रसायनी : कोकण रेल्वेच्या मार्गावरील रायगड जिल्ह्यातील रसायनी हे महत्त्वाचे रेल्वे स्टेशन आहे. पण औद्योगिक पट्ट्यातील रेल्वे स्टेशन असूनही ते रेल्वे प्रशासनाकडून बेदखल आहे. प्रवाशांचे हाल म्हणजे रसायनी रेल्वे स्टेशन असे म्हटले जाते. यात कधी सुधारण होणार का, असा सवाल रसायनी, पाताळगंगा, खोपोली, खालापूर परिसरीतील हजारो प्रवासी करत आहेत.
रसायनी पाताळगंगा हा औद्योगिकीकरणाचा पट्टा आहे. येथे विविध उद्योगधंदे आहेत. या परिसरात अनेक सरकारी कार्यालये, पिल्लई इंटरनॅशनल कॉलेज, अर्थव्यवस्थेचे प्रशिक्षण देणारा सेबी प्रकल्प तसेच जवळूनच गेलेला मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग आदींमुळे रसायनी आणि परिसराचा नावलौकिक आहे. असे असूनही रसायनी रेल्वे स्टेशन कायम दुर्लक्षित राहिले आहे. सुविधांअभावी रसायनी स्टेशनात प्रवाशांचे अतोनात हाल होणार आहेत.
हेही वाचा… Raigad News : आमदार गोगावलेंविरोधात थेट राष्ट्रपतींना पत्र
या स्टेशनात दिवा-मुंबई, रत्नागिरी, गोव्याच्या दिशेने येणाऱ्या रेल्वे थांबतात. तरीही रसायनी स्टेशनवर निवारा शेड नाही. त्यामुळे प्रवाशांना भर उन्हात आणि भर पावसात गाडीची वाट पाहात उभे राहावे लागते.
गंभीर बाब म्हणजे स्टेशनवर जशी निवारा शेड नाही तसेच प्रवाशांना बसण्यासाठी बाकड्यांचीही व्यवस्था नाही. त्यामुळे लहान-मोठे, वृद्ध, गरोदर सर्वांना उभे ताटकळत राहावे लागते. पिण्याच्या पाण्याचीही व्यवस्था रेल्वे स्टेशनात नाही. पाण्यासाठी प्रवाशांना काही अंतर पायपीट करत जावे लागते. रेल्वेचे तिकीट घरही स्टेशनापासून काही अंतरावर आहे. याव्यतिरिक्त स्टेशनमध्ये कधीही कुठलीही घोषणा केली जात नाही. शिवाय स्वच्छतेचा अभाव आणि स्टेशनालगत वाढलेले गवत यामुळे रसायनी स्टेशन सोयीचे कमी आणि गैरसोयीचे अधिक, अशी प्रवाशांची तक्रार आहे.
हेही वाचा… Alibaug Raigad Crime : विवाहबाह्य संबंधांसाठी आईकडूनच दोन चिमुरड्यांची हत्या
रसायनी स्टेशनची ही परिस्थिती पाहिली तर हे स्टेशन प्रवाशांसाठी आहे का, असा महत्त्वाचा सवाल प्रवाशांकडून उपस्थित केला जात आहे. आता तरी रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या गैरसोयींची दखल घेऊन रेल्वे स्टेशनमध्ये सुधारणा कराव्यात, अशी मागणी प्रवासी करत आहेत.