घरमहाराष्ट्रआला पावसाळा, सापांपासून जीवाला सांभाळा...

आला पावसाळा, सापांपासून जीवाला सांभाळा…

Subscribe

आला पावसाळा, आरोग्य सांभाळा, असे म्हटले जाते. त्यात आता सापांपासून स्वतःला सांभाळा, असे म्हटले तर ती अतिशयोक्ती ठरणार नाही. कारण पावसाळा आला की, विविध प्रकारचे साप आपल्या बिळांमधून बाहेर पडू लागतात. शेतशिवारात त्यांचा सहज संचार सुरू होतो, त्यामुळे तिथे काम करणार्‍या माणसांना तेे चावल्यामुळे जीवाला धोका निर्माण होऊ शकतो.

मुसळधार कोसळणार्‍या पावसाने बळीराजासह कोरड्या पडत चाललेल्या धरणातील पाण्याचा प्रश्न सुटला असला तरी चार महिने नैसर्गिक आधिवासात राहणार्‍या पशुपक्ष्यांना मात्र आसरा शोधावा लागतो. त्यात साप म्हटला की अंगावर काटा येतो. मातीत, बिळात, झाडावर वास्तव्य करून असणारे साप पाण्याच्या प्रवाहात वाहून जाताना जो अडथळा सापडेल त्याला पकडून स्वतःचा बचाव करतात. शेतात, मोकळ्या भागात साचलेल्या पाण्यामुळे वाट मिळेल तसे सरपटत जाणार्‍या सापांमुळे सर्पदंशाचे प्रकार वाढतात. रोह्यात दहा दिवसांपूर्वी झोपेत असलेल्या महिलेल्या विषारी सापाने दंश केल्यामुळे तिचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली होती.

- Advertisement -

पावसाळ्यात अशा घटना वारंवार घडू शकतात, असे सांगताना सर्पमित्र योगेश शिंदे यांनी अशा दुर्दैवी घटना टाळण्यासाठी घराच्या खिडकीजवळ झाडाच्या फांद्या असल्यास तोडाव्या, तसेच घराबाहेर पडताना पूर्ण बूट आणि रात्री टॉर्चचा वापर जरूर करावा, असे सांगितले. याशिवाय झोपायला पलंग आणि मच्छरदाणीचा वापर, घराजवळ खाद्यपदार्थ टाकल्यास उंदीर येत असल्याने त्यांना खाण्यासाठी साप येतात. त्यामुळे घराजवळ अन्न टाकणे टाळावे, असे सर्पमित्र सांगतात. घर, अंगण, तसेच धान्य ठेवण्याच्या जागी बिळ असल्यास बुजविणे, गोठा किंवा कोंबड्यांची पोल्ट्री झोपण्याच्या जागेपासून दूर असल्यास सर्पदंशाच्या घटना टाळता येतील.

मुख्यतः मण्यार, नाग, घोणस, फुरसे हे चार विषारी जातीचे साप आहेत. गेल्या तीन महिन्यांत सर्पमित्रांनी 48 साप पकडून नैसर्गिक अधिवासात सोडले. त्यापैकी 27 बिनविषारी, तर 21 विषारी होते. साप अचानक समोर आल्यास हालचाल न करता स्तब्ध राहिल्यास साप दंश करणार नाही. स्वतःचा बचाव करण्यासाठी अनेकदा साप दंश करतात.
-योगेश शिंदे, सर्पमित्र, खोपोली

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -