घरसंपादकीयदिन विशेषनाटककार अण्णासाहेब किर्लोस्कर

नाटककार अण्णासाहेब किर्लोस्कर

Subscribe

बळवंत पांडुरंग किर्लोस्कर उर्फ अण्णासाहेब किर्लोस्कर हे मराठीतील पहिले श्रेष्ठ संगीत नाटककार होते. त्यांचा जन्म ३१ मार्च १८४३ रोजी धारवाडमधील गुर्लहोसूर याठिकाणी झाला. कानडी व मराठी भाषेचा अभ्यास त्यांनी घरीच केला. नंतर कोल्हापूर व धारवाड येथे शिक्षणासाठी राहून मुलकी परीक्षेपर्यंत ते शिकले. त्यापुढील शिक्षणासाठी पुण्यास असताना त्यांना नाटकांची आवड निर्माण झाली. ते नाटक मंडळ्यांना पदे रचून देऊ लागले. त्यानंतर शिक्षक, जमादार आणि महसूल आयुक्तांच्या कचेरीतील कर्मचारी अशा विविध प्रकारच्या नोकर्‍या त्यांनी केल्या.

पुणे येथे १८८० मध्ये एका पारशी नाटक मंडळीचे ऑपेराच्या धर्तीवरील एक नाटक त्यांच्या पाहण्यात आले. तसे नाटक मराठीत करून दाखविण्याची इच्छा त्यांना होऊन त्यांनी कालिदासाच्या ‘अभिज्ञानशाकुंतल’ या नाटकाचे भाषांतर केले. त्यामध्ये स्वतःची पदेही घातली आणि उत्तम नटसंच मिळवून ते रंगभूमीवर आणले (१८८०). या नाटकास लाभलेले अपूर्व यश आणि लोकप्रियता पाहून १८८० मध्ये ‘किर्लोस्कर नाटक मंडळी’ ची त्यांनी स्थापना केली.

- Advertisement -

त्यानंतर सुभद्राहरणावरील ‘संगीत सौभद्र’ हे नाटक स्वतंत्रपणे त्यांनी लिहिले (१८८२). जुन्या विष्णुदासी नाटकांतील सूत्रधार, विदूषक, गणपती व सरस्वती यांच्या अनुक्रमाने होणार्‍या प्रवेशाची परंपरा सोडून देऊन संस्कृत नाटकातील सूत्रधार, परिपार्श्वक व नटी यांच्या संवादांनी नाटकांची प्रस्तावना करण्याची त्यांनी प्रथा पाडली. अण्णासाहेबांनी काव्यरचनाही बरीच केली आहे. पौराणिक नाटक मंडळ्या व कीर्तनकार यांना त्यांनी आख्याने रचून दिली. अशा या ख्यातकीर्त संगीत नाटककाराचे २ नोव्हेंबर १८८५ रोजी निधन झाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -