घरमहाराष्ट्रचिपळूणच्या स्वच्छतेसाठी दोन कोटींचा निधी

चिपळूणच्या स्वच्छतेसाठी दोन कोटींचा निधी

Subscribe

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा,चिपळूणला सावरण्यासाठी पाच मुख्याधिकारी दर्जाच्या अधिकार्‍यांची तातडीने नियुक्ती

चिपळूण शहरात झालेल्या जलप्रलयानंतर शहर स्वच्छ करण्यासाठी तातडीची मदत म्हणून दोन कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी चिपळूणमध्ये केली. याशिवाय चिपळूणला पुन्हा उभे करण्यासाठी पाच मुख्याधिकारी दर्जाच्या अधिकार्‍यांची तातडीने नियुक्ती केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.

एकनाथ शिंदे यांनी आज पुरातून सावरत असलेल्या चिपळूण शहराला आणि बाजारपेठेला भेट दिली. त्यावेळी बोलताना त्यांनी वरील घोषणा केली. गेल्या आठवड्यात कोकणात झालेल्या अतिवृष्टीचा सगळ्यात मोठा फटका हा चिपळूण शहराला बसला होता. शहरातील अनेक भागांत २० फुटांपर्यंत पाणी वाढल्याने या पुरात अतोनात नुकसान झाले.

- Advertisement -

शहरात सगळीकडे खराब झालेल्या वस्तू आणि चिखलामुळे दुर्गंधी पसरू लागली आहे. त्यामुळे रोगराई पसरू नये म्हणून शहर स्वच्छ करण्याला प्राधान्य असल्याने त्यासाठी हा २ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. याशिवाय शहरातील स्वच्छता कार्याला वेग आणण्यासाठी मुख्याधिकारी दर्जाचे पाच अधिकारी तातडीने नियुक्त करण्यात येणार असल्याचे शिंदे यांनी जाहीर केले.

शहरात ठिकठिकाणी साचलेले कचर्‍याचे ढीग हटवण्यासाठी साधने आणि मनुष्यबळ देखील गरजेचे आहे. ही गरज पूर्ण करण्यासाठी ठाणे आणि नवी मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी त्यांच्या स्वच्छता साधनसामग्रीसह पाठवू, असेही शिंदे यांनी जाहीर केले. यावेळी रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत, चिपळूणचे आमदार भास्कर जाधव, माजी आमदार सदानंद चव्हाण आदी उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -