घरमहाराष्ट्रसरकारी सूचनांचे पालन करा; शरद पवार यांचे जनतेला आवाहन

सरकारी सूचनांचे पालन करा; शरद पवार यांचे जनतेला आवाहन

Subscribe

कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी राज्यातील जनतेने सहकार्य करावे आणि सरकारने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे,असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी पत्राद्वारे केले. राज्यात निर्माण झालेल्या अभूतपूर्व संकटातून जनतेला बाहेर काढण्यासाठी स्थानिक स्तरावर झोकून देऊन काम करा, आवाहनही पवार यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना केले आहे.

कोरोना या जागतिक साथीची दुसरी लाट संपूर्ण राज्यात पसरली आहे. दिवसेंदिवस रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत असून परिस्थिती अत्यंत चिंताजनक झाली आहे. राज्य सरकार, पोलीस आणि प्रशासकीय यंत्रणा परिस्थितीवर लक्ष ठेवून असून राज्यातील आरोग्य यंत्रणेचे डॉक्टर्स, परिचारिका आणि संलग्न कर्मचारी रुग्णांना दिलासा देण्यासाठी अहोरात्र झटत आहेत. या संकटावर मात करण्यासाठी जनतेच्या सहकार्याची अत्यंत आवश्यकता आहे, असे पवार यांनी पत्रात म्हटले आहे.

- Advertisement -

जनतेने वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांच्या सल्ल्याने निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे तंतोतंत पालन करावे. गर्दी टाळणे, सामाजिक अंतर राखणे, मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करणे, स्वच्छता राखणे वगैरे सूचना कसोशीने पाळाव्यात. सभासमारंभ अथवा कोणतेही गर्दीचे कार्यक्रम टाळावेत,असे आवाहन शरद पवार यांनी केले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिम राबवण्यावर विशेष भर द्यावा. त्याचप्रमाणे राज्यात रक्ताचा तुटवडा मोठ्या प्रमाणावर निर्माण झाला आहे. त्यासाठी रक्तदान शिबीरांचे आयोजन करुन हिरिरीने भाग घ्यावा, अशी सूचनाही पवार यांनी केली आहे.

- Advertisement -

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -