दर्याराजा शांत हो.. कोळी-मच्छीमार बांधवांना धंद्यात यश दे!; ठाण्यात नारळीपौर्णिमा उत्साहात

ठाणे – ठाणे महानगरपालिकेच्या विद्यमाने आयोजित ऐतिहासिक परंपरा लाभलेला ‘नारळी पौर्णिमा उत्सव’ गुरुवारी ठाण्यात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. गेली दोन वर्षे कोरोना महामारीमुळे हा उत्सव होवू शकला नव्हता. परंतु यंदा पुन्हा त्याच उत्साहात आज कळवा खाडी किनारी असंख्य कोळी बांधवांच्या उपस्थितीत पारंपरिक दर्याची पूजा करून ठाणे शहराचा मानाचा नारळ प्रशासक तथा आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी हे ‘दर्याराजा शांत हो.. कोळी-मच्छिमार बांधवांना धंद्यात यश दे! अशी विनवणी करत मनोभावे अर्पण केला.

ठाणे शहरात ठाणे महानगरपालिकेच्या विद्यमाने गेल्या अनेक वर्षांपासून इतिहासकालीन नारळी पौर्णिमेचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. यावर्षीही ‘नारळी पौर्णिमा उत्सव’ २०२२चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमास माजी महापौर नरेश म्हस्के, अतिरिक्त आयुक्त (१) संदीप माळवी, माजी उपमहापौर रमाकांत मढवी, माजी उप महापौर गणेश साळवी, माजी उपमहापौर पल्लवी कदम, माजी नगरसेवक राम रेपाळे, माजी नगरसेवक संजय तरे, उपायुक्त बाळासाहेब चव्हाण, सहायक आयुक्त समीर जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.

दरम्यान कळवा खाडी येथे जत्रेचे स्वरूप आलेले पाहायला मिळाले. यावेळी पालखीचे देखील आयोजन करण्यात आले होते. कुलदैवतांचे पूजन करून ढोल ताशांच्या गजरात पारंपारिक पद्धतीने मिरवणूकही काढण्यात आली. तसेच पारंपरिक कोळी गीतांच्या कार्यक्रमाचेही आयोजन यावेळी करण्यात आले होते. समुद्र शांत व्हावा, त्याचा कोप होऊ नये, जहाजे, नौका सुरक्षित राहाव्यात यासाठी विविध लोककलेच्या माध्यमांचे यावेळी सादरीकरण करण्यात आले. गायन, वादन, नृत्य अशा लोककलेत कोळी बांधवांनी मोठया उत्साहाने सहभाग घेतला होता. मच्छिमार बांधवांप्रमाणेच किनाऱ्यावर राहणारे ग्रामस्थ, ठाणेकर नागरिक यात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.