घरमहाराष्ट्रमुंबईच्या तुफान पावसाचा नाशिककरांनाही तडाखा!

मुंबईच्या तुफान पावसाचा नाशिककरांनाही तडाखा!

Subscribe

सोमवारी मुंबई आणि उपनगरात मुसळधार कोसळलेल्या वरुणराजाने रेल्वे वाहतुकीचे अक्षरश: तीनतेरा केले. पावसामुळे रेल्वे रुळावर पाणी तुंबल्यामुळे रेल्वेला अनेक लांबपल्ल्याच्या गाड्या रद्द कराव्या लागल्या. त्यातच मुंबई-पुणे रेल्वे मार्गावर लोणावळा-कर्जतदरम्यान मालगाडीचे १६ डबे रुळावरून घसल्यामुळे मुंबई-पुणे रेल्वे सेवा विस्कळीत झाली होती. या मार्गाच्या काही गाड्या इगतपुरी मार्गे वळविल्यामुळे त्याचा भार मुंबई-नाशिक रेल्वेमार्गावर आला. त्यामुळे नाशिकहून मुंबईला निघालेले नोकरदार आणि इतर प्रवाशांचे चांगलेच हाल झाले.

मध्य रेल्वेच्या मुंबई-पुणे रेल्वे मार्गवरील जांबरूंग रेल्वे स्थानकाजवळ सोमवारी पहाटे मालगाडीचे १६ डबे रेल्वे रुळावरून घसरण्याची घटना समोर आली होती. त्यामुळे पुण्याहून मुंबईच्या दिशेने येणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे. या घटनेमुळे मुंबईतून पुण्याकडे जाणारी आणि पुण्यातून मुंबईकडे येणारी रेल्वे वाहतूक काही काळासाठी बंद होती.

- Advertisement -

या घटनेची माहिती मिळताच मध्य रेल्वे अभियांत्रिकी पथक घटना स्थळी धाव घेऊन. मालगाडीचे डब्बे हटविण्यात कार्य सुरु केले. मात्र सतत कोसळणार्‍या पावसामुळे रेल्वेला मालगाडीचे डब्बे हटविण्यासाठी जवळ-जवळ १ तासाच्या कालावधी लागला. त्यामुळे मुंबईकडे येणार्‍या अनेक लांबपल्याच्या गाड्या थांबून होत्या. त्यामध्ये प्रवासी अडकून पडले होते.

या घटनेमुळे मध्य रेल्वेने पुण्याला जाणार्‍या मुंबई पुणे इंद्रायणी एक्स्प्रेस, मुंबई पुणे इंटरसिटी एक्स्प्रेस, मुंबई पुणे डेक्कन एक्स्प्रेस, रद्द करण्यात आल्या आहेत. तर पुणे -भुसावळ एक्स्प्रेस, पनवेल -पुणे पॅसेंजर, पुणे -सीएसएमटी डेक्कन एक्स्प्रेस, पुणे सीएसएमटी प्रगती एक्स्प्रेस या पुण्याहून सुटणार्‍या ट्रेन्सही रद्द करण्यात आल्या. तर काही गाड्या इगतपुरी मार्गावरून वळवण्यात आल्या.

- Advertisement -

त्याचा फटका नोकरीसाठी नाशिकहून मुंबईला येणार्‍यांना बसला. एक तर गाड्या रद्द झाल्या होत्या. ज्या सुरू होत्या त्याही उशीराने धावत होत्या. त्यामुळे नोकरदारांना आपल्या कार्यालयात जाण्यास विलंब झाला. अशीच परिस्थिती संध्याकाळी होती. पावसामुळे अनेक कार्यालयातून, कर्मचार्‍यांना लवकर घरी सोडण्यात आले असले तरी त्यांना घरी पोहचण्यास उशीर झाला.

रद्द झालेल्या गाड्या
22105 सीएसएमटी-पुणे इंद्रायणी एक्स्प्रेस, 12127 सीएसएमटी-पुणे इंटरसिटी एक्स्प्रेस,11007 सीएसएमटी-पुणे डेक्कन एक्स्प्रेस, 11092 सीएसएमटी-कोल्हापूर कोयना एक्स्प्रेस या गाड्या सीएसएमटी आणि पुणे दरम्यान रद्द करण्यात आल्या. नाशिक रोड येथे 11025 भुसावळ-पुणे एक्स्प्रेस रद्द करण्यात आली. या शिवाय 11026 पुणे-भुसावळ एक्स्प्रेस, 51318 पुणे-पनवेल पॅसेंजर, 51317 पनवेल-पुणे पॅसेंजर, 12124 पुणे-सीएसएमटी डेक्कन क्वीन, 12126 पुणे-सीएसएमटी प्रगती एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्या.

गुजरातकडे जाणार्‍या १४ गाड्या रद्द
सोमवारी पावसाने पालघरला चांगलेच झोडपून काढले. त्यामुळे पश्चिम रेल्वेची लांब पल्याची वाहतुक कोलमडली होती. रेल्वेतर्फे अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या.त्यामध्ये वांद्रे टर्मिनस-सुरत, बोरीवली-सुरत,वसई रोड-बोईसर-वसई रोड,वलसाड-वापी,वापी-सुरत,डहाणु रोड-बोरीवली या गाड्यांचा समावेश होता. वांद्रे टर्मिनस-जयपुर एक्सप्रेस वांद्रे टर्मिनस ते सज्जन दरम्यान रद्द करण्यात आली होती.सुरत-मुबंई सेट्रल एक्सप्रेस नवासरीमध्ये,भुसावळ -वांद्रे टर्मिनस एक्सप्रेस बोईसर,सुरत-विरार गाडी बिल्लीमोरी,वलसाड-मुबंई सेट्रल गाडी उधावापर्यंतच चालविण्यात आल्या होत्या. तर अनेक गाड्यांना १ ते २ तास लेटमार्क लागला.

मुंबई, ठाणे, पालघरमध्ये रेड-अलर्ट
मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी गेल्या तीन दिवसांपासून सुरु झालेल्या पावसाचा जोर सोमवारीही कायम होता. रविवार रात्रीपासून सुरु झालेल्या पावसाने मुंबईकरांची दाणादाण उडविली.

मंगळवारीही मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आले असून ठाणे आणि पालघरमध्ये येत्या चार दिवसांसाठी ‘रेड-अ‍ॅलर्ट’ जारी करण्यात आला आहे. ठाणे आणि पालघरवासियांनी येत्या काळात अधिक काळजी घेण्याचे आवाहन भारतीय हवामान खात्याकडून करण्यात आले असून मुंबईकरांनी देखील पावसासाठी सज्ज राहण्याची सूचना हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. दरम्यान, सोमवारी गोवंडी येथे एका ३० वर्षीय युवकाचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची दुदैवी घटना घडली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -