सोलापूर : एकीकडे उकाड्याने हैराण झालेलं असतानाच दुसरीकडे मात्र गेल्या चार दिवसांपासून राज्यातील काही जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा तडाखा बसला आहे. काही प्रमाणात गारवा जाणवत असला तरी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. त्यामुळे बळीराजा चिंतेत सापडला आहे. तर अवकाळी पावसामुळे दक्षिण सोलापुरात अंगावर वीज पडल्याने चिमुकलीने आपला जीव गमावला आहे. (Maharashtra Weather Unseasonal rains Huge loss of crops child lost his life)
विदर्भ ते मध्य अरबी समुद्रातील सक्रीय ट्रॉफमुळे हा पाऊस पडत असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे. त्यांनी सांगितले की, पश्चिमेच्या दिशेने ट्रॉफ सरकू लागल्याने पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात पावसाचे आगमन झाले आहे. सोलापूर, पुणे, कोल्हापूर आणि धाराशिव जिल्ह्यासह कोकणात वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली असून काही भागात गारांचा पाऊस पडल्याचं चित्र आहे. अक्कलकोटमध्ये पडलेल्या मुसळधार पावसामुळे बसलेगाव ते गरोळगी या दोन गावांची वाहतूक बंद झाली आहे. धाराशिवच्या तुळजाभवानी मंदिरात पावसाचे पाणी शिरले आहे.
लातूर जिल्ह्यातील अनेक भागात आज दुपारीच पावसाने जोरदार हजेरी लावली. अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाल्याचे पाहायला मिळाले. मुसळधार पावसामुळे काही गावात झाडे उन्मळून पडली आहेत. कोल्हापुरात दुसऱ्या दिवशीही मुसळधार पाऊस कोसळला. त्यामुळे जिल्ह्यातील तापमान 22 अंश सेल्सिअसपर्यंत घसरले. कोकणात सोसाट्याच्या वाऱ्यासह सुरू असलेल्या पावसामुळे जिल्हा प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट, बार्शी तालुक्यासह विविध ठिकाणी पावसाने झोडपून काढले आहे. वादळी वाऱ्यासह पडणाऱ्या पावसाचा सर्वात मोठा फटका ज्वारी पिकांना बसला आहे. तसेच किल्लारी भागातील द्राक्ष बागा आणि लातूर जिल्ह्यातील केशर आंब्याच्या बागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
अंगावर वीज पडल्याने चिमुकलीचा मृत्यू
दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुस्ती गावात पडलेल्या अवकाळी पावसामुळे चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. शेतात असताना लावण्या हनुमंता माशाळे या 8 वर्षीय चिमुकलीला अंगावर वीज पडल्याने आपले प्राण गमवावे लागले आहेत. चिमुकलीच्या मृत्यूने संपूर्ण दक्षिण सोलापुरात हळहळ व्यक्त होत आहे.
Edited By – Rohit Patil