोरबे-करंजाडे रस्त्याच्या बांधकामाची घोषणा केली, जो जवाहरलाल नेहरू बंदरातून जाईल आणि मुंबई ते दिल्ली अंतर कापण्यासाठी लागणारा वेळ १२ तासांपर्यंत कमी करेल. १२०० कोटी रुपयांच्या कळंबोली जंक्शन आणि १ हजार १४६ कोटी रुपयांच्या पागोटे जंक्शनचे कामही लवकरच सुरू होईल, असेही त्यांनी सांगितले.

- Advertisement -

नितीन गडकरी म्हणाले की, मुंबई-गोवा महामार्ग महाराष्ट्राच्या कोकणातील ६६ पर्यटनस्थळांना स्पर्श करतो. त्यातून विकासाला मोठी चालना मिळेल. या महामार्गाचे काम पूर्ण होण्याने कोकणातील फळे आणि इतर उत्पादनांची जलद वाहतूकदेखील होईल. त्यातून व्यवसायास चालना मिळेल. रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने या कामासंबंधी २०११ मध्ये बांधकामासाठी दोन स्ट्रेच देण्यात आलेल्या संबंधित कंत्राटदारांना या कामातील दिरंगाईसाठी जबाबदार धरले. आता सर्व प्रकरणे निकाली निघाली आहेत. आता महामार्गाचे ११ टप्प्यांत बांधकाम व रुंदीकरण करण्यात येणार आहे. जेएनपीटी आणि दिघी बंदर यांना जोडणारा महामार्ग देशाच्या प्रगतीला निश्चित हातभार लावेल, असा विश्वास व्यक्त करून त्यांनी राज्य सरकारांना ६ ते ८ इंच टॉपिंग असलेले रस्ते बनविण्यास प्राधान्य देण्यास सांगितले, जेणेकरून हे रस्ते किमान ५० वर्षे टिकतील तसेच दुरुस्तीसाठी कमी खर्च येईल.

भारतात वर्षाला ५ लाख रस्ते अपघात होतात, ज्यापैकी दीड लाख गंभीर असतात. त्यापैकी बरेच जण १८ ते ३४ वयोगटातील मृत पावतात. अपघातांना आळा घालण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले पाहिजेत, असेही केंद्रीय मंत्री गडकरी म्हणाले.

- Advertisement -

९० टक्क्यांहून अधिक कामे पूर्ण
मुंबई-गोवा महामार्गाच्या कामाविषयी माहिती देताना गडकरी यांनी सांगितले की, या प्रकल्पाची एकूण १० पॅकेजेसमध्ये विभागणी करण्यात आली आहे. यापैकी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील २ पॅकेजेसचे (पी-९, पी-१०) जवळपास ९९ टक्के काम पूर्ण झाले आहे. रत्नागिरी जिल्ह्यात एकूण ५ पॅकेजेस असून यापैकी २ पॅकेजेसचे (पी-४, पी-८) अनुक्रमे ९२ टक्के व ९८ टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित काम प्रगतिपथावर आहे. २ पॅकेजेससाठी (पी-६, पी-७) नवीन कंत्राटदाराची नेमणूक करून बंद पडलेली कामे पुन्हा सुरू करण्यात आली आहेत. रायगड जिल्ह्यातील ३ पॅकेजेसपैकी २ पॅकेजेसचे (पी-२, पी-३) अनुक्रमे ९३ टक्के व ८२ टक्के काम पूर्ण झाले आहे.

३ प्रकल्पांचे भूमिपूजन
नितीन गडकरी यांनी गुरुवारी १५ हजार कोटी रुपयांच्या नवीन ३ प्रकल्पांची घोषणा केली. यामध्ये कळंबोली जंक्शन हा १२०० कोटी रुपयांचा प्रकल्प, पागोडे जंक्शन चौक ते ग्रीनफील्ड महामार्ग हा १२०० कोटी रुपयांचा प्रकल्प आणि मोर्बे-करंजाडे हा जेएनपीटीवरून जाणारा १३,००० कोटी रुपयांचा दिल्लीला जोडणारा महामार्ग यांचा समावेश आहे. या प्रकल्पांच्या कामांना लवकरच सुरुवात होईल. तत्पूर्वी रायगड जिल्ह्यातील पळस्पे गावात ४१४.६८ कोटी रुपये किमतीच्या आणि ६३.९०० किमी लांबीच्या ३ राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचे नितीन गडकरी यांच्या हस्ते भूमिपूजन झाले. या प्रकल्पांमुळे जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट आणि दिघी या दोन बंदरांवर आर्थिक गतिमानतेला चालना मिळेल, तर पनवेल ते कासू या महामार्गाच्या काँक्रीटीकरणामुळे प्रवास गतिमान होईल आणि इंधनाची बचत होईल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -