घरदेश-विदेशऔरंगजेबाचा अत्याचार वाढतो तेव्हा या भूमीत छत्रपती शिवाजी उभे ठाकतात

औरंगजेबाचा अत्याचार वाढतो तेव्हा या भूमीत छत्रपती शिवाजी उभे ठाकतात

Subscribe

काशी विश्वनाथ धामच्या लोकार्पणात पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार

काशी ही अलौकीक नगरी आहे. ही नगरी अति प्राचीन आहे. या नगरीला इतिहास आहे. सभ्यता आहे. या नगरीत आल्यावर सर्वच लोक बंधनातून मुक्त होतात. या मातीत एक अलौकिक आणि अद्भूत ऊर्जा आहे, असे सांगतानाच इथे जेव्हा औरंगजेबाचा अत्याचार वाढतो, तेव्हा त्याचा सामना करण्यासाठी या भूमीत छत्रपती शिवाजीच उभे ठाकतात, असे गौरवौद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी येथे काढले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सोमवारी काशी विश्वनाथ धामचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी त्यांनी काशीची प्राचीनता, परंपरा, सभ्यता आणि परंपरेवर भाष्य केले. आक्रमकांनी या नगरीवर आक्रमण केले. या नगरीला उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला. औरंगजेबाच्या अत्याचार आणि दहशतीची ही नगरी साक्षीदार आहे. औरंगजेबाने तलवारीच्या बळावर इथली सभ्यता बदलण्याचा प्रयत्न केला. कट्टरतेने इथली संस्कृती गाडण्याचा प्रयत्न केला. मात्र, या देशाची माती जगापेक्षा वेगळी आहे. इथे जेव्हा औरंगजेब असतो तेव्हा छत्रपती शिवाजीही निर्माण होतात. एखादा सालार मसूद येतो तेव्हा राजा सुहेलदेव सारखे वीर योद्धे आपल्या एकतेचे दर्शनही घडवतात, असे मोदींनी सांगितले. त्यावेळी साधू-संतांनी टाळ्यांचा गडगडाट करत मोदींचा जयजयकार केला.

- Advertisement -

काशीत प्रवेश करणारा सर्व बंधनातून मुक्त होतो असे आपल्या पुराणात म्हटले आहे. भगवान विश्वेश्वराचा आशीर्वाद, एक अलौकिक ऊर्जा इथे आल्यानंतर शरीरात संचारते. इथे आल्यावर केवळ बाबांचे दर्शन मिळत नाही, तर आपल्या इतिहासाची प्रचिती येते. आपल्या गौरवशाली इतिहासाचे दर्शन होते. आपली प्राचीन परंपरा आपल्याला दिशा देत असल्याचे दिसून येते, असे मोदी म्हणाले.

विश्वनाथ धाम हा केवळ एक नवा परिसर नाही. एक केवळ भव्य भवन नाही तर आपल्या सनातन संस्कृतीचे हे एक प्रतिक आहे. आपल्या आध्यात्मिक आत्म्याचे प्रतिक आहे. आपली प्राचीनता आणि परंपरेचे प्रतिक आहे. भारताच्या ऊर्जेचे आणि गतिशीलतेचेही हे प्रतिक आहे, असेही त्यांनी सांगितले.

- Advertisement -

या पवित्र भूमीला छत्रपती शिवाजी महाराजांचा पदस्पर्श झाला. राणी लक्ष्मीबाई, चंद्रशेखर आझाद यांच्यासह कित्येक स्वातंत्र्य सैनिकांची कर्म आणि जन्मभूमी काशीच होती. भारतेन्द्रू हरिश्चंद्र, जयशंकर प्रसाद, मुन्शी प्रेमचंद, पंडित शिवशंकर आणि बिस्मिल्लाह खान आदी प्रतिभावंत याच भूमीतील आहेत, असे सांगतानाच याच भूमीत भगवान गौतम बुद्धांनी अहिंसेचा मार्ग दिला. कबीरदासांसारखेही याच भूमीतील आहेत, असे त्यांनी सांगितले.

तीन संकल्प
पंतप्रधान मोदी म्हणाले, प्रत्येक भारतीयांमध्ये परमेश्वराचा अंश आहे. त्यामुळे मी तुम्हाला काही मागू इच्छितो. हे माझ्यासाठी नाही, तर आपल्या देशासाठी तीन संकल्प करा. स्वच्छता, सृजन आणि आत्मनिर्भर भारतासाठी सततचे प्रयत्न करा. तिसर्‍या संकल्पाची आत्ताच सुरुवात करावी लागेल. हा स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव आहे. आपल्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाली. जेव्हा भारताच्या स्वातंत्र्याला 100 वर्षे पूर्ण होतील, तेव्हा मोठा सोहळा होईल. त्यावेळी भारत कसा असेल, त्यासाठी आत्तापासून काम करावे लागेल, असे आवाहन त्यांनी केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -