घरमहाराष्ट्रLoksabha Election 2024: लोकसभेच्या जागांसाठी शिंदेंची भाजपशी झुंज; उमेदवार निश्चितीत भाजपचा हस्तक्षेप

Loksabha Election 2024: लोकसभेच्या जागांसाठी शिंदेंची भाजपशी झुंज; उमेदवार निश्चितीत भाजपचा हस्तक्षेप

Subscribe

मुंबई – महायुतीत आपल्या गटातील  13 खासदारांच्या मतदारसंघांसह  लोकसभेच्या अतिरिक्त जागा पदरात पाडून घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भाजपशी झुंज द्यावी लागत आहे. शिंदे यांच्यासाठी प्रतिष्ठेच्या असलेल्या ठाणे, कल्याणच्या  जागांबाबतची  अनिश्चितता अद्याप कायम आहे. अशातच शिंदे गटाचे उमेदवार निश्चित करताना भाजपकडून हस्तक्षेप होत असल्याने शिंदे यांच्यावर जाहीर केलेले उमेदवार बदलण्यासाठी दबाव आहे. भाजपच्या या दबाबामुळे शिंदे गटात कमालीची अस्वस्थता आहे.

खासदार कृपाल तुमाने यांना डावलले अन्…

लोकसभा निवडणूक जाहीर होईपर्यंत शिंदे गटाचे नेते लोकसभेच्या 22 जागांवर ठाम होते. 22 पेक्षा एकही जागा कमी घेणार नाही, असा शिंदे गटाचा सूर होता. मात्र, भाजपच्या दिल्लीतील नेत्यांनी डोळे वटारल्यानंतर शिंदे गटाने जागावाटपात नरमाईची भूमिका घेतली आहे. आता 22 नव्हे तर उद्धव ठाकरेंचे नेतृत्व झुगारून सोबत आलेल्या सर्व 13 खासदारांना पुन्हा उमेदवारी मिळवून देण्यात शिंदे यांना अपयश आले आहे. रामटेक लोकसभा मतदारसंघातून मावळते खासदार कृपाल तुमाने यांना डावलण्यात आले आहे. रामटेकमध्ये भाजपच्या सांगण्यावरून शिंदे गटाला काँगेसमधून राजू पारवे यांना आयात करावे लागले.

- Advertisement -

पाच मतदारसंघासाठी भाजपशी झुंज 

आता ठाणे, कल्याण, नाशिक, पालघर, रत्नागिरी- सिंधुदुर्ग आदी महत्वाचे  लोकसभा मतदारसंघ मिळविण्यासाठी एकनाथ शिंदे यांना भाजपशी लढावे लागत आहे. ठाणे अथवा कल्याण यापैकी एक जागा आम्हाला मिळावी, अशी भाजपची मागणी आहे. हे दोन्ही मतदारसंघ मिळणार नसतील तर ठाणे मतदारसंघात भाजप सांगेल तो उमेदवार असावा, अशी अट भाजपने ठेवली आहे. त्यामुळे शिंदे गटाची कोंडी झाली असून कार्यकर्तेही संभ्रमात आहेत. पालघरच्या जागेवर भाजपने हक्क सांगितला आहे. येथील विद्यमान खासदार राजेंद्र गावित हे सध्या शिंदे गटात असले तरी त्यांची ओढ भाजपकडे आहे. त्यामुळे भाजपला पालघरची जागा हवी आहे.

- Advertisement -

हेही वाचा : Uddhav Thackeray : बाळासाहेब ठाकरेंना शब्द दिला ठाकरेंचं वाईट करणार नाही; कोण आणि का म्हणालं हे

नाशिकची जागा राखण्यासाठी धडपड

नाशिक लोकसभा मतदारसंघात हेमंत गोडसे हेच उमेदवार असतील, अशी घोषणा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केली होती. मात्र, आता शिंदे गटाला उमेदवार नव्हे तर जागा राखण्यासाठी धडपडावे लागत आहे. नाशिकमधून उमेदवारी जाहीर व्हावी म्हणून हेमंत गोडसे यांनी ठाण्यात एकनाथ शिंदे  यांच्या निवासस्थानी शक्तिप्रदर्शन केले. याशिवाय पालकमंत्री दादाजी भुसे, गोडसे आणि नाशिक जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी मुंबईत ठाण मांडूनही नाशिकची जागा शिंदे गटाकडून हिसकावून घेतली जात असल्याचे स्पष्ट झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी आपण नाशिकमधून लढावे, असा निर्णय पक्षाने घेतल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे गोडसे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता पूर्णपणे मावळली आहे.

शिंदे गटाने आपल्या पहिल्या यादीत हिंगोलीतून हेमंत पाटील यांना उमेदवारी दिली आहे. भाजपचा हेमंत पाटील यांच्या उमेदवारीला विरोध आहे. त्यामुळे येथील उमेदवार बदलासाठी एकनाथ  शिंदे यांच्यावर दबाव आहे.  यवतमाळ -वाशिम मतदारसंघात विद्यमान खासदार भावना गवळी यांना पुन्हा उमेदवारी देण्यास भाजप अनुकूल नाही. त्यामुळे गवळी यांची उमेदवारी अधांतरी आहे. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ भाजप लढणार हे आता जवळपास स्पष्ट झाले आहे. तर शिंदे गटाला  उस्मानाबादची  (धाराशिव) जागा राष्ट्रवादीला सोडावी लागली आहे.  लोकसभा मतदारसंघाचे वाटप भाजपच्या कलाने होत आहे. सातारची जागा राखण्यासाठी  भाजपने नाशिकची जागा राष्ट्रवादीला सोडली आहे. त्यामुळे शिंदे गटाला या दोन्ही जागा गमवाव्या लागल्या आहेत.

हेही वाचा : Shivsena : मुख्यमंत्र्यांनी आता शेतीची अवजारे तयार ठेवावी; ठाकरे गटाचे एकनाथ शिंदेंना टोले आणि चिमटे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -