पत्नीच्या शिरच्छेदामागे संशयाचे भूत, माथेरानमधील हत्येचा गुन्हा २४ तासात उघड

शिरच्छेद करून महिलेच्या हत्या प्रकरणाचा छडा रायगड पोलिसांनी २४ तासात लावला. महिलेचा शिरच्छेद करणारा हा तिचाच पतीअसून, त्याच्या मुसक्या आवळताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली. या घटनेने रायगड जिल्ह्यात खळबळ उडाली होती. हत्या करताना आरोपीने कोणतेही पुरावे मागे ठेवले नव्हते. मात्र, एका प्रिस्क्रीप्शनच्या आधारे शोध घेत आरोपीला पकडण्यात आले. पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या माथेरानमध्ये एका अज्ञात इसमाने सोबत आलेल्या महिलेचे धडापासून शीर उडवून निर्घृण हत्या केल्याची घटना माथेरानमधील इंदिरा गांधी नगर येथील एका खासगी लॉजवर १२ डिसेंबरच्या पहाटे घडली होती. या घटनेतील मृत महिलेची ओळख पटता न यावी यासाठी आरोपीने घटनास्थळावरील सर्व पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता. सदर महिलेला निर्वस्त्र करून तिच्या कपड्यांसह पर्स तसेच तिचे शीर घेऊन पसार झाला होता.

प्रकरण गुंतागुंतीचे असल्याने माथेरान पोलिसांना तपासात खूप अडथळे येत होते. यावेळी रायगड पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाला गती देण्यात आली. घटनास्थळी कर्जत उपविभागीय पोलीस अधिकारी विजय लगारे, कर्जत पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की, नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र तेंडुलकर तसेच या घटनेचे तपास अधिकारी माथेरान पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय बांगर व त्यांच्या सहकार्‍यांनी या घटनेचा २४ तासाच्या आत उलगडा केल्याने माथेरानसह रायगड पोलिसांचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.

माथेरान हत्याकांड; मृत महिलेची ओळख पटली
माथेरान हत्याकांडातील मृत तरुणीची ओळख पटविण्यात अखेर पोलिसांना यश आले आहे. मृत महिलेचे नाव पूनम रामसिलोचन पाल असून ती गोरेगाव येथील शहीद भगतसिंगनगर, लक्ष्मीनगरची रहिवाशी आहे. पूनम ही विवाहीत असून ती सध्या तिच्या माहेरी वास्तव्यास होती. 11 डिसेंबरला दुपारी तीन वाजता ती तिच्या आईला पनवेल येथे पतीला भेटण्यासाठी जात आहे असे सांगून निघाली. मात्र, दुसर्‍या दिवसांपर्यंत ती घरी परत आली नाही. त्यामुळे तिच्या कुटुंबियांनी तिच्या पतीसह मित्र-मैत्रिणीसह नातेवाईकांकडे तिची विचारणा केली. मात्र, ती कोणाकडेच गेली नसल्याचे उघडकीस आले. त्यानंतर तिचा भाऊ रमेश पाल यांनी बांगुरनगर पोलिसांत पूनमची मिसिंग तक्रार केली होती. या तक्रारीनंतर अवघ्या काही तासांत माथेरान पोलिसांनी बांगुरनगर पोलिसांना फोन करून पूनमविषयी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तिच्याकडे सापडलेली कागदपत्रे आणि सीसीटीव्ही फुटेज पाठविले. या फुटेजची पाहणी केल्यानंतर मृत तरुणी पूनम पाल असल्याचे तिच्या कुटुंबियांनी ओळखले होते. पतीला भेटण्यासाठी जात असल्याचे सांगून ती माथेरानला गेल्याचे तपासात उघडकीस आले आहे. ही माहिती नंतर पाल कुटुंबियांना देण्यात आली आहे. पूनमच्या हत्येच्या वृत्ताने पाल कुटुंबियांना प्रचंड मानसिक धक्का बसला आहे.