घरमहाराष्ट्रआयटीआयमध्ये नाशिकच्या मुलींची संस्था राज्यात अव्वल

आयटीआयमध्ये नाशिकच्या मुलींची संस्था राज्यात अव्वल

Subscribe

राज्यातील उद्योग क्षेत्रातील विविध कामांसाठी लागणार्‍या कुशल मनुष्यबळाचा पुरवठा करणे आणि त्यासाठी युवकांना रोजगाराभिमुख प्रशिक्षण देऊन सक्षम बनविणार्‍या शासकीय तसेच खासगी संस्थांना उत्कृष्ट औद्योगिक प्रशिक्षण संस्था म्हणून सरकारकडून गौरवण्यात येते. २०२०-२१ वर्षासाठी राज्यस्तरावर नाशिकमधील मुलींच्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेने प्रथम क्रमांक पटकावला, तर विभागस्तरावर नागपूर विभागातील चंद्रपूरमधील अंबुजा औद्योगिक प्रशिक्षण संस्थेने अव्वल क्रमांक पटकावला आहे.

उद्योग क्षेत्राला कुशल मनुष्यबळ पुरवठा करणे, युवकांना रोजगाराभिमुख प्रशिक्षण देऊन सक्षम बनविणे, कौशल्ययुक्त प्रशिक्षण देऊन उत्पादन व इतर सेवा क्षेत्रामध्ये स्वयंरोजगार करण्यासाठी विद्यार्थ्यांना सक्षम बनविणे, कामगारांना योजनाबद्ध प्रशिक्षण देऊन औद्योगिक आस्थापनाचा दर्जा, गुणवत्ता व उत्पादन वाढवणे या उद्दिष्टांसह राज्यातील शिल्प कारागीर योजना सुरू करणे या सर्व प्रशिक्षण योजनांची उत्कृष्ट अंमलबजावणी करणार्‍या संस्थांना प्रोत्साहन देण्यासाठी सर्व संस्थांमध्ये निकोप स्पर्धा घेऊन त्यातून राज्यातील शासकीय तसेच खासगी उत्कृष्ट संस्थेची निवड करण्यात येते.

- Advertisement -

त्यानुसार २०२०-२१ या शैक्षणिक वर्षासाठी राज्यस्तरावरून तीन अव्वल संस्थांची तर विभागीय स्तरावरून सहा औद्योगिक संस्थांची निवड करण्यात आली आहे. निवड करण्यात आलेल्या या संस्थांमध्ये राज्यस्तरावर नाशिक विभागातील नाशिक मुलींचे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेने अव्वल क्रमांक पटकावला आहे, तर मुंबई विभागातील जोगेश्वरीतील लालजी मेहरोत्रा खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेने द्वितीय आणि नागपूर विभागातील वर्धा जिल्ह्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेने तृतीय क्रमांक पटकावला आहे.

राज्यस्तरीय पुरस्कारांप्रमाणे विभागीय स्तरावरही संस्थांचा गौरव करण्यात येतो. त्यानुसार नागपूर विभाातील चंद्रपूर जिल्ह्यातील अंबुजा अशासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेने प्रथम क्रमांक पटकावला आहे, तर औरंगाबाद विभागातील जालना जिल्ह्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेने दुसरा, पुणे विभागातील कोल्हापूरमधील स्मॅक संचलित स्व. जवानमलजी गांधी खासगी संस्थेने तिसरा, नाशिक विभागातील संगमनेरमधील लोकपंचायत रुरल टेक्निकल ट्रेनिंग इन्स्टिट्यूटची खासगी संस्थेने चौथा, मुंबई विभागातील ठाणे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेने पाचवा, अमरावती विभागातील अमरावती शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेने सहावा क्रमांक पटकावला आहे.

- Advertisement -

छाननी समितीच्या शिफारशीनंतर निवड

राज्यातील उत्कृष्ट औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची निवड करण्यासाठी व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या संचालकांच्या अध्यक्षतेखाली व संचालनालय स्तरावर छाननी समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने २० जून २०२१ रोजी बैठकीमध्ये सर्व संस्थांचे सविस्तर सादरीकरण केले. त्यानुसार छाननी समितीमार्फत नामांकनासाठी शिफारस केलेल्या संस्थांची शिफारस संचालनालयाकडून करण्यात आली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -