घरमहाराष्ट्रभारतीय भाषा हा भारतीयत्वाचा आत्मा आणि भविष्य, अभियांत्रिकीच्या मराठी पुस्तकांचे प्रकाशन

भारतीय भाषा हा भारतीयत्वाचा आत्मा आणि भविष्य, अभियांत्रिकीच्या मराठी पुस्तकांचे प्रकाशन

Subscribe

मुंबई : राष्ट्रीय शिक्षण धोरणात प्रादेशिक भाषांना प्राधान्य देण्याची केंद्र सरकारची भूमिका ही प्रादेशिक भाषांविषयी असलेली कटिबद्धता दर्शवणारी आहे. आमच्या दृष्टीने भारतीय भाषा ही भारतीयत्वाचा आत्मा आणि भविष्य आहे, असे प्रतिपादन केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री सुभाष सरकार यांनी आज केले.

- Advertisement -

देशातील विद्यार्थ्यांना इंग्रजीव्यतिरिक्त प्रादेशिक भाषांमध्येही अभियांत्रिकीचे शिक्षण घेता यावे, या उद्देशाने नवी दिल्लीचे अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण संचालनालय यांच्या संयुक्त विद्यमाने आज मुंबईत मराठी भाषेत निर्मित पाठ्यपुस्तकांचा वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री सुभाष सरकार, राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, विद्यापीठ अनुदान आयोग आणि नवी दिल्लीच्या अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेचे अध्यक्ष जगदिश कुमार, राज्याचे तंत्रशिक्षण संचालक डॉ. अभय वाघ, राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेचे उपाध्यक्ष डॉ. एम. पी. पुनिया आदी मान्यवर उपस्थित होते.

भाषा केवळ संपर्काचे साधन नाही, तर आपली संस्कृती, समाज, श्रद्धा, परंपरा यांची ती अभिव्यक्ती आहे. त्यामुळे, अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने अभियांत्रिकी अभ्यासक्रमाची पुस्तके भारतीय भाषांमध्ये उपलब्ध करुन देण्याचा हाती घेतलेला उपक्रम कौतुकास्पद आहे, असे सांगून ते म्हणाले की, राष्ट्रीय शिक्षण धोरणात, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक गोष्टींचा समावेश करण्यात आला आहे. प्रादेशिक भाषांमधून तांत्रिक शिक्षण घेतल्यास, विद्यार्थ्यांना विषयाचे उत्तम आकलन होईल आणि संशोधनाला प्रोत्साहन मिळेल, असा विश्वास सरकार यांनी व्यक्त केला.

- Advertisement -

विद्यापीठ अनुदान आयोग आणि अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेच्या मदतीने, जून 2023पर्यंत, महाराष्ट्रातील सर्व तंत्रशिक्षण अभ्यासक्रमातील पुस्तके मराठी भाषेत अनुवादित करण्याचे राज्य सरकारचे उद्दिष्ट आहे, असे राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

यावेळी विविध शिक्षणसंस्थांच्या 12 प्रमुखांना आणि 12 विद्यार्थ्यांना हा मराठी पुस्तकांचा संच देखील वितरित करण्यात आला. तसेच, या पुस्तकांचे भाषांतर करणाऱ्या लोणेरे इथल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठाचे प्र-कुलगुरू, समन्वयक, भाषांतरकार, अशा सर्वांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -