घरमहाराष्ट्रमराठा आरक्षणावरून राज्य सरकारला मनोज जरांगेंचा इशारा, म्हणाले - "GR आला नाही...

मराठा आरक्षणावरून राज्य सरकारला मनोज जरांगेंचा इशारा, म्हणाले – “GR आला नाही तर…”

Subscribe

राज्य सरकारची पत्रकार परिषद पार पडल्यानंतर मनोज जरांगे यांनी जालना येथील अंतरवली सराटी गावातून आपले मत व्यक्त केले. यावेळी त्यांनी सरकारला थेट इशाराच दिला आहे.

जालना : सरकारचे शिष्टमंडळ जीआर घेऊन येणार आहे, अशी मला 100 टक्के आशा आहे. आम्ही त्याची वाट पाहतोय. पण जीआर आला नाही तर.. असे म्हणत मराठा आंदोलनाचे समन्वयक असलेले मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला इशारा दिला आहे. जालन्यात मागील आठवड्यात शुक्रवारी (ता. 1 सप्टेंबर) मराठा आंदोलकांवर पोलिसांकडून अमानुषपणे लाठीहल्ला करण्यात आला. अंतरवली सराटी गावातील हे आंदोलन हाणून पाडण्यासाठी सरकारकडून अशा प्रकारे अमानुषपणे लाठीहल्ला करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. परंतु, या प्रकरणी आता तीन दिवसानंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पत्रकार परिषद पार पडली. ज्यानंतर मनोज जरांगे यांनी सरकारला इशारा दिला आहे. (Manoj Jarange warns the state government about Maratha reservation)

हेही वाचा – मराठा समाजाबाबत गळा काढणारे तेच आणि घोटणारेही तेच, मुख्यमंत्री शिंदेंनी विरोधकांना सुनावले

- Advertisement -

राज्य सरकारची पत्रकार परिषद पार पडल्यानंतर मनोज जरांगे यांनी जालना येथील अंतरवली सराटी गावातून आपले मत व्यक्त केले. यावेळी बोलताना ते म्हणाले की, मराठा आरक्षणाचा अध्यादेश घेऊन या. तुम्ही चर्चेचे दार खुले केले असे म्हणून पहिल्याचे पाढे गिरवत बसू नये. त्यामुळे सरकारने आमचे आरक्षण जाहीर केले असेल, सरकारने शंभर टक्के मराठ्यांना आरक्षण देण्याचा निर्णय घेतला असेल, सरकारने शंभर टक्के आरक्षणाचा निर्णय घेतला असेल. कारण त्याठिकाणी छत्रपती घराण्याचे वंशज उदयनराजे भोसले देखील होते. सरकारचे शिष्ठमंडळ येताना मराठा आरक्षणाच्या विजयाचे पत्र घेऊन येईल, असा विश्वास जरांगे यांनी व्यक्त केला.

तसेच, सरकारचे शिष्टमंडळ जीआर घेऊन येत आहे. आम्ही त्याची वाट पाहतोय. पण जीआर आला नाही तर आंदोलन मागे घेणार नाही. जीआर आला नाही तर उद्यापासून पाणी सुटले असे समजा. सरकारच्या प्रतिनिधींची आपण वाट पाहूया. त्यानंतर मी अधिकृत भूमिका जाहीर करेन. आम्ही आता अधिकृत असे काहीच बोलू इच्छित नाही. पण महाराष्ट्रातील मराठा समाजाला आरक्षण दिल्याचा जीआर घेऊनच सरकारचे शिष्टमंडळ येईल, असे त्यांच्याकडून पुन्हा सांगण्यात आले.

- Advertisement -

सरकारला दोन दिवसांचा वेळ आहे. मराठा घाबरलेला नाही. प्रत्येकाच्या कनाकनात ऊर्जा आहे. मी मराठ्यांना आरक्षण मिळवून देणार तेव्हाच थांबणार. त्यांचे शिष्टमंडळ येणार आहे, अशी माहिती मिळाली आहे. या शिष्टमंडळाने माहिती दिल्यानंतर आमची गावकऱ्यांसोबत बैठक पार पडेल. या बैठकीत पुढच्या आंदोलनाची दिशा ठरवली जाईल, असे मनोज जरांगे यांच्याकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे सरकारकडून खरंच मराठा आरक्षणाबाबतचा जीआर येतो की नाही हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -