घरमहाराष्ट्रमहाडमध्ये तारिक गार्डनसारख्या अनेक धोकादायक इमारती; ग्राऊंड रिपोर्ट

महाडमध्ये तारिक गार्डनसारख्या अनेक धोकादायक इमारती; ग्राऊंड रिपोर्ट

Subscribe

महाड शहरातील तारिक गार्डन इमारत सोमवारी पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली. अवघ्या काही मिनिटांत होत्याचे नव्हते झाल्याने जीव वाचविण्याची अनेकांना संधी मिळाली नाही. यामध्ये निष्पाप लोकांचा बळी गेला. या दुर्घटनेला जबाबदार कोण? असा सवाल आता समोर येत आहे. याला जबाबदार रग्गड पैसा मिळत असल्याने बहुमजली इमारती उभ्या करणारे बिल्डर की ज्याची जबाबदारी असते ते वास्तुविशारद, की पालिका प्रशासन, हा सवालही पुढे येत आहे. दुर्दैवी ‘तारिक’ प्रमाणे शहरात अनेक इमारती आहेत. पण कारवाईच्या नावाने सारीच बोंब आहे. या दुर्घटनेनंतर काही बोध घेतला जाईल का? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.

महाराष्ट्रात इमारत दुर्घटनेच्या अनेक घटना समोर येत आहेत. मात्र बांधकामापूर्वी मोठी आर्थिक देवाण-घेवाण झालेली असल्यामुळे थातूरमातूर कारवाई करून संबंधित शासकीय अधिकारी आणि स्थानिक प्रशासनातील अधिकारी मोकळे होतात. तारिक गार्डन इमारत पाच मजली होती. बांधकाम करणारा बिल्डर तळोजा (ता. पनवेल) येथील, तर वास्तुविशारद देखील मुंबईचा राहणारा. प्रत्यक्षात बांधकाम होत असताना वापरले जाणारे साहित्य आणि इतर घटक यांची पाहणी करणारा वास्तुविशारद, तर आराखड्याप्रमाणे बांधकाम होते का, हे पाहण्याची जबाबदारी असणारे स्थानिक पालिका प्रशासनातील अभियंता दुर्लक्ष करीत असल्याने अशा घटना होत असल्याचे दिसून येत आहे. २०११ साली उभ्या राहिलेली तारिक गार्डन इमारत बांधकाम झाल्यापासूनच वादाच्या भोवर्‍यात होती.

- Advertisement -

नगर पालिकेचे तत्कालीन विरोधी पक्षनेते बिपीन म्हामुणकर यांनी याबाबत स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची मागणी केली होती. इमारतीच्या बाहेरील बाजूच्या भिंतीचे सिमेंट आवरण जागोजागी निघून गेल्याचे दिसून येत होते. शहरात नव्याने आणि अवघ्या दहा-बारा वर्षात इमारत कमकुवत झाल्याची ही पहिलीच घटना नाही. इमारतीचे पिलर खचल्याच्या अनेक घटना आहेत. मात्र या इमारतींमध्ये आजही रहिवासी जीव धोक्यात घालून राहात आहेत. धोकादायक इमारतींमध्ये रहाणार्‍यांना केवळ पालिका नोटिसा बजावून आपले हात वर करीत आहे.
MAHAD dangerous building 1
शहरात २०१९ मध्ये केवळ चार इमारतींना धोकादायक यादीत समावेश करून रहिवाशांना पालिकेने महाराष्ट्र नगर पंचायती आणि औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ चे कलम १९५ अन्वये इमारती सोडण्याच्या नोटिसा बजावल्या होत्या. तर २०२० मध्ये जवळपास १९ इमारती धोकादायक असल्याचे पालिकेने जाहीर केले होते. आश्चर्याची बाब म्हणजे यात मात्र तारिक गार्डनचा समावेश नव्हता. शहरातील अनेक इमारती जीर्ण झाल्या आहेत. मात्र अल्प कालावधीत इमारतींचे पिलर कमकुवत झाल्याच्या घटना देखील समोर आल्या होत्या. या पिलरवर पुन्हा सिमेंट आवरण टाकत इमारती आहेत त्या स्थितीतच उभ्या ठेवल्या आहेत. इमारत बांधकाम करताना सादर केलेला नकाशा आणि बांधकाम पूर्ण झाल्यानंतर इमारतीचा आकार यामध्ये बदल असल्याचे दिसून येते. नियम धाब्यावर बसवून इमारती उभ्या केल्या जात आहेत. मात्र याकडे पालिका अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येते.

MAHAD dangerous buildings 3

- Advertisement -

ग्रीट आणि स्टोन क्रश वाळूचा वापर वाढला

वाळू परवाने मधल्या काळात बंद असल्याने आणि अनेक वेळा वाळू वेळेत उपलब्ध होत नसल्याने बांधकाम करताना वाळू ऐवजी ग्रीटचा वापर होत असल्याचे दिसून येते. तारिक गार्डनबाबत देखील स्थानिक नागरिक इमारत बांधकाम करताना ग्रीटचा वापर केल्याचा आरोप करीत आहेत.

ग्रामपंचायतीकडे तज्ज्ञ अभियंते आहेत कुठे?

शहर आणि परिसरात नागरीकरण वाढत आहे. शेजारील गावातून देखील इमारती उभ्या रहात आहेत. शिरगाव, चांभारखिंड, बिरवाडी, नडगाव, वहूर, लाडवली या गावात इमारती उभ्या झाल्या आहेत. विशेष म्हणजे या इमारतींना बांधकाम परवानगी जिल्हाधिकारी आणि नगर विकास विभागाकडून दिली जाते. मात्र जिल्हाधिकारी कार्यालयाकडून इमारत अथवा बांधकाम पहाणी करण्यासाठी कोणीच येत नाही. स्थानिक स्वराज्य संस्थेकडे याबाबत तज्ज्ञ अभियंता उपलब्ध नसतो. यामुळे ग्रामीण भागात इमारती बांधकाम करताना नियम धाब्यावर बसवून बांधकाम केले जात आहे.

अनधिकृत बांधकामांचा प्रश्न ऐरणीवर

शहरात अनधिकृत बांधकामांवर कारवाई केली जाते. मात्र ही कारवाई करताना गोरगरीब व्यावसायिक, फेरीवाले यांच्या हातगाड्या, टपर्‍या आणि दुकानांसमोरील शेड काढण्याच्या कारवाया केल्या गेल्या. मात्र इमारती आणि गाळ्यांमध्ये केलेले बदल, नाल्यांवर केलेले बांधकाम, मोकळ्या जागांवर केलेली बांधकामे याबाबत पालिकेने मौन धारण केले आहे. शहरात अशी अनेक अनधिकृत बांधकामे झाली आहेत. यावर देखील कठोर कारवाई झाली तरच दुर्घटना टाळता येणे शक्य आहे.

पूर रेषेत बांधकामे

दस्तुरी नाका ते नाते खिंड हा भाग सतत पाण्याखाली असतो. या ठिकाणी भौगोलिक स्थितीचा आढावा न घेताच इमारत परवाने जिल्हाधिकारी आणि नगर रचना विभागाने दिले आहेत. यामुळे या भागात बांधकाम करण्यात आलेल्या इमारती किमान तीन दिवस पुराच्या पाण्याच्या वेढ्यात असतात. हीच स्थिती ग्रामीण भागात देण्यात आलेल्या परवान्यांबाबत देखील निर्माण झाली आहे. शहराजवळ असलेल्या शिरगाव गावाच्या सखल भागात ज्या ठिकाणी पुराचे पाणी येते त्या ठिकाणी इमारती उभ्या राहत आहेत. महाड-रायगड मार्गावर नातेखिंड ते लाडवली या दरम्यान बांधकाम सुरू असलेल्या इमारतीही दर वर्षी पुरात सापडतात. याच परिसरात रुग्णालयांना देखील परवाने दिले आहेत.

mahad dangerous buildings 2

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -