खोपोली : एका खासगी शाळेने यंदा फीमध्ये तब्बल 30 ते 40 टक्के वाढ केली आहे. यामुळे पालक धास्तावले असून शाळा व्यवस्थापन फीवाढीवर अडून बसली आहे. त्यामुळे आता या फीवाढी विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची युवासेना मैदानात उतरली असून फीवाढ कमी न केल्यास युवासेना स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. खोपोलीतील खरसुंडी गावाशेजारील सेंट मेरी इंग्लिश मीडियम स्कूल व्यवस्थापनाच्या मनमानी फीवाढीमुळे आता गावातील वातावरण तापले आहे.
सेंट मेरी इंग्लिश मीडियम स्कूल व्यवस्थापनाने यंदा फीमध्ये 30 ते 40 टक्के वाढ केली आहे. येथील पालकांची आर्थिक स्थिती एवढी चांगली नसल्याने वाढीव फी डोईजड झाली आहे. त्यातच शाळा व्यवस्थापन फीवाढीवर ठाम आहे. शाळा व्यवस्थापनाच्या अडेल भूमिकेमुळे विद्यार्थ्यांना शाळेत न पाठवण्याचा निर्णय पालकांनी घेतला आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होईल, ही बाब लक्षात घेऊन युवासेना पालकांच्या बाजूने उभी राहिली आहे. युवासेनेच्या कॉलेज कक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आज (10 एप्रिल) खालापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संदीप कराड आणि शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन दिले. आणि फी कमी न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला.
हेही वाचा… Lok Sabha Election 2024 : बाळगंगा प्रकल्पग्रस्तांचा एल्गार, लोकसभा मतदानावर बहिष्कार
या शाळेने सातवीच्या विद्यार्थ्यांची फी 13 हजारांवरन 23 हजार केली आहे. त्यामुळे पालक संतप्त झाले आहेत. म्हणूनच युवासेनेने गटविकास अधिकारी संदीप कराड यांच्या कार्यालयात बैठक आयोजित केले होते. या बैठकीला युवासेना उपजिल्हाधिकारी महेश पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
हेही वाचा… Raigad Rasayani News : हाल, गैरसोयीचे नाव रसायनी रेल्वे स्टेशन
शाळेने वाढवलेली भरमसाठ फी म्हणजे पालकांची आर्थिक लूट करण्याचा कट असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. म्हणूनच गटविकास अधिकारी आणि शिक्षणाधिकाऱ्यांना फी कमी करण्यासाठी निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनाची दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन करू आणि आचारसंहितेच्या काळात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याला प्रशासन जबाबदार राहील, असा इशारा युवासेनेचे कॉलेज कक्ष तालुका अधिकारी प्रतीक शिंदे यांनी दिला आहे.
पालकांशी चर्चा करून फीवाढ
दरम्यान, शाळेत विद्यार्थ्यांसाठी तीन-चार लॅब रूमचे काम सुरू करतोय. त्यासाठी शिक्षक आणि देखभालीचा खर्च लागणार आहे. म्हणूनच या कामाची पालकांशी चर्चा करूनच फीवाढ केली आहे, असा दावा सेंट मेरी इंग्लिश मीडियमच्या मुख्याध्यापिका जिनी सॅम्युअल यांनी केला आहे.