घरमहाराष्ट्रलहरी निसर्ग, अपुरे मनुष्यबळ शेतीच्या मुळावर !

लहरी निसर्ग, अपुरे मनुष्यबळ शेतीच्या मुळावर !

Subscribe

सध्या शेतीच्या कामांची लगबग सुरू असताना मजूर मिळत नसून, दुसरीकडे निसर्गाचा लहरीपणा यामुळे याचा फटका शेतीला, अर्थातच शेतकर्‍याला बसू लागला आहे. ज्या शेतकर्‍यांच्या घरात पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध आहे, असेच शेतकरी सध्या लावणीच्या कामाला लागलेले चित्र दिसून येतात. मजुरांची कमतरता केवळ लावणीच्या हंगामातच जाणवते असे नाही, तर कापणी, बांधणी, मळणी या हंगामात देखील जाणवत असल्याने असंख्य शेतकर्‍यांचा शेती व्यवसाय अडचणीत आला आहे. दुसरीकडे तालुक्यातील बहुतांश शेती खाडीपट्ट्यात असल्याने मोठ्या उधाणामुळे समुद्राच्या बांधांना तडे जात असल्याने पाणी शेतात घुसून शेतकर्‍यांचे प्रचंड नुकसान होते.

कधी काळी रायगड जिल्ह्याची ‘भाताचे कोठार’ अशी ओळख आता पुसली जाऊ लागली आहे. शेती व्यवसाय आतबट्ट्याचा ठरू लागला आहे. त्यामुळे तरुण पिढी शेतीत रस घेण्याऐवजी मोठ्या शहरांकडे नोकरीकडे धाव घेताना दिसते किंवा औद्योगिक वसाहतींमध्ये रोजंदारीवर काम करण्यास पसंती देते. मजूर न मिळणे आणि मिळाले तर अव्वाच्या सव्वा मजुरी द्यावी लागणे, शेतकरी असेल तर मुलीही त्या मुलाशी लग्न करायला तयार होत नाहीत, ही शेतकर्‍यांचा शेतीमधील रस कमी होण्यामागची महत्त्वाची कारणे आहेत.

- Advertisement -

भातशेती ही प्रामुख्याने आदिवासी मजुरांद्वारे केली जाते. नांगरणी आणि पेरणी आटोपली की, लावणी, बेणणी (पिकात वाढलेले गवत काढणे) आणि कापणीसाठी शेतकर्‍यांना प्रामुख्याने आदिवासी मजुरांवर अवलंबून राहावे लागते. मात्र काही वर्षांपासून आदिवासी समाजात शेतमजुरी करण्याचे प्रमाण घटत चालले आहे. शासनाच्या विविध योजनांचा थेट मिळणारा लाभ, या समाजात वाढलेले शिक्षणाचे प्रमाण, यामुळे आदिवासी समाज शेतमजुरीकडे पाठ फिरवू लागला आहे. त्यातूनही जे मजुरी करतात त्यांच्याकडून अव्वाच्या सव्वा मजुरी मागितली जाते. मजुरीबरोबर जेवण आणि पोस्त द्यावा लागतो. आगाऊ रकमेचीही त्यांच्याकडून मागणी केली जाते. इतके करूनही ठरलेल्या दिवशी ते कामावर येतील याची खात्री नसल्याचे शेतकरी सांगतात. परिणामी त्यांना खोळंबून रहावे लागते. अलिकडे अनेक आदिवासी मजूर शेतीच्या मजुरीपेक्षा वीट भट्टीवरील मजुरीला प्राधान्य देताना दिसतात. याचाच परिणाम शेती अर्धेलीने (अर्धा-अर्धा हिस्सा) देण्याचे प्रमाणही वाढलेले आहे.

पेण तालुक्यात औद्योगिकीकरणात झपाट्याने वाढ होत असून, या ठिकाणी रोजगार उपलब्ध होत असल्याने शेतमजूर मिळत नसल्यामुळे शेती करणे अवघड होत आहे.
-काशिनाथ म्हात्रे, शेतकरी

- Advertisement -

परिसरात उद्योग आल्याने या ठिकाणी रोजगार उपलब्ध होतो. तिथे शेत मजुरीपेक्षा मोबदला चांगला मिळतो.
-राजेंद्र वाघमारे, शेतमजूर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -