Eco friendly bappa Competition
घर उत्तर महाराष्ट्र नाशिकसाठी गिरीश महाजन तर दादा भुसेंकडे धुळे अन् छगन भुजबळांकडे अमरावतीची जबाबदारी

नाशिकसाठी गिरीश महाजन तर दादा भुसेंकडे धुळे अन् छगन भुजबळांकडे अमरावतीची जबाबदारी

Subscribe

नाशिक : नाशिकचे पालकमंत्रीपद दादा भुसेंकडे असतानाही स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण मात्र धुळ्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते होणार आहे. या बदलामागे भाजपची काही नवी खेळी तर नाही, अशी चर्चाही राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. तसेच पालकमंत्री पदाच्या रेसमध्ये असलेल्या छगन भुजबळ यांना थेट अमरावती येथील ध्वजरोहणाची जबाबदारी देण्यात आली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वात एक गट सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर पालकमंत्री बदलाच्याही चर्चांना उधाण आले. अजित पवार गटाने पुण्यासह नाशिकच्या पालकमंत्री पदावर दावा केल्याची चर्चा आहे. त्यानुसार राष्ट्रवादीचे नेते तथा पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे नाशिकच्या पालकमंत्री पदाची धुरा सोपवली जाणार असल्याची चर्चा असतानाच आता स्वातंत्र्यदिनी आयोजित मुख्य ध्वजारोहण सोहळ्याची मंत्र्यांना जिल्हा निहाय जबाबदारी सोपविण्यात आली त्यात पालकमंत्री भुसेंना धुळे तर धुळ्याचे पालकमंत्री महाजनांवर नाशिकची तसेच छगन भुजबळ यांना अमरावतीची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

- Advertisement -

यापूर्वी भुसेंनी धुळ्याचे पालकत्व निभावले आहे. मात्र, आता अचानक या बदलामागे कोणते समीकरण याबाबत विविध तर्क वितर्क लढवले जात आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी भाजपला पाठिंबा दिल्यानंतर राज्यात शिंदे – फडणवीस सरकार स्थापन झाले. त्यावेळीही नाशिकचा पालकमंत्री कोण याबाबत बरीच चर्चा रंगली होती. प्रारंभीच्या काळात गिरीश महाजन यांचेच नाव चर्चेत होते. गेल्या स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहणाचा मान महाजनांना मिळाल्याने अप्रत्यक्षपणे पालकमंत्री पदाचा झेंडाही त्यांच्याच हाती गेल्याचे संकेत होते.

महाजनांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले असताना शिंदे गटाने धक्कातंत्राचा वापर करत भाजपला धक्का देत भुसेंकडे नाशिकची धुरा सोपवली. तेव्हापासून महाजन काहीसे नाराज असल्याचेही बोलले जाते. अजित पवार गट सत्तेत सहभागी झाल्यापासून शिंदे गटातही काहीशी नाराजी आहे. निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर शिंदे गटाची नाराजी नको याकरीता भाजपने आस्ते कदम टाकल्याचे बोलले जाते. मात्र आता हळुहळु भाजपनेही डाव टाकण्यास सुरूवात केल्याची चर्चा आहे. त्याचाच हा भाग असल्याचीही कुजबूज आहे.

पुन्हा धक्कातंत्राचा वापर?

- Advertisement -

मुंबई, पुणे, ठाणे नंतर नाशिकला राजकीयदृष्ट्या महत्त्व आहे. त्यामुळेच 2014 ते 2019 या सत्ताकाळात भाजपने महाजनांकडे पालकमंत्री पद दिले होते. महाजनांच्या नेतृत्वात महापालिकेत भाजपची 2017 ला एकहाती सत्ता आली. 2019 मध्ये शहरातील तिन्ही विधानसभा मतदारसंघात भाजप आमदार दुसर्‍यांदा विजयी झाले. त्यामुळे महाजन हेच पालकमंत्री असतील अशी अटकळ होती. मात्र, दादा भुसे व राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याही नावाची चर्चा होती. यंदा नाशिकला पालकमंत्री असतानाही महाजनांकडे ही जबाबदारी देण्यात आल्याने भाजपकडून पुन्हा धक्कातंत्र अवलंबवण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

- Advertisment -