घरमहाराष्ट्रयाअगोदरही उदयनराजे यांनी भाजपात केला होता प्रवेश

याअगोदरही उदयनराजे यांनी भाजपात केला होता प्रवेश

Subscribe

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उदयनराजे भोसले यांनी आपला खासदारकीचा राजीनामा दिला आहे. आज ते भाजपात प्रवेश करणार आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी शुक्रवारी मध्यरात्री एक वाजता आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांच्याजवळ त्यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा सुपूर्द केला. यावेळी त्यांच्यासोबत मुख्यंमंत्री देवेंद्र फडणवीस, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन हेदेखील उपस्थित होते. आज सकाळी अकरा वाजता उदयनराजे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि जे. पी. नड्डा यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. उदयनराजे यांच्या भाजपप्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे फार मोठे नुकसान झाले आहे. महाराष्ट्रात राष्ट्रवादीचे फक्त चार खासदार होते आणि त्यापैकी एक खासदार उदयनराजे होते. त्यानंतर आज सकाळी त्यांनी भाजपात प्रवेश केला. मात्र, उदयनराजे यांनी याअगोदरही भाजपात प्रवेश केला होता.

उदयनराजेंनी का सोडला होता भाजप पक्ष?

उदयनराजे भोसले यांनी १९९५ साली देखील भाजपात प्रवेश केला होता. मात्र, पश्चिम महाराष्ट्रात भाजपला त्यांचा काही फायदा न झाल्याने भाजपने त्यांना दूर केले होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उदयनराजेंना भाजपात सामील करण्यासाठी प्रयत्न करत होते. त्यामुळे देवेंद्र फडणवीस आणि उदयनराजे यांच्यात बैठका झाल्या. या बैठकींमध्ये उदयनराजेंची मनधरणी करण्यात भाजपला यश आले. त्यामुळे उदयनराजे यांचा भाजप प्रवेश निश्चित असल्याचे बोलले जात होते. दरम्यान, उदयनराजे यांनी राष्ट्रवादी सोडून भाजपात जावू नये म्हणून राष्ट्रवादीच्या सर्व ज्येष्ठ नेत्यांकडून त्यांची मनधरणी करण्याचे बरेच प्रयत्न केले गेले. मात्र, राष्ट्रवादीला या प्रयत्नांमध्ये अपयश आले. राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी स्वत: उदयनराजे यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न केले. गुरुवारी शरद पवार यांच्या पुण्यातील निवासस्थानी उदयनराजे आणि शरद पवार यांच्यात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीला राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे देखील उपस्थित होते. त्यांनी उदयनराजेंची मनधरणी करण्याचा बराच प्रयत्न केला. मात्र ते अपयशी ठरले. अखेर शुक्रवारी रात्री उदयनराजेंनी खासदारकीचा राजीनामा दिला आणि आज ते भाजपात प्रवेश करणार आहेत. याअगोदर उदयनराजे यांचे बंधू शिवेंद्रराजे भोसले यांनी भाजपात प्रवेश केला होता. त्याचबरोबर विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर देखील भाजपच्या वाट्यावर असल्याची चर्चा सुरु आहे. परंतु, त्यांनी ‘आपण सध्या राष्ट्रवादीत असून पुढचे पुढे पाहू’, असे म्हणत या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

- Advertisement -

उदयनराजेंच्या राजीनाम्यानंतर साताऱ्यात पोटनिवडणूक

लोकसभा निवडणूक नुकतीच तीन महिन्यांपूर्वी पार पडली. या निवडणुकीत साताऱ्याच्या जागेवर उदयनराजे भोसले यांनी एकहाती सत्ता मिळवली. मात्र, साताऱ्यात ते विजयी झाले असले तरी राज्यभरात त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची परिस्थिती कठीण बनली. लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला फक्त चार जागांवर समाधान मानावे लागले. त्यानंतर राष्ट्रावादीच्या बऱ्याच दिग्गज नेत्यांनी राष्ट्रीवादीला सोडचिठ्ठी देऊन शिवसेना आणि भाजपात प्रवेश केला. दरम्यान, आता उदयनराजे यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या राजीनाम्यानंतर साताऱ्यात पोटनिवडणूक होईल. ही निवडणूक विधानसभा निवडणूकवेळी किंवा त्यानंतर होण्याची शक्यता आहे. मात्र आता ही जागा मिळवण्यासाठी राष्ट्रवादीला अपार कष्ट करावे लागतील.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -