घरनवी मुंबईAtal Setu : अटल सेतूमुळे एमएमआरडीए चिंतेत, महिन्याभरात जमला 'इतकाच' महसूल

Atal Setu : अटल सेतूमुळे एमएमआरडीए चिंतेत, महिन्याभरात जमला ‘इतकाच’ महसूल

Subscribe

नवी मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते महिन्याभरापूर्वी अटल बिहारी वाजपेयी शिवडी-न्हावाशेवा सागरी सेतूचे उद्घाटन करण्यात आले. या सागरी सेतूमुळे मुंबईहून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळालेला असला तरी या सेतूकडे प्रवाशांनी पाठ फिरवल्याचे पाहायला मिळत आहे. कारण सागरी सेतूवरुन दिवसाला 70 हजार वाहने धावतील असा दावा मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने अर्थात एमएमआरडीएने केला होता. मात्र महिन्याभरात या सागरी सेतूवरुन केवळ 8 लाख 13 हजार 774 वाहने धावली असून दिवसाला सरासरी 27 हजार वाहनांनी या सेतूवरुन प्रवास केला आहे. (MMRDA is worried about Atal Setu)

हेही वाचा… Dahisar Firing : अभिषेक घोसाळकर हत्याकांडाबाबत ‘या’ व्यक्तीला माहीत होतं? CCTV फुटेज समोर

- Advertisement -

12 जानेवारीला अटल सेतूचे उद्घाटन झाल्यानंतर 13 जानेवारीला सकाळी 8 वाजल्यापासून हा सागरी मार्ग प्रवाशांच्या सेवेसाठी खुला करण्यात आला. सागरी सेतू वाहतूकीला खुल्या झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच 14 जानेवारीला या सागरी सेतूवरुन तब्बल 54 हजार 977 वाहनांनी प्रवास केला. या सागरी सेतूला चांगला प्रतिसाद मिळेल, दिवसाला 70 हजार वाहनांची अपेक्षा असताना 50 हजार वाहने तरी धावतील, अशी आशा एमएमआरडीएने व्यक्त केली होती. पण प्रत्यक्षात सागरी सेतू वाहतूक सेवेत दाखल होऊन एक महिना झाल्यानंतर एमएमआरडीएची ही अपेक्षा पूर्ण झालेली नाही. उलट एमएमआरडीएला आता कर्जाची चिंता सतावू लागली आहे.

अटल सेतू तयार करण्यासाठी एमएमआरडीएने जायका कंपनीकडून 17 हजार कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. या कर्जाची परतफेड करण्यास 2028 पासून सुरुवात करायची आहे. पण सागरी सेतूवरून कमी वाहने धावत असल्याने आतापासूनच कमी महसूल जमा होऊ लागला आहे. ज्याबाबत आता एमएमआरडीएला चिंता वाटू लागली आहे. एका महिन्यामध्ये अटल सेतूमधून केवळ 13 कोटी 95 लाख 85 हजार 310 रुपये इतका महसूल जमा झालेला आहे. वाहनांची संख्या वाढली नाही तर एमएमआरडीएला कर्जाची परतफेड करण्यात अडचणी येण्याची शक्यता असून याला महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांनी सुद्धा दुजोरा दिला आहे. पथकर अधिक असल्याने वाहने कमी धावत असल्याचे सांगितले जात असले तरी उलवे आंतरबदल, शिवडी-वरळी उन्नत रस्ता आणि चिर्ले-कोन जोडरस्ता पूर्ण झाल्यानंतर वाहनांची संख्या वाढेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, सागरी सेतूवरुन महिन्याभरात धावलेल्या 8 लाख 13 हजार 774 वाहनांपैकी 7 लाख 97 हजार 578 वाहने चारचाकी आहेत. तर 3 हजार 516 मिनी बस आणि इतर वाहनांचा यामध्ये समावेश आहे. दरम्यान तीन टक्के वाहनचालक पथकर भरत नसल्याचीही बाब समोर आली आहे. पथकर न भरता प्रवास करणाऱ्यांना रोखण्यासाठी आता एमएमआरडीएकडून ठोस उपायोजना करण्यात येणार आहेत, अशी माहिती डॉ. मुखर्जी यांनी दिली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -