घरट्रेंडिंगMahananda Dairy : 'महानंद'चे अध्यक्ष राजेश परजणे यांचा राजीनामा; एनडीडीबीकडे हस्तांतरित होणार

Mahananda Dairy : ‘महानंद’चे अध्यक्ष राजेश परजणे यांचा राजीनामा; एनडीडीबीकडे हस्तांतरित होणार

Subscribe

अहमदनगर : ‘महानंद’ ही महाराष्ट्रातल्या सर्व सहकारी दूध संस्थांची शिखर संस्था मानली जाते. मंगळवार, 21 फेब्रुवारी रोजी ‘महानंद’चे अध्यक्ष राजेश परजणे यांच्यासह सर्व संचालकांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून याचे पत्र महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले आहे. यामुळे महानंद एनडीडीबीकडे हस्तांतरित करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

अनेक दिवसांपासून चर्चेत

अनेक दिवसांपासून महानंद एनडीडीबीकडे हस्तांतरित करण्याच्या मुद्द्यावरून राजकारण तापलं होतं. ‘महानंद’च्या रूपाने आणखी एक प्रकल्प गुजरातला जात असल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू होते. महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघ मर्यादित, मुंबई (महानंदा) या दुग्धव्यवसायातील आणि सहकारातील शिखर संस्थेच्या संचालक मंडळाची 13वी बैठक नुकतीच मुंबईत झाली. महानंदची सध्याची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने तिचे पुनरुज्जीवन करणे आवश्यक आहे. यासाठी दूध महासंघाचे राष्ट्रीय दुग्धविकास मंडळाकडे हस्तांतरण करण्याचे नियोजित आहे. याबाबतचा विस्तृत डीपीआर राष्ट्रीय दुग्धविकास मंडळाने तयार केला आहे. मंडळाने शासन आणि महानंदला सादर केलेल्या प्रस्तावानुसार रु. 253.57 कोटी इतकी रक्कम शासनाकडून मदत, soft loan किंवा भागभांडवल स्वरुपात देण्याबाबतचा प्रस्ताव शासनास पाठविण्यात यावा, असा बैठकीत निर्णय घेण्यात आला. यातून कर्मचारी स्वेच्छा निवृत्ती तसेच महानंदची विद्यमान यंत्रणेत बदल करण्यासाठी सदर निधी आवश्यक आहे. दरम्यान, मंडळाच्या अहवालानुसार विद्यमान संचालक मंडळाने राष्ट्रीय दुग्धविकास मंडळाच्या कारभारात हस्तक्षेप करणे अपेक्षित नाही. त्यानुसार, ‘महानंद’चे अध्यक्ष राजेश परजणे, आ. माणिकराव कोकाटे आणि इतर 15 अशा एकूण 17 संचालकांनी संचालक पदाचे राजीनामे महाराष्ट्र राज्य सहकारी दूध संघाचे व्यवस्थापकीय संचालक कान्हुराज बगाटे यांच्याकडे सुपूर्द केले.

- Advertisement -

हेही वाचा – Maratha Reservation: जरांगेंना प्रसिद्धीची नशा चढलीय; भुजबळांची टीका, म्हणाले, ते मारुतीचं शेपूट…

संचालक मंडळ नको असल्याची अट

महानंद ही दुग्धव्यवसायातील शिखर संस्था आहे. राष्ट्रीय दुग्धविकास मंडळ आनंद या संस्थेकडे पुनरुज्जीवन प्रक्रिया सुरु करण्यासाठी हस्तांतरीत करण्यात येणार आहे. दूध महासंघाचे तसेच महाराष्ट्र राज्यातील सहकारी जिल्हा / तालुका संघ, प्राथमिक दूध संस्था व दूध उत्पादक यांना दुग्धव्यवसायात आर्थिक स्थैर्य प्राप्त होण्यासाठी दूध महासंघाच्या संचालक पदाचा राजीनामा देत असल्याचे राजीनामा पत्रात नमूद केले आहे. महानंद एनडीडीबीकडे हस्तांतरित करण्यासाठी महत्त्वाची अट संचालक मंडळ नसण्याची होती. आता संचालक मंडळाने राजीनामा दिल्याने महानंदा एनडीडीबीकडे हस्तांतरित करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

- Advertisement -

शासनाचा सकारात्मक प्रतिसाद

महानंद एनडीडीबीकडे हस्तांतरित करण्यासाठी संचालक मंडळाने राजीनामा दिल्यानंतर संचालक आ. माणिकराव कोकाटे यांनी या हस्तांतरण प्रक्रियेबाबत शासना मंत्र्यांशी चर्चा केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार, दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याचे सांगितले.

हेही वाचा – Maharashtra Politics : संजय राऊतांचा महायुती सरकारवर गंभीर आरोप, म्हणाले…

संजय राऊत यांच्या आरोपामुळे महानंदा चर्चेत

शिवसेना उद्धव गटाचे प्रवक्ता खा.संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वी महानंदा प्रकल्प गुजरातला जात असल्याचे आरोप केले होते. त्याचबरोबर दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे मेहुणे राजेश परजणे हे महानंदचे अध्यक्ष असून भ्रष्टाचाराचे आरोप त्यांच्यावर केले होते. त्यामुळे राज्यभर हा विषय चर्चेत आला होता. त्यानंतर महानंदचे अध्यक्ष राजेश परजणे यांनी सर्व आरोप फेटाळून लावले होते.

अन्यथा संजय राऊत यांनी राजकारणातून निवृत्ती घ्यावी

खासदार संजय राऊत अनेक दिवसांपासून महानंदचे अध्यक्ष राजेश परजणे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करत आहेत. यावर परजणे म्हणाले की, संजय राऊत जे आरोप करत आहेत ते त्यांनी सिद्ध करावे. आरोप सिद्ध झाले तर मी सहकार आणि राजकारणातून निवृत्ती घेईन. सिद्ध नाही केले तर त्यांनी राजकारणातून निवृत्ती घ्यावी, असं आव्हानही परजणे यांनी दिले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -