घरमहाराष्ट्रकुणाला व्यक्तिगत निर्णय घ्यायचे असतील तर... राष्ट्रवादी फुटीबाबत पवारांची बोलकी प्रतिक्रिया

कुणाला व्यक्तिगत निर्णय घ्यायचे असतील तर… राष्ट्रवादी फुटीबाबत पवारांची बोलकी प्रतिक्रिया

Subscribe

मुंबई : विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बंडामुळे शिवसेनेत मोठी फूट पडली आहे. त्यामुळे राजकीय परिस्थिती अस्थिर झालेली असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस देखील फुटीच्या उंबरठ्यावर असल्याचे सांगण्यात येते. कुणाला काही व्यक्तिगत निर्णय घ्यायचे असतील तर तो त्यांचा प्रश्न आहे, अशी बोलकी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Nationalist Congress Party chief Sharad Pawar) यांनी दिली आहे.

‘सामना’ दैनिकातील आपल्या ‘रोखठोक’ सदरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी ही माहिती दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेनेत झालेल्या भूकंपाचे जोरदार हादरे अजूनही महाराष्ट्राच्या राजकारणाला बसत आहेत. फक्त या भूकंपाचा केंद्रबिंदू आता शिवसेनेकडून राष्ट्रवादी काँग्रेसकडे सरकला आहे. भाजपासोबत न गेल्यास मला तुरूंगात टाकतील, अशी भीती एकनाथ शिंदे यांनी बंडाआधी उद्धव ठाकरेंकडे व्यक्त केल्याचे ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे. त्याच दबावतंत्राचा वापर विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार (Opposition leader Ajit Pawar) यांच्यासहीत राष्ट्रवादीच्या इतर बड्या नेत्यांविरुद्ध केला जात असल्याची चर्चा मंत्रालयापासून राज्यभर ऐकायला मिळत आहे.

- Advertisement -

खासदार संजय राऊत यांनी आपल्या लेखात केलेला उल्लेख हीच बाब अधोरेखित करतो. मंगळवारी संध्याकाळी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबरोबर शरद पवारांना भेटलो. ते म्हणाले, कोणालाही मनापासून सोडून जायचे नाही, पण कुटुंबाला टार्गेट केले जात आहे. कुणाला काही व्यक्तिगत निर्णय घ्यायचे असतील तर तो त्यांचा प्रश्न, पण ’पक्ष’ म्हणून आम्ही भाजपबरोबर जाण्याचा निर्णय घेणार नाही. संजय राऊत यांनी आपल्या ‘रोखठोक’ सदरात हा उल्लेख केला आहे.

एका बाजूला सत्तेत नसणे आणि दुसर्‍या बाजूला केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाईची टांगती तलवार अशा दुहेरी संकटात सापडल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात प्रचंड अस्वस्थता पसरली आहे. राष्ट्रवादीचे अंदाजे 30 आमदार ही कोंडी फोडण्यासाठी अजितदादांना साथ देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याची जाणीव पक्षाध्यक्ष शरद पवारांनाही असून परिस्थिती उद्धव ठाकरेंप्रमाणे त्यांच्याही नियंत्रणाबाहेर गेल्याचे ठाकरे गटाच्या एका ज्येष्ठ नेत्याने आपलं महानगरला सांगितले होते. शरद पवारांच्या या वक्तव्याने एक प्रकारे त्याला दुजोराच मिळाला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -