घरक्राइमकोरोनाकाळात रेमडेसिवीरची अवैध विक्री; मेडिकलचा परवाना रद्द

कोरोनाकाळात रेमडेसिवीरची अवैध विक्री; मेडिकलचा परवाना रद्द

Subscribe

नाशिक : कोरोनाकाळात रेमडेसिवीर इंजेक्शनचा विनापरवाना विक्री करणार्‍या वडाळा शिवारातील श्रीनिवास फार्माचा परवाना कायमस्वरुपी अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) अखेर रद्द केला आहे. ही कारवाई मुंबईच्या गुप्तवार्ता विभागाने नाशिकमध्ये येवून केलेल्या तपासणीनंतर ही कारवाई करण्यात आली. तक्रार येवूनही गेली दोन वर्षे कारवाईबाबतचालढकल करणार्‍या नाशिक एफडीएच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.

संतोष गायकवाड यांच्या आईला कोरोना झाला होता. त्यांना १६ एप्रिल २०२१ रोजी इंदिरानगरमधील श्रीनिवास हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यावेळी त्यांचा सीटी स्कोअर सहा होता. डॉक्टरांनी प्रकृती गंभीर असल्याचे सांगितल्याने संतोष गायकवाड यांनी मागेपुढे न पाहता खर्चाची तयारी केली. रुग्ण दाखल केल्याच्या पहिलाच दिवशी हॉस्पिटलमधील श्रीनिवास फार्मा मेडिकलचालकाने डॉक्टरांनी लिहून दिलेली तब्बल १ लाख ३३ हजार रुपयांची औषधे दिली. ही औषधे पुढील १३ दिवसांसाठी असल्याचे सांगण्यात आले. त्यापोटी १ लाख ७३ हजार रुपयांचे बिलही दिले गेले. त्यावेळी संतोष यांनी आपल्या आईला रेमडेसिवीर इंजेक्शन देण्यास संमती नसल्याचे सांगितले होते. तरीही डॉक्टरांनी इंजेक्शन दिले.

- Advertisement -

मेडिकलमधून जी औषधे संतोष यांनी घेतली. त्यापोटी १६ एप्रिल रोजी सीए १०३ क्रमांकाची पावती दिली गेली. १८ एप्रिल रोजी सीए १०४, तर याच दिवशी रेमडेसिवीरच्या नावाची ८१ क्रमांकाचे बिल दिले गेले. ८१ क्रमांकाचे बिल हे १०३ पूर्वी येणे अपेक्षित असताना ते नंतर कसे दिले गेले. याबाबत संतोष यांनी अन्न व औषध प्रशासनाकडे तक्रार केली. मात्र, त्यांनीही मेडिकलचालकाला अभय दिल्याचे संतोष यांचे म्हणणे आहे. त्यांच्या आईला २८ एप्रिलला दुपारी १२ वाजता डिस्चार्ज देण्यात आला. असे असतानाही मेडिकलने दुपारी ३ वाजता बिल तयार केले. याप्रकरणी संतोष यांनी महापालिकेसह एफडीएसह अन्य यंत्रणांकडे तक्रार केली होती. मात्र, यंत्रणांकडून कागदी घोडे नाचवले जात होते. ८१ क्रमांकाच्या बिलाची तपासणी होणे गरजेचे होते. मात्र, त्याकडे अन्न व औषध प्रशासनाने थातूरमातुर उत्तर देत डोळेझाक केली.

२० ऑक्टोबर २०१२ रोजी श्रीनिवास फार्माची सहायक आयुक्त ग. रा. रोकडे, मुंबई आणि औषध निरीक्षक सु. सा. देशमुख, नाशिक यांनी तपासणी केली. त्यात दोष व त्रुटी आढळून आल्याने कारणे दाखवा नोटीस देण्यात आली. त्यानुसार फार्माकडून समाधानकारक उत्तर मिळाले नाही. रजिस्टर्ड फार्मासिस्टचे मूळ प्रमाणपत्र सादर केले नाही. त्यामुळे औषधे व सौंदर्य प्रसाधने कायद्याचे उल्लंघन केल्याचे समोर आले. रजिस्टर्ड फार्मासिट यामिनी निंबा साईदाणे गैरहजर होत्या.

- Advertisement -

श्रीनिवास फार्माकडून बिल क्र.एस/९६०, २९ एप्रिल २०२१ व एस/५७५ १९ एप्रिल २०२१ अंतर्गत खरेदी करण्यात आलेले २३ इंजेक्शन खरेदी केली असल्याचे आढळून आले. तपासणीवेळी खरेदी बिलांच्या प्रती उपलब्ध नसल्याचे आढळून आले. रेमडेसिवीर श्रीनिवास हॉस्पिटलमध्ये दाखल असलेल्या रुग्णांना डॉक्टरांच्या चिठ्ठीवर विक्री करण्यात आल्याचे उपस्थित मालकाने सांगितले. खरेदी बिले व खरेदी करून विक्री केल्याचे विक्री बिले सादर केले नाही. त्यातून कायद्याचे उल्लंघन केल्याचे समोर आले. १ फुब्रेवारी २०२२ ते २ मार्च २०२२ या कालावधीत परवाने निलंबित करण्यात आले होते. तरीही, श्रीनिवास फार्माकडून नियमांचे उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास आले.

श्रीनिवास फार्माने समाजहितास हानी पोहोचेल अशी कार्यपद्धतीचा अवलंब केला. ही बाब सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने हानीकारक आहे. त्यामुळे श्रीनिवास फार्माचे लायसन्स कायमस्वरुपी ५ एप्रिल २०२३ पासून रद्द करण्याचे आदेश एफडीएचे सहायक आयुक्त डॉ. डोंगळीकर यांनी दिले. शिल्लक असलेल्या औषधांची विल्हेवाट लावण्यासाठी तपशिलवार यादी, त्यांची विक्री/पुरवठा करावयाच्या औषधे लायसन्सधारकांचा तपशील द्यावा लागणार आहे. एफडीएचे आदेश मान्य नसल्यास राज्य शासनाकडे याचिक दाखल करण्याची तरतूद देण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -