घरमहाराष्ट्रNair fire : भाजपा आणि मिंधे गॅंगवाले महाराष्ट्राचा एवढा द्वेष का करतात?...

Nair fire : भाजपा आणि मिंधे गॅंगवाले महाराष्ट्राचा एवढा द्वेष का करतात? आदित्य ठाकरेंचा सवाल

Subscribe

विद्यार्थ्यांच्या मते कॅन्टीनमध्ये अतिशय निकृष्ट अन्न दिले जात आहे. एवढेच नव्हे तर, सुरक्षेच्या उपाययोजना करूनही निवासी डॉक्टर आणि विद्यार्थ्यांचे फोन चोरीला जात आहेत, असा दावा आदित्य ठाकरे यांनी केला आहे.

मुंबई : काही दिवसांपूर्वी मुंबई सेंट्रल येथील नायर हॉस्पिटल अँड डेंटल कॉलेजच्या वसतिगृहाच्या इमारतीमध्ये आग लागली होती. या आगीत कोणतीही जीवित हानी झाली नसली तरी, या घटनेवरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी ट्वीट करत राज्य सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला आहे. (Nair hospital fire: Aditya Thackeray targets Shinde Fadnavis Pawar government)

नायर हॉस्पिटल अँड डेंटल कॉलेजच्या वसतिगृहाच्या दहाव्या मजल्यावरील एका खोलीत 6 एप्रिल रोजी संध्याकाळी आग लागली होती. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, कारण ती विद्युत तारा आणि इतर फिटमेंट्सपुरती मर्यादित होती आणि 20 मिनिटांत ती आटोक्यात आली, असे त्यावेळी अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्याने सांगितले होते. मात्र यावरून राज्याचे माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकार तसेच मुंबई महानगरपालिकेवर जोरदार टीका केली आहे.

- Advertisement -

भाजप प्रणित मिंधे राजवटीने 15 मार्च 2024ला आचारसंहिता लागण्यापूर्वी अत्यंत घाईगडबडीत ‘नायर हॉस्पिटल डेंटल क्लिनिकच्या’ नवीन वसतिगृहाचं धूमधडाक्यात उद्घाटन केले. पण आजची परिस्थिती अशी आहे की, जवळपास 10 दिवस वसतिगृहात वीज आणि पाणी नाही. फायर अलार्म काम करत नाहीत, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Sanjay Raut : मुख्यमंत्री कार्यालयातून 500 कोटी गोळा केले, संजय राऊतांचा श्रीकांत शिंदेवर आरोप

गेल्या आठवड्यात आग लागली, सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही, पण काही खोल्या पूर्णपणे जळून खाक झाल्या आहेत. तिथे पुरेसे फायर प्रोटोकॉल पाळले आहेत का? असा सवाल उपस्थित करून आदित्य ठाकरे म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या मते कॅन्टीनमध्ये अतिशय निकृष्ट अन्न दिले जात आहे. एवढेच नव्हे तर, सुरक्षेच्या उपाययोजना करूनही निवासी डॉक्टर आणि विद्यार्थ्यांचे फोन चोरीला जात आहेत. रात्रीच्या वेळी कोणीही अनोळखी व्यक्ती बिनधास्त आत येऊ-जाऊ शकते, असा दावा त्यांनी केला आहे.

विद्यार्थ्यांचा विरोध, आक्रोश घटनाबाह्य मुख्यमंत्री आणि मुंबई महानगरपालिका प्रशासनाला ऐकू जात नाही का? अशी विचारणा त्यांनी केली आहे. मिंधे गॅंग भाजपासोबत आपल्या जागांच्या वाटाघाटी आणि घाणेरडे राजकारण करण्यात व्यग्र आहे. त्यांना फक्त होर्डिंग्ज आणि बॅनर्स लावून उद्घाटनाची नाटके करायला हवी, भाजपा आणि मिंधे गॅंगवाले महाराष्ट्राचा एवढा द्वेष का करतात? असा सवाल त्यांनी केला आहे.

हेही वाचा – Shrikant Shinde : पत्राचाळीचे आरोपीच पत्र लिहू लागलेयत, श्रीकांत शिंदेंचा राऊतांना टोला


Edited by – Manoj S. Joshi

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -