घरसंपादकीयओपेडदो हंसो का जोडा बिछड गयो रे....!

दो हंसो का जोडा बिछड गयो रे….!

Subscribe

जितेंद्र आव्हाड हे टेंभी नाक्यावर जाऊन जोपर्यंत एकनाथ शिंदे यांच्याबरोबर मनसोक्त रंगपंचमी खेळत नसत तोपर्यंत ठाण्यातील रंगपंचमी संपली असे कोणाला वाटतच नसे. इतका या दोघाही नेत्यांमध्ये याराना म्हणा अथवा दोस्ती म्हणाही होती. मात्र हर हर महादेव चित्रपट बंद पाडण्याच्या निमित्ताने आव्हाडांनी जे आंदोलन केले आणि त्यानंतर त्यांच्यावर ज्या पद्धतीने ठाणे पोलिसांनी कारवाई केली ती लक्षात घेता तसेच रविवारी दस्तुर खुद्द राज्याचे मुख्यमंत्री घटनास्थळी असताना त्यांच्यासमोरच झालेल्या घटनेवरून जितेंद्र आव्हाड यांच्यावर तात्काळ विनयभंगासारखा गुन्हा दाखल झाल्यानंतर या दोन्ही नेत्यांच्या दोस्तीत दरी निर्माण झाल्याचे अथवा काहींनी जाणून-बुजून निर्माण केल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे दो हंसो का जोडा बिछड गयो रे, असे म्हणण्याची वेळ तर येणार नाही ना!

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माजी गृहनिर्माण मंत्री व मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांचे राजकीय पक्ष आणि राजकीय विचारसरणी जरी भिन्न असली तरी हे दोघेही नेते एकमेकांचे पक्के मित्र म्हणूनच आजवर राजकीय वर्तुळात ओळखले जात होते. या दोघेही नेत्यांमध्ये राजकीय अंडरस्टँडिंग ही एवढी पक्की होती की एकमेकांच्या पक्षहितासाठी जरी निवडणुकांमध्ये या दोन्ही नेत्यांना एकमेकांविरोधात उभे ठाकावे लागले तरी या दोघाही नेत्यांनी आजवर परस्परांमधील व्यक्तिगत स्नेहसंबंध हे राजकारणाच्या पलीकडे जाऊन सांभाळले. ठाण्यातील रंगपंचमी ही या दोघाही नेत्यांनी राजकीय कटुता बाजूला ठेवून नेहमीच उत्साहात साजरी केली.

त्यामुळेच जितेंद्र आव्हाड हे टेंभी नाक्यावर जाऊन जोपर्यंत एकनाथ शिंदे यांच्याबरोबर मनसोक्त रंगपंचमी खेळत नसत तोपर्यंत ठाण्यातील रंगपंचमी संपली असे कोणाला वाटतच नसे. इतका या दोघाही नेत्यांमध्ये याराना म्हणा अथवा दोस्ती म्हणा होती. मात्र हर हर महादेव चित्रपट बंद पाडण्याच्या निमित्ताने आव्हाड यांनी जे आंदोलन केले आणि त्यानंतर त्यांच्यावर ज्या पद्धतीने ठाणे पोलिसांनी कारवाई केली ती लक्षात घेता तसेच रविवारी दस्तुर खुद्द राज्याचे मुख्यमंत्री घटनास्थळी असताना त्यांच्यासमोरच झालेल्या घटनेवरून डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्यावर तात्काळ विनयभंगासारखा गुन्हा दाखल झाल्यानंतर या दोन्ही नेत्यांच्या दोस्तीत दरी पडल्याचे अथवा काहींनी जाणून-बुजून पाडल्याचे स्पष्ट झाले आहे.

- Advertisement -

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आणि त्यांच्याच यापूर्वीच्या मंत्रिमंडळात गृहनिर्माणसारखे अत्यंत महत्त्वाच्या खात्याचे अडीच वर्ष कॅबिनेट मंत्रीपद भूषवलेले आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड या दोघाही राजकीय नेत्यांची कर्मभूमी ही ठाणे शहर हीच आहे. दोघेही नेत्यांचा राजकीय इतिहास जर पाहिला तर जितेंद्र आव्हाड हे एकनाथ शिंदे यांना राजकारणात थोडे सीनियरच म्हणावे लागतील. दोघाही नेत्यांच्या राजकीय वाटचालीमध्ये शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख स्वर्गीय आनंद दिघे यांचा मोठा वाटा आहे. अर्थात स्वर्गीय आनंद दिघे हे ठाण्याच्या विकासासाठी सर्व पक्षीयांना सोबत आणि बरोबर घेऊन काम करणारे नेतृत्व होते. त्यावेळी राज्यात आणि देशातही काँग्रेसची सत्ता होती आणि १९९६ च्या सुमारास जितेंद्र आव्हाड हे अखिल भारतीय युथ काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष होते. आणि त्यावेळी एकनाथ शिंदे हे ठाणे महापालिकेत शिवसेनेचे नगरसेवक होते.

ठाणे महापालिकेत सत्ता ही नेहमीच शिवसेना आणि त्यानंतर शिवसेना भाजप युतीचीच राहिली. त्यामुळे महापालिकेतील कारभाराची सर्व सूत्रे ही सुरुवातीला टेंभी नाक्यावर अर्थात जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांच्यात हातात होती. त्यामुळे काँग्रेस आणि त्यानंतर राष्ट्रवादीच्या नगरसेवकांच्या प्रभागांमध्ये विकास कामे करताना महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेचे मान्यता आवश्यक असायची. त्यामुळे आनंद दिघे यांच्याशी काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांना संवाद हा ठेवायलाच लागायचा. आणि त्यानंतर कालांतराने ठाणे जिल्हाप्रमुख म्हणून ठाणे महापालिकेची तसेच अन्य महापालिकांची सर्व सूत्रे एकनाथ शिंदे यांच्या हातात आली. अर्थात एकदा शिंदे यांनीदेखील महापालिकेचा कारभार चालवताना शिवसेनेबरोबरच भाजप काँग्रेस राष्ट्रवादी मनसे रिपाइं तसेच अगदी छोट्या-मोठ्या अपक्षांनादेखील विश्वासात घेऊनच पालिकेचा कारभार आजवर चालवला.

- Advertisement -

जितेंद्र आव्हाड हे २००२ मध्ये प्रथम राष्ट्रवादीतर्फे विधान परिषदेवर आमदार झाले तर एकनाथ शिंदे हे पूर्वाश्रमीच्या ठाणे विधानसभा मतदारसंघातून २००४ मध्ये आमदार म्हणून विधानसभेवर सर्वप्रथम निवडून आले. त्यावेळी कोपरी पाचपाखाडी ओवळा माजीवडा आणि ठाणे शहर अशा तीन मतदारसंघांचा मिळून ठाणे हा एकच विधानसभा मतदारसंघ होता. २००८ मध्ये आव्हाड पुन्हा विधान परिषदेवर आले. तर २००९ मध्ये विधानसभा आणि लोकसभा मतदारसंघाची पुनर्रचना झाली. त्यामध्ये ठाणे व पालघर जिल्ह्यात मिळून विधानसभेचे २४ मतदारसंघ झाले तर लोकसभेचे चार मतदारसंघ झाले. सहाजिकच सर्वच राजकीय पक्षांमध्ये ठाणे जिल्ह्याला राजकीय महत्त्व प्राप्त झाले. एकट्या ठाणे शहरात ठाणे शहर, ओवळा माजीवडा, कोपरी पाचपाखाडी आणि मुंब्रा कळवा असे विधानसभेचे चार मतदारसंघ झाले तर ठाणे शहर, मिरा भाईंदर आणि नवी मुंबई मिळून ठाणे लोकसभा हा स्वतंत्र लोकसभा मतदारसंघ झाला.

कल्याण लोकसभा मतदारसंघ हा नव्या स्वतंत्रपणे अस्तित्वात आला आणि त्यामध्ये मुंब्रा कळवा कल्याण ग्रामीण कल्याण पूर्व डोंबिवली उल्हासनगर अंबरनाथ हे सहा विधानसभा मतदारसंघ समाविष्ट करण्यात आले. भिवंडी आणि पालघर हे देखील दोन स्वतंत्र लोकसभा मतदारसंघ झाले त्यामुळे साहजिकच सर्वच राजकीय पक्षांमध्ये ठाणे जिल्ह्यातून अधिकाधिक आमदार आणि खासदार निवडून आणण्यासाठी स्पर्धा सुरू झाली. ठाणे जिल्ह्यात तसे बघायचे गेल्यास शिवसेना आणि राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष पूर्वाश्रमीपासून एकमेकांचे राजकीय वैरीच होते. २०१४ सालापर्यंत काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांची ठाणे महापालिकेत जरी सत्ता नसली तरी राज्यात आणि देशात या दोन्ही पक्षांची सत्ता होती त्यात ठाणे जिल्ह्यावर राष्ट्रवादीचा सदैव वर चष्मा होता.

त्यामुळे ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद देखील १९९९ पासून ते २०१४ या अर्थात पंधरा वर्षे एकटे राष्ट्रवादीकडे होते. २०१४ मध्ये महाराष्ट्रात भाजप आणि शिवसेनेची सत्ता आली आणि तेव्हापासून ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री पद हे एकनाथ शिंदे यांच्याकडे राहिले. २०१४ ते २०१९ या काळात राज्यात पूर्णपणे भाजपची राजवट होती. राज्यात आणि देशात भाजपची एक हाती सत्ता होती आणि त्यात देवेंद्र फडणवीस यांच्यासारखे आक्रमक नेतृत्व राज्याचे मुख्यमंत्रीपदी होते. फडणवीस यांनी राज्यातील काँग्रेस तर पूर्ती खिळखिळी करून टाकली, मात्र राष्ट्रवादीचे दिग्गज नेतेही त्यांनी भाजपात ओढून घेतले. त्यामुळे २०१९ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये राज्यातील काँग्रेस आणि राष्ट्रवादीची अवस्था अत्यंत बिकट होती.

या सार्‍या राजकीय घडामोडींचा परिणाम हा ठाण्यातील स्थानिक राजकारणावर देखील सुप्त स्वरूपात उमटत होताच. त्यात २०१४ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव डॉक्टर श्रीकांत शिंदे हे कल्याण लोकसभा मतदारसंघातून शिवसेना-भाजप युतीतर्फे खासदार म्हणून निवडून आले. २०१९ च्या लोकसभा निवडणुकांमध्येदेखील श्रीकांत शिंदे यांनी मोठ्या फरकाने कल्याण लोकसभा मतदारसंघातून विजय संपादन केला आणि त्यामुळे सहाजिकच कल्याण लोकसभा मतदारसंघ अंतर्गत येणार्‍या प्रत्येक विधानसभा मतदारसंघांमध्ये पूर्वाश्रमीच्या शिवसेनेची व आता बोलायचे झाल्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांच्या शिवसेनेची ताकद कशी वाढेल याचेच पुरेपूर प्रयत्न या मतदारसंघाचे खासदार म्हणून डॉक्टर श्रीकांत शिंदे हे सातत्याने करत आले आहेत.

कल्याण लोकसभा मतदारसंघांमध्ये जर सहा विधानसभा मतदारसंघांचा विचार केला तर त्यामध्ये मुंब्रा कळवा येथून राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड हे आमदार आहेत. कल्याण ग्रामीणमधून मनसेचे राजू पाटील डोंबिवलीमधून भाजपचे रवींद्र चव्हाण कल्याण पूर्वमधून भाजप पुरस्कृत अपक्ष गणपत गायकवाड उल्हासनगरमधून भाजपचे कुमार अहिराणी तर अंबरनाथमधून शिवसेनेचे डॉक्टर बालाजी किणीकर हे आमदार आहेत. त्यामुळे या सहा मतदारसंघातील आमदार आणि त्यांचे राजकीय पक्ष जर बघितले तर केवळ अंबरनाथ या एकाच मतदारसंघातून शिवसेनेचे आमदार निवडून आलेले आहेत. तीन आमदार भाजपचे, एक मनसे, एक शिवसेना तर एक राष्ट्रवादी असे कल्याण लोकसभेचे राजकीय चित्र आहे. अर्थात हे चित्र असतानादेखील श्रीकांत शिंदे हे तब्बल दोन वेळा या मतदारसंघातून लोकसभेवर चांगल्या मताधिक्क्याने निवडून गेलेले आहेत.

तथापि २०२४ च्या लोकसभा निवडणुकांची राजकीय गणिते जर लक्षात घेतली तर सहा मतदारसंघांपैकी केवळ एकाच मतदारसंघात बाळासाहेबांच्या शिवसेनेचा आमदार असणे हे खासदार म्हणून श्रीकांत शिंदे यांच्यासाठी कधीही जोखमीचे ठरू शकते. त्यात आता राज्याची पूर्णपणे सत्ता मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांच्या हातात आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना जर त्यांच्या चिरंजीवालाच लोकसभेकरता संघर्ष करावा लागला आणि निवडून येण्यामध्ये अडचणी येऊ लागल्या तर अर्थातच मुख्यमंत्री म्हणून तसेच शिवसेनेचे तब्बल ४० आमदार व बारा खासदार स्वतःबरोबर स्वतंत्रपणे घेणार्‍या एकनाथ शिंदे यांच्यासाठी ही बाब निश्चितच चिंताजनक आहे हे देखील लक्षात घेतले पाहिजे. त्यामुळेच गेल्या काही दिवसांमध्ये ठाण्यामध्ये आणि मुंब्रा कळव्यामध्ये ज्या काही राजकीय घडामोडी घडत आहेत, त्याच्या पाठीशी २०२४ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांची गुपिते दडलेली आहेत, एवढाच त्याचा सरळ साधा राजकीय अर्थ आहे.

बदलत्या काळानुसार ठाण्याची राजकीय गणितेदेखील मोठ्या प्रमाणावर बदलली आहेत. २०१४ पर्यंत जे एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे ठाणे जिल्हा प्रमुख तसेच विधिमंडळ गटनेते होते ते आता राज्याच्या सर्वोच्च स्थानी अर्थात मुख्यमंत्रीपदी आहेत. मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांच्यासमोरील राजकीय आव्हाने ही पूर्णपणे बदलली आहेत. त्यांनी ज्या प्रकारे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी फारकत घेत राज्याचे मुख्यमंत्रीपद मिळवले आहे आणि त्याहीपेक्षा म्हणजे पूर्वाश्रमीच्या शिवसेनेची विभागणी करत बाळासाहेबांची शिवसेना अशी स्वतंत्र वाटचाल सुरू केली आहे ते पाहता राज्यामध्ये बाळासाहेबांची शिवसेना अधिकाधिक प्रमाणात कशी वाढेल आणि बाळासाहेबांच्या शिवसेनेचे अधिकाधिक आमदार, खासदार राज्यातून कसे निवडून येतील याची रणनीती आखणे आणि ती अंमलबजावणी करणे याशिवाय एकनाथ शिंदे यांच्यासमोरदेखील पर्याय नाही. राज्यात जर काँग्रेस, राष्ट्रवादीचे राजकीय खच्चीकरण करायचे असेल तर त्याची सुरुवात अर्थातच मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यापासून अर्थात ठाण्यापासून होणे हे सहाजिकच म्हणावे लागेल. त्यामुळे जितेंद्र आव्हाड यांना गेल्या काही दिवसात जो त्रास होत आहे त्याच्या पाठीशी जी काही गणितं आहेत त्यातील ही प्रमुख गणितं आहेत.

राजकीय अभ्यासक म्हणून तसेच समाजशास्त्राचा अभ्यासक म्हणूनदेखील जितेंद्र आव्हाड यांचा आवाका हा चांगल्यापैकी आहे. ठाण्याच्या स्थानिक राजकारणात पूर्वी देखील जितेंद्र आव्हाड यांचे जे वर्चस्व होते ते संपुष्टात आणण्याचे प्रयत्न यापूर्वीदेखील वारंवार झाले आहेत, तथापि जितेंद्र आव्हाड यांचा संघर्षशील स्वभाव, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे ब्लू आईड बॉय म्हणून त्यांचा राज्यातील राष्ट्रवादीच्या वर्तुळात असलेला दरारा यामुळे आव्हाड हे आतापर्यंत त्यांच्या राजकीय विरोधकांना पुरून उरले आहेत. अर्थात, यावेळी मात्र परिस्थिती वेगळी आहे. त्यांचे एकेकाळचे जिवलग मित्र हे आता राज्याचे मुख्यमंत्री आहेत. तर आव्हाडांचा पक्ष हा राज्यात विरोधी पक्षांमध्ये आहे. त्यामुळे जितेंद्र आव्हाड यांच्यासमोरील संघर्षाने आगामी काळात अधिक उग्ररूप धारण केल्यास कोणाला आश्चर्य वाटू नये. मात्र या सर्व राजकीय शहकाटशहाच्या खेळीमध्ये जितेंद्र आव्हाड आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील दिल दोस्ती दुनियादारीला मुठमाती दिली जाते की परस्परांचे राजकीय हितसंबंध जोपासले जातात हे येणारा काळच सांगू शकेल.

Sunil Jawdekarhttps://www.mymahanagar.com/author/sunil-jawdekar/
गेली २८ वर्षे वर्तमानपत्र क्षेत्रात कार्यरत. विविध राजकीय, सामाजिक, प्रशासकीय मुद्द्यांवर आणि पायाभूत सेवासुविधांवर लेखन.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -