घरमहाराष्ट्र'गोंदियाची सवारी आहे का' म्हणत व्यापाऱ्यासह मुलाचे थरारक अपहरण

‘गोंदियाची सवारी आहे का’ म्हणत व्यापाऱ्यासह मुलाचे थरारक अपहरण

Subscribe

लाखोंच्या रोकडसह, मौल्यवान वस्तुंची लूटमार

बंदुकीचा धाक दाखवून वर्ध्यात कापड व्यापाऱ्यासह त्याच्या मुलाचे अपहरण करत मौल्यवान दागिण्यांसह लाखोंची रोकड लुटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वर्ध्यातील हुळदगाव परिसरात शनिवारी रात्री ९ वाजता ही घटना घडली. याप्रकरणी गणेशपेठ पोलिसात अपहरणकर्त्याविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रवीण प्रभुदास बजाज (४०, सिंधी कॉलनी, गोंदिया असे अपहरण झालेल्या व्यापाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कापड व्यापारी प्रवीण बजाज यांचे गोंदियामध्ये न्यू बजाज नावाने कापडाचे दुकान आहे. याच दुकानासाठी बजाज व त्यांचा मुलगा आर्यन (वय १४) यांनी २१ जानेवारीला नागपुरात येऊन कापडाचा माल खरेदी केला. त्यानंतर रात्री ९ च्या सुमारास पुन्हा घरी जाण्यासाठी बजाज व आर्यन बसस्थानकावर आले. परंतु तोपर्यंत गोंदियाला जाणारी बस निघून गेली होती. दरम्यान यावेळी एक युवक बजाज यांच्या जवळ आला आणि त्याने ‘गोंदियाची सवारी आहे का’ असे विचारले. यावेळी बजाज यांनी होकार दिला. त्यानंतर हा युवक बजाज व त्यांचा मुलगा आर्यन यांना बसस्थानकाबाहेर घेऊन आला व त्यांना एका कारमध्ये बसविले. याकारमध्ये आधीच दोन युवक बसले होते. दरम्यान ड्रायव्हर, अपहरकर्त्या युवक व अन्य दोन युवकांसह बजाज व त्यांचा मुलगा आर्यन यांना वर्धा मार्गाने घेऊन निघाले. यावेळी बजाज यांनी अपहरकर्त्या युवकाला ‘वर्धा मार्गाने कशाला जाता’ अशी विचारणा केली, पण अपहरकर्त्यांने ‘या मार्गाने लवकर गोंदियाला पोहोचू’ असे उत्तर दिले. पण बजाज यांना आपले अपहरण झाले आहे असे कोणताही संशय तोपर्यंत आला नाही.

परंतु काही वेळाने ही कार वर्धातील समुद्रपूरमधील हुळदगाव येथे मध्येच थांबवण्यात आली. व बजाज व त्यांच्या मुलाला कारमधून बाहेर उतरविले. यावेळी अपहरणकर्त्या युवकाने बजाज यांच्या पोटावर बंदुक रोखून पैशाची मागणी केली. व अन्य दोन अपहरणकर्त्या युवकांनी बजाज यांच्या अंगावरील मौल्यवान सोन्याचे कडे, सोनसाखळी, अंगठी, मोबाइल व रोकड असा एकूण एक लाखांचा मुद्देमालाची लुटमार करत पसार झाले. बजाज व त्यांच्या मुलाला भररस्त्यात सोडून अपहरणकर्त्यांनी तेथून पोबारा केला. बजाज मुलासह मुख्य मार्गावर पोहचत एका व्यक्तीच्या मदतीने नातेवाईकांशी संपर्क साधत घटनेची माहिती दिली. त्यानंतर थेट गोंदिया गाठत त्यांनी गणेशपेठ पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा नोंदवून घेत कारच्या क्रमांकाच्या आधारे पोलिस अपहरकर्त्यांचा शोध घेत आहेत. अपहरणकर्ते अमरावतीचे असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -