घरमहाराष्ट्रLok Sabha 2024 : गेल्या 10 वर्षात एकही दंगल नाही, मुख्यमंत्री शिंदेंचा...

Lok Sabha 2024 : गेल्या 10 वर्षात एकही दंगल नाही, मुख्यमंत्री शिंदेंचा कोल्हापुरातून दावा

Subscribe

महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापुरात हजेरी लावली. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामाचे कौतुक करत गेल्या 10 वर्षांमध्ये एकही दंगल झाली नसल्याचा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून करण्यात आला आहे.

कोल्हापूर : राज्यासह देशभरातील उत्साह हा शिगेला पोहोचला आहे. एकेक करून सर्वच पक्षाचे उमेदवार आपला अर्ज दाखल करू लागले आहेत. यंदा कोल्हापूर आणि हातकणंगले मतदारसंघातील लढत रंगतदार होणार असून या दोन्ही मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूर येथे हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामाचे कौतुक करत गेल्या 10 वर्षांमध्ये एकही दंगल झाली नसल्याचा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून करण्यात आला आहे. (Lok Sabha Election 2024 CM Eknath Shinde claims there has not single riot in last 10 years)

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, आपल्याला विकासाला मत द्यायचे आहे. त्यामुळे कोल्हापुरकरांनी ठरविल्यानंतर ते शब्दाला पक्के असल्याने दिलेला शब्द पाळतात. आमच्या सरकारने देखील शब्द दिला की, तो शब्द आम्ही फिरवत नाही. म्हणून आपण निवडून दिलेले दोन्ही खासदार कोल्हापुरातील पंचगंगेमधील प्रदुषण कमी केल्याशिवाय राहणार नाहीत. त्याचबरोबर महापुरामध्ये दरवर्षी नुकसान होते, त्यासाठी आपल्या सरकारने साडेतीन हजार कोटींचा प्रकल्प हाती घेतला आहे. 3500 कोटींचा प्रकल्प पंचगंगेचे प्रदुषण थांबविण्यासाठी केला आहे आणि म्हणून विकासाला महत्त्व देणारे हे सरकार असल्याने आपले एक मत मोदींना जाणार आहे.

- Advertisement -

हेही वाचा… Lok Sabha 2024 : दहा वर्षं काय केले? जाहीरनाम्यावरून जितेंद्र आव्हाडांचा भाजपाला सवाल

तसेच, महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांना मत म्हणजे पंतप्रधान मोदींना मत. संजय मंजलिक यांना मत म्हणजे देशाच्या विकासाला मत, धैर्यशील माने यांना मत म्हणजे देशाच्या प्रगतीला मत. पंतप्रधान मोदी यांनी संपूर्ण जीवन देशाला समर्पित केले आहे. 2014 पूर्वी या देशात दंगे, घोटाळे, भ्रष्टाचार बॉम्बस्फोट होत होते. पण आता 2014 नंतर एकही दंगल, बॉम्बस्फोट, भ्रष्टाचार देशात झाला नाही, असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. परंतु, महत्त्वाची बाब म्हणजे मुख्यमंत्र्यांनी ज्या कोल्हापुरातून दंगल झाली नसल्याचा दावा केला आहे, त्याच कोल्हापुरात जून 2023 मध्ये मोठी दंगल उसळली होती.

- Advertisement -

कोल्हापुरातील दंगल…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 2014 नंतर राज्यासह देशभरात दंगल झाली नसल्याचा दावा आज सोमवारी (ता. 15 एप्रिल) केला. पण ज्या कोल्हापुरातील सभेतून मुख्यमंत्र्यांकडून दावा केला आहे, त्याच जिल्ह्यात जून 2023 मध्ये मोठी दंगल उसळली होती. त्या प्रकरणात 36 जणांना ताब्यात घेण्यात आले होते. औरंगजेबाचे स्टेटस ठेवून त्याचे उदात्तीकरण केल्याच्या निषेधार्थ हिंदुत्ववादी संघटनांनी पुकारलेल्या कोल्हापूर बंदला हिंसक वळण लागले होते. ज्यानंतर जाळपोळ आणि समाजामध्ये तेढ निर्माण झाला होता.

कोल्हापुरात दंगलसदृष्य परिस्थिती निर्माण झाल्यानंतर तिथे चार सीआरपीएफ कंपन्या, 300 पोलीस कॉन्स्टेबल्स आणि 60 अधिकारी सुरक्षेसाठी तैनात करण्यात आले होते. तर 36 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. ज्यामध्ये पाच महाविद्यालयीन तरुण आणि तीन अल्पवयीन मुलांचा समावेश होता. या व्यतिरिक्त बीडमधील दंगल, देशात दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांनी केलेले आंदोलन यांसारख्या अनेक घटना घडल्या आहेत. पण मुख्यमंत्र्यांना देशातील काय पण त्यांच्या दोन वर्षांच्या कार्यकाळातील दंगलीच्या आणि जाळपोळीच्या घटनांचाही विसर पडल्याचेच पाहायला मिळत आहे.

हेही वाचा… Sanjay Raut : मुख्यमंत्री कार्यालयातून 500 कोटी गोळा केले, संजय राऊतांचा श्रीकांत शिंदेवर आरोप


Edited By : Poonam Khadtale

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -