घर महाराष्ट्र जयंत पाटीलही जाणार अजित पवारांसोबत, जलसंपदा खात्यासाठी आग्रही; श्रावणात शपथविधी?

जयंत पाटीलही जाणार अजित पवारांसोबत, जलसंपदा खात्यासाठी आग्रही; श्रावणात शपथविधी?

Subscribe

मुंबई : राज्य मंत्रिमंडळाचा तिसऱ्या टप्प्यातील विस्तार येत्या 17 ऑगस्ट 2023 नंतर, म्हणजे श्रावणात होण्याची दाट शक्यता असून, यावेळी देखील धक्कातंत्राचा सिलसिला कायम राहील, असे संकेत मिळत आहेत. या तिसऱ्या राज्य मंत्रिमंडळ विस्तारात राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे विश्वासू समजले जाणारे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा समावेश असेल, असे विश्वसनीय सूत्रांकडून समजते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असलेल्या जलसंपदा खात्यासाठी जयंत पाटील हे आग्रही आहेत. देवेंद्र फडणवीस 20 ऑगस्टपासून पाच दिवस जपानच्या दौऱ्यावर जाणार असल्याने त्याआधी मंत्रिमंडळाचा शपथविधी होईल, असे समजते.

हेही वाचा – अजित पवारांना मुख्यमंत्री करण्याच्या हालचाली सुरू; कॉंग्रेसच्या ‘या’ नेत्याच्या दाव्याने खळबळ

- Advertisement -

गेल्या अडीच वर्षांपासून महाराष्ट्रातील राजकीय क्षेत्र भूकंपप्रवण बनले आहे. 2019च्या निवडणुकीनंतर मुख्यमंत्रीपदाच्या नाट्यापासून अजित पवार यांच्या जुलै 2023मधील भाजपासोबत जात पुन्हा उपमुख्यमंत्रीपद मिळवेपर्यंत राजकीय क्षेत्रात एकापाठोपाठ एक भूकंपाचे धक्के बसतच आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फूटीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याबरोबर असल्याची वारंवार ग्वाही दिली आहे. इतकेच नव्हे तर, मे महिन्यात शरद पवार यांनी राजीनामा दिल्यानंतर पवारांची मनधरणी करताना त्यांना रडू कोसळले होते. आत्तापर्यंत आम्ही सगळे महाराष्ट्रात साहेबांच्या नावाने मत मागतो. आज पवार साहेबच बाजूला गेले तर आम्ही कोणाला घेऊन लोकांच्या समोर जायचे, हा पहिला प्रश्न असल्याचे ते म्हणाले होते. मात्र, त्यांच्यामागे ईडीचा ससेमिरा लागला असून त्यांची एकदा चौकशी सुद्धा झाली आहे. तसेच, जयंत पाटील यांच्याशी संबंधित उद्योगांची चौकशी सुद्धा ईडीच्या रडारवर आहे.

अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यात गेल्या काही वर्षांपासून शीतयुद्ध सुरू आहे, हे वेळोवेळी उघड झाले आहे. महाविकास आघाडी स्थापन झाल्यानंतर खातेवाटप होत असताना अजित पवार उपमुख्यमंत्रीपदाबरोबरच अर्थ खात्यासाठी देखील आग्रही होते. मात्र, अर्थखाते जयंत पाटील यांना देण्याचा विचार सुरू होता. त्यामुळे अजित पवार नाराज झाले होते, असे त्यावेळी सांगण्यात आले होते. गेल्यावर्षी सप्टेंबरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अधिवेशन नवी दिल्लीत पार पडले. त्यावेळी जयंत पाटील यांचे भाषण सुरू असताना अजित पवार सभागृहाबाहेर गेले होते. तर, यंदा जूनमध्ये पक्षाच्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने झालेल्या कार्यक्रमात विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी नको सांगताना, प्रदेशाध्यक्षांच्या कामगिरीचा लेखाजोखा अजित पवारांनी शरद पवार यांच्या उपस्थितीतच मांडला होता.

- Advertisement -

हेही वाचा – ‘राज्याचा कारभार हा वेड्यांच्या हातात‘; राऊतांची सत्ताधाऱ्यांवर टीका

या पार्श्वभूमीवर शनिवारी पुण्यामध्ये प्रसिद्ध उद्योगपती आणि शरद पवार यांचे निकटवर्ती अतुल चोरडिया यांच्या बंगल्यावर शरद पवार आणि अजित पवार यांची भेट झाली. यावेळी जयंत पाटील हेही उपस्थित होते. अजित पवार आणि जयंत पाटील यांचे संबंध लक्षात घेता, सत्तेत सहभागी होण्यासंदर्भात ही भेट झाल्याचे सांगण्यात येते.

सध्या अधिक मास सुरू आहे. हिंदू पंचांगानुसार चांद्रमासाच्या प्रत्येक महिन्यात सूर्य संक्रांत येते. पण अधिक मासात ही संक्रांत नसते. त्यामुळेच या महिन्यात गृहप्रवेश, विवाह, मुंज, नामकरण यासारखे मुहूर्त यात नसतात. म्हणून 17 तारखेपासून सुरू होणाऱ्या श्रावण महिन्यात तिसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे. त्यातही 20 ऑगस्ट 2023 रोजी उपमुख्यमंत्री फडणवीस पाच दिवसांच्या जपान दौऱ्यावर जाणार आहेत. त्यामुळे हा मंत्रिमंडळ विस्तार 17 ऑगस्टनंतर केव्हाही होईल आणि त्यात जयंत पाटील यांच्यासह राष्ट्रवादीचे दोन माजी मंत्री सहभागी होतील, असे सूत्रांनी सांगितले. तथापि, फडणवीस यांच्याकडे असलेल्या जलसंपदा खात्यासाठी जयंत पाटील आग्रही असून भाजपाकडून त्यांची मागणी मान्य केली जाण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात जलसंपदा हे मह्त्त्वाचे खाते जयंत पाटील यांच्याकडेच होते.

शिंदे गटातील किती जणांना संधी?

मंत्री आणि राज्यमंत्री मिळून साधारणपणे महाराष्ट्रात 42 जणांचे मंत्रिमंडळ असते. त्यातील 29 जणांचा शपथविधी झाला आहे. त्यामुळे आता 13 पदे बाकी आहेत. त्यापैकी जयंत पाटील आणि राष्ट्रवादीच्या अन्य दोन मंत्र्यांचा यात संधी मिळेल. मग उरलेल्या 10 पदांसाठी शिंदे गटाबरोबरच भाजपातील इच्छुकांमध्ये स्पर्धा राहील. त्यातही ही सर्व पदे कॅबिनेट स्तराची नसतील, राज्यमंत्री असतील, त्यामुळे या विस्तारानंतर रुसवे-फुगवे जाहीर होण्याची दाट शक्यता आहे.

- Advertisment -