घरताज्या घडामोडी'जेव्हा आमचा बाण सुटेल तेव्हा पाहा काय होईल'; संजय राऊत यांची नारायण...

‘जेव्हा आमचा बाण सुटेल तेव्हा पाहा काय होईल’; संजय राऊत यांची नारायण राणेंच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया

Subscribe

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलेल्या मुख्यमंत्र्यांबाबतच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राज्यातील राजकारणातील वातावरण बिघडले आहे. यामुळे नारायण राणे विरुद्ध शिवसेना वाद चांगलाच तापला आहे. आता खासदार संजय राऊत यांनी देखील नारायण राणे यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना राऊत म्हणाले की, ‘नारायण राणे यांनी २५ वर्ष आमच्यासोबत काम केले आहे. दुसरीकडे गेलेत ठिक आहे. ज्या शाळेतून तुम्ही बाहेर पडला आहात, ती शाळा अजून सुरू आहे. तुमच्यासारखी खूप लोकं आहेत. आता तुम्हाला कोण विचारतंय. भाजप राणेंच्या खांद्यावर बंदूक ठेवून शिवसेनेवर हल्ला करायचा आहे, करत राहा. जेव्हा आमचा बाण सुटेल तेव्हा पाहा काय होते?’

तसेच दुसऱ्या एका मराठी माध्यमाशी बोलताना राऊत म्हणाले की, ‘आज केंद्रीय मंत्री महात्मा नारायण राणे मुख्यमंत्र्यांना थप्पड मारू म्हणतात. तुम्ही ही कसली चिथावणी देताय?. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांवर हल्ला करण्यासाठी चिथावणी देताय. आपण केंद्रीय मंत्री आहात, आपण घटनेनुसार शपथ घेतली आहे. कायदा सुव्यवस्थेला मदत करण्यासाठी आपलं मंत्री म्हणून कर्तव्य आहे. पण आपण महाराष्ट्रात येता आणि जनआशीर्वाद यात्रेच्या नावाखाली २४ तास फक्त शिवसेनाला शिव्या देताय. ठाकरे कुटुंबियांवर तुम्ही आगपाखड करताय. यातून तुम्हाला काय मिळणार आहे?. भाजपने ज्या पद्धतीने राजकारण सुरु केलंय. हे त्यांच्यावर उलडल्याशिवाय राहणार नाही.’

- Advertisement -

‘हे सगळं प्रकरण भाजपला महाराष्ट्रातून नामशेष केल्याशिवाय राहणार नाही’

‘नारायण राणे यांचा पूर्व इतिहास सर्वांना माहिती आहे. राजकीय आणि इतर सुद्धा. ते २५ वर्ष शिवसेनेते होते. ज्या धमक्या दिल्या जातायत, याला मारू, त्याला मारू, मुख्यमंत्र्यांवरती हल्ला करू अहो ती शाळा शिवसेनेची आहे. तुम्ही बाहेर पडलात म्हणून शाळा बंद होत नाही ना. शिक्षण तेच आहे. पण आम्हाला आज कायद्यांने बांधले आहे. कारण आमचे सरकार, मुख्यमंत्री आहे. तर तुम्ही दिलेल्या धमकीवर कायद्याने कारवाई होईल. या केंद्रीय मंत्र्यांनी सरळ सरळ महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना मारण्याची धमकी दिली आहे. ठिक आहे,  तुम्ही धमकी दिली आहे. आता कायदा काम करेल. महाराष्ट्रामध्ये जरी तुम्ही अशाप्रकारची भाषा वापरत असालं. तरी शिवसेना आणि शिवसेनेची परंपरा बाळासाहेब ठाकरेंनी आखून दिलेली आहे. ‘अंगावर आलात तर शिंगावर घेऊ’. केंद्रीय सूक्ष्म, लघू व मध्यम उपक्रम मंत्री नारायण राणे आहेत. त्यांनी त्या सूक्ष्मात शिरून काम करावं आणि लोकांना रोजगार द्यावा. हे कशा वातावरण खराब करताय?. ठिक आहे, तुम्ही आता वातावरण खराब केलंच आहेत. पण हे सगळं प्रकरण भाजपला महाराष्ट्रातून नामशेष केल्याशिवाय राहणार नाही. हे तुम्ही पक्क समजून घ्या,’ असे संजय राऊत म्हणाले.


हेही वाचा – ‘यापुढे अशी पोकळ आव्हान शिवसेनेला देऊ नका’; वरुण सरदेसाई यांचं नितेश राणेंना उत्तर

- Advertisement -

 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -