घरमहाराष्ट्रनाशिकLok Sabha 2024 : हेमंत गोडसेंच्या उमेदवारीवरून नाशकात वादाची ठिणगी, भाजपाच्या आमदार-पदाधिकाऱ्यांची...

Lok Sabha 2024 : हेमंत गोडसेंच्या उमेदवारीवरून नाशकात वादाची ठिणगी, भाजपाच्या आमदार-पदाधिकाऱ्यांची तक्रार

Subscribe

नाशिक लोकसभेत महायुतीत वादाची ठिणगी पडली आहे. कारण हेमंत गोडसे यांच्या उमेदवारीला नाशिकमधील भाजपाच्या आमदारांनी आणि पदाधिकाऱ्यांनी कडाडून विरोध केला आहे.

नाशिक : नाशिक लोकसभेचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांनी उमेदवारी जाहीर केली आहे. नाशिक लोकसभेतून ते तिसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार अशी घोषणा दोन दिवसांपूर्वी शिंदे यांच्याकडून करण्यात आली. परंतु, यामुळे आता नाशिक लोकसभेत वादाची ठिणगी पडली आहे. कारण हेमंत गोडसे यांच्या उमेदवारीला नाशिकमधील भाजपाच्या आमदारांनी आणि पदाधिकाऱ्यांनी कडाडून विरोध केला आहे. खासदार श्रीकांत शिंदे यांनी महायुतीत कोणाला विचारून हेमंत गोडसे यांना उमेदवारी जाहीर केली? असा प्रश्न भाजपाकडून उपस्थित करण्यात आला आहे. ज्यामुळे आता नाशकात वादाची ठिणगी पडल्याचे बोलले जात आहे. (Lok Sabha 2024: BJP opposed Shiv Sena’s Hemant Godse’s candidature in Nashik )

हेही वाचा… Uddhav Thackeray : ठाकरेंनी रुग्णवाहिकेचे उद्घाटन केले नाही; कार्यकर्ते शिंदे गटात दाखल

- Advertisement -

मंगळवारी (ता. 12 मार्च) नाशिकमध्ये शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात श्रीकांत शिंदे यांच्याकडून खासदार हेमंत गोडसेंच्या नावाची घोषणा करण्यात आली. आपला धनुष्यबाण नाशिकमध्येच राहणार आहे. आपल्या सर्वांना पुन्हा एकदा हेमंत आप्पा गोडसे यांना तिसऱ्यांदा लोकसभेत पूर्ण बहुमताने पाठवायचे आहे,” असे म्हणत श्रीकांत शिंदे यांच्याकडून गोडसेंच्या नावाची घोषणा करण्यात आली. परंतु, याला आता भाजपाच्या नाशकातील पदाधिकाऱ्यांनी आणि महत्त्वाची बाब म्हणजे आमदारांकडूनच विरोध करण्यात आला आहे. हेमंत गोडसेंनी युतीधर्म पाळला नाही, भाजपला दुय्यम वागणूक दिल्याचा भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.

पक्षीय बलाबल बघता नाशिकची जागा भाजपाला मिळावी अशी मागणी गुरुवारी नाशिक भाजपा कार्यालयात झालेल्या बैठकीत करण्यात आली. नाशिक जिल्ह्यातील आमदार आणि पदाधिकाऱ्यांनी गिरीश महाजन यांच्याकडे ही मागणी केली आहे. भाजपाचे प्रदेश प्रवक्ते लक्ष्मण सावजी यांनी याबाबत गिरीश महाजन यांच्याकडे कार्यकर्त्यांची इच्छा बोलून दाखवली. नाशिकचे खासदार हेमंत गोडसेंनी मागच्या दोन्ही टर्ममध्ये भाजपाला नेहमी दुय्यम वागणूक दिली आहे. परंतु, खासदार श्रीकांत शिंदेंनी गोडसेंच्या नावाची घोषणा करताना महायुतीच्या इतर कोणालाही विचारात का घेतले नाही? असा सवालही भाजपाने उपस्थित केला.

- Advertisement -

नाशिकमधील आकडेवारीनुसार सद्याची राजकीय परिस्थिती पाहता तेथे भाजपाचे 66 नगरसेवक आणि 3 आमदार आहेत. तर भाजपाकडून नाशिकमध्ये लोकसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी 12 ते 15 जण इच्छुक आहेत. त्यामुळे गिरीश महाजन यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी करून ही भाजपाकडे घ्यावी. कारण 2014, 2019 ची टर्म असलेले हेमंत गोडसेंनी युती धर्म पाळला नाही. गोडसे यांनी फक्त शिवसेना खासदार म्हणून काम केले, युतीचा म्हणून नाही. खासदार निधीतून भाजपाला त्यांनी निधी दिला नाही, फक्त शिवसेनेला दिला, असा आरोप भाजपाच्या आमदारांकडून आणि पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आला आहे. तर महायुतीकडून हेमंत गोडसे यांची अधिकृत उमेदवार अशी घोषणा झालेली नाही, ज्यामुळे या जागेवर भाजपाचा हक्क आहे, असेही भाजपाकडून सांगण्यात आले आहे. ज्यामुळे आता येणाऱ्या काळात भाजपाकडून आणि विशेषतः महायुतीकडून या जागेबाबत कोणता निर्णय घेण्यात येतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -