घरमहाराष्ट्रपाठीत खंजीर खुपसल्याच्या रागाने राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापन केलं; पहाटेच्या शपथविधीवर फडणवीसांचा खुलासा

पाठीत खंजीर खुपसल्याच्या रागाने राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापन केलं; पहाटेच्या शपथविधीवर फडणवीसांचा खुलासा

Subscribe

राज्यात पार पडलेल्या पहाटेचा शपथविधी कोणीही विसरू शकणार नाही. अजित पवार यांच्यासोबत घेतलेल्या पहाटेच्या शपथविधीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी खुलासा केला आहे. पाठीत खंजीर खुपसल्याच्या रागाने राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापन केलं असा खुलासा फडणवीस यांनी केला. अजित पवार यांच्यासोबत सरकार स्थापन केल्याचा पश्चाताप होत नाही. पण असं सरकार स्थापन करायला नको होतं. ती चूकच होती. शंभर टक्के सांगतो. ती चूकच होती. पण त्याचा पश्चाताप होत नाही, अशी कबुली देखील फडणवीस यांनी दिली. देवेंद्र फडणवीस यांनी ‘दैनिक लोकसत्ता’ला दिलेल्या मुलाखतीत हा खुलासा केला आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांच्यासोबत पहाटेला शपथ का घेतली याचा खुलासा केला. “त्या गोष्टीचा पश्चाताप होत नाही, पण एवढंच सांगतो असं सरकार करायला नको होतं, ही चूक आहे. शंभर टक्के सांगतो ही चूक असली तरी पश्चाताप होत नाही. कारण ज्यावेळी तुमच्या पाठीत खंजीर खूपसला जातो त्यावेळी राजकारणात तुम्हाला जिवंत राहावं लागतं. त्यामुळे जिवंत राहण्यासाठी जे जे करावं लागतं ते करावं लागतं. कारण राजकारणात तुम्ही मेलात तर मला असं वाटतं त्याला उत्तर देता येत नाही. म्हणून आपल्या पाठित खंजीर खूपसला गेला तर आपण जशास तसं उत्तर दिलं पाहिजे या भावनेतून… ज्या काही भावना होत्या… इमोशन होते… राग होता… त्या मिश्र भावनेतून तो निर्णय घेतला. जेव्हा ही संधी आली तेव्हा आम्ही त्या संधीचा फायदा घेतला,” असा मोठा खुलासा फडणवीस यांनी केला.

- Advertisement -

अजितदादांसोबत शपथ घेतल्याने माझ्या प्रतिमेला तडा

देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांच्यासोबत शपथ घेतल्याने माझ्या प्रतिमेला तडा गेला, अशी कबुली देखील दिली. “अजितदादांसोबत जाण्याचा आमचा हा निर्णय किंवा आमची ही भूमिका आमच्या समर्थकांना आवडली नाही. बाकीच्यांचं सोडून द्या, पण भाजपच्या समर्थकांना ते अजिबात आवडलं नाही. किंबहूना आमच्या समर्थकांच्या मनात माझी जी प्रतिमा होती त्या प्रतिमेलाही बऱ्यापैकी तडा गेला, हे मी मान्य करतो. मला वाटतं ते केलं नसतं तर अधिक चांगलं झालं असतं. पण त्यावेळी मला ते अधिक योग्य वाटलं, हे देखील सांगतो,” असं फडणवीस यांनी सांगितलं.

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -