सह्याद्री वाहिनीवर मराठी कार्यक्रमच प्रसारित करावे; राज ठाकरेंची पत्राद्वारे दूरदर्शनकडे मागणी

दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर (Sahyadri channel) हिंदी भाषेतील कार्यक्रम प्रसारित न करता महाराष्ट्राची राजभाषा मराठीतील कार्यक्रमच प्रसारित करण्यात यावेत, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Raj Thackeray) यांनी केली आहे.

दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर (Sahyadri channel) हिंदी भाषेतील कार्यक्रम प्रसारित न करता महाराष्ट्राची राजभाषा मराठीतील कार्यक्रमच प्रसारित करण्यात यावेत, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Raj Thackeray) यांनी केली आहे. या मागणी संदर्भातील पत्र राज ठाकरे यांनी दूरदर्शनच्या अप्पर महासंचालकांना पाठवले आहे. मनसेचे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई आणि संजय चित्रे यांनी हे पत्र बुधवारी प्रसारण भवन येथे दूरदर्शनचे अप्पर महासंचालक असलेल्या नीरज अग्रवाल यांना दिले.

दूरदर्शनचे अप्पर महासंचालक नीरज अग्रवाल यांना पत्र दिल्यानंतर मनसेच्या नेत्यांनी पक्षाची भूमिका त्यांना समजावून सांगितली. सध्या या वाहिनीवर मराठीबरोबरच इतर भाषांमधील कार्यक्रमही प्रसारित केले जात आहेत. त्यासंदर्भात सर्वसामान्यांच्याही तक्रारी असल्याचे मनसेने म्हटले. दरम्यान, राज ठाकरेंनी अप्पर महासंचालकांना दोन पानी पत्र लिहिले आहे. तसेच, या पत्रातून आपली भूमिका सविस्तरपणे मांडली आहे.

यामध्ये राज ठाकरे यांनी अगदी सह्याद्री वाहिनीची जेव्हा सुरुवात झाली होती, तेव्हापासून दाक्षिणात्य राज्यांमधील भाषाप्रेमाबद्दलच्या मुद्द्यापर्यंतच्या अनेक मुद्द्यांचा उल्लेख केला आहे. तसेच पत्राच्या शेवटी हिंदी भाषेमधून सह्याद्रीवर प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांऐवजी मराठी भाषेतील कार्यक्रम प्रदर्शित करावेत या मागणीचा नक्की विचार करावा अशी विनंती केली आहे.

राज ठाकरे यांच्या पत्रात काय?

दूरदर्शनने दिनांक १५ ऑगस्ट १९९४ रोजी महाराष्ट्रासाठी सह्याद्री मराठी प्रादेशिक वाहिनी सुरु केली. त्याचा मूळ उद्देश मराष्ट्राच्या राज्यातील राजभाषेत म्हणजे मराठीत सर्व कार्यक्रमांचे प्रक्षेपण व्हावे हा आहे. मात्र सध्या या वाहिनीवर अनेकदा इतर भाषेतील कार्यक्रम प्रसारित केले जात असल्याचं प्रेक्षकांच्या व आमच्या नजरेस आले आहे. याबाबत सर्वसामान्यांच्या आमच्याकडे तक्रारी आल्या. तसेच याबाबत माहिती अधिकार कायद्यान्वये महिती घेतली असता त्यात ही बाब उघड झाली. तश्या बातम्याही प्रसिद्ध झाल्या.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘मन की बात’ हा हिंदी भाषेतील कार्यक्रम सह्याद्री तसेच दूरदर्शनच्या इतर सर्व प्रादेशिक वाहिन्यांवरुन दाखवला जातो. त्याबाबत कुणाचा आक्षेप असण्याचे काहीच कारण नाही कारण ते देशाचे पंतप्रधान आहेत. मात्र ‘कोशिस से कामयाबी तक’, ‘तराने पुराने’ हे हिंदी कार्यक्रम आपल्या मराठी सह्याद्री वाहिनीवर दाखवले जातात तसेच ते पुन:प्रसारीतही केले जातात. त्याचप्रमाणे सह्याद्री वाहिनीवरील मुलाखत किंवा संवादात्मक कार्यक्रमांमध्येही काही वेळा हिंदी वक्ते किंवा हिंदी भाषेतून संवाद साधणाऱ्या व्यक्तींना निमंत्रित केले जात असल्याचे निदर्शनास आले आहे. हे निश्चितच मूळ उद्देशाला धरु नाही.

आम्ही आपणांस एवढंच सांगू इच्छितो की, यशोगाथा असो, सिनेमा गीते असो, पाककृती असो वा इतर कोणताही कार्यक्रम; मराठी भाषेत संवाद साधणारे असंख्य उद्योजक, कलावंत, साहित्यिक, अभिनेते आणि अगदी बल्लवाचार्यही महाराष्ट्रात आहेत. त्यामुळे मराठी भाषेत कार्यक्रम प्रसारित करण्यासाठी त्याची कमतरता नाही. याचे भान सह्याद्री वाहिनीसाठी कार्यक्रमांची निर्मिती आणि संबंधित नियोजन करणाऱ्यांनी खबरदारीने घेणे गरजेचे आङे. याबाबात दक्षिण भारतातील कर्नाटक, तामिळनाडू, केरळ या राज्यांतील दूरदर्शनच्या स्थानिक राजभाषाप्रेमी आणि आग्रही अशा प्रादेशिक वाहिन्यांकडून आपण योग्य तो बोध घ्यावा व सह्याद्री वाहिनीवर होणारा इतर भाषांचा प्रादुर्भाव वेळेत रोखावा, हीच एकमेव अपेक्षा.

आमच्या मागणीचा आपण जरुर विचार करावा आणि योग्य ती कार्यवाही करावी, अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा प्रश्न सोडवण्यासाठी योग्य ती पावलं उचलेल.


हेही वाचा – उठाव आणि बंड नव्हताच, ती गद्दारी अन् गद्दार म्हणूनच माथ्यावर शिक्का घेऊन फिरणार, आदित्य ठाकरेंचा घणाघात