संगीतकार वाजिद खान यांचे निधन

बॉलीवूडमधील संगीतकार जोडी साजिद – वाजिद यांच्यातील वाजीद खान यांचे निधन झाल्याची माहिती गायक सोनू निगम यांनी रविवारी मध्यरात्री दिली. वाजिद यांना किडनीचा आजार होता. त्यात कोरोनाची लागणही त्यांना झाली होती. ते केवळ ४२ वर्षांचे होते. वाजिद यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना गेल्या काही दिवसांपासून चेंबूर येथील सुराना हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. अखेर काल मध्यरात्री त्यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. बॉलीवूडचे दबंग सलमान खान यांच्या बहुतांश चित्रपटांना साजिद-वाजिद या जोडीने संगीत दिले आहे. वॉन्टेड, दबंग, एक था टायगर या चित्रपटातील गाणी लोकप्रिय ठरली होती.

संगीतकार जोडी साजिद-वाजिद 

संगीतकार सलीम मर्चंट यांनी या निधनाच्या बातमीला दुजोरा दिला आहे. ते म्हणाले की, वाजिद यांना अनेक व्याधींनी ग्रासले होते. त्यांना किडनीचा विकार होता. याकरता काही दिवसांपूर्वी त्यांनी किडनी ट्रान्सप्लांटही केले होते. मात्र काही दिवसांपूर्वी त्यात इंफेक्शन झाल्याचे समजले. वाजिद यांना अखेरचे चार दिवस व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. कालांतराने त्यांनी प्रकृती अजून खालावत गेली, अशी माहिती सलीम यांनी पीटीआयला दिली आहे.

सलमान खान यांच्या बहुतांश चित्रपटांना संगीत 

बॉलीवूडमध्ये १९९८ साली आलेल्या प्यार किया तो डरना क्या चित्रपटातून त्यांनी संगीतकार जोडी म्हणून पदार्पण केले होते. त्यांनी अनेक हिट गाणी हिंदी सिनेसृष्टीत दिली आहे. सलमान खानच्या अनेक चित्रपटांना या जोडीने संगीतबद्ध केले आहे. गर्व, तेरे नाम, तुमको ना भूल पायेंगे, पार्टनर यातील गाणी लोकप्रिय आहेत. त्यांनी सारेगमप २०१२ आणि सारेगमप सुपरस्टार या रिअॅलिटी शोमध्ये परिक्षकाची भूमिका साकारली होती.

हेही वाचा –

पावसाची एन्ट्री : राज्यासह मुंबईतही पावसाच्या हलक्या सरी