घरमहाराष्ट्रनाशिकनाशकात आपट्याची केवळ २७४ झाडे ; आजच्या दसर्‍याला पानांपेक्षा रोपं वाटा

नाशकात आपट्याची केवळ २७४ झाडे ; आजच्या दसर्‍याला पानांपेक्षा रोपं वाटा

Subscribe

गेल्या काही वर्षांत अशाश्वत पद्धतीने आपटा वृक्षाची तोड झाल्याने या वृक्षाचे प्रमाण कमी झाले आहे.

नाशिक :  महापालिकेने केलेल्या वृक्ष गणनेत शहरात केवळ २७४ आपट्याची झाडे आढळून आलीत. गेल्या काही वर्षांत अशाश्वत पद्धतीने आपटा वृक्षाची तोड झाल्याने या वृक्षाचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे आपटा आता दुर्मीळ श्रेणीकडे वाटचाल करत असून या प्रजातीचे संवर्धन करण्यासाठी दसर्‍याला पानांऐवजी आपट्याची रोपं वाटण्याची गरज निर्माण झाली आहे. दरम्यान, आपट्याच्या पानांसारखेच दिसणारे कांचन जातीच्या झाडांची संख्या मात्र शहरात तब्बल २० हजार ८७१ इतकी आढळून आली आहे.

विजयादशमीच्या पार्श्वभूमीवर शहरात आपटा वृक्षाची पाने प्रामुख्याने आदिवासी भागातून मोठ्या प्रमाणावर विक्रीसाठी येतात. या पानांच्या विक्रीतून आदिवासी बांधवांची कमाई होत असली तरी, आयुर्वेदिकदृष्ठ्या बहुगुणी औषधी वनस्पती असलेल्या या वृक्षाला अक्षरश: ओरबडले जाते. निर्दयीपणे त्यावर कुर्‍हाड चालवली जाते. त्यामुळे फ्रेबुवारी- मार्चमध्ये बहर येणारा हा वृक्ष बोडका, खुरटा दिसतो.

- Advertisement -

महापालिकेच्या वृक्षगणनेनुसार शहरात २७४ आपट्याची झाडे आढळून आलीत. त्यात पंचवटीतील प्रभाग सहामध्ये सर्वाधिक म्हणजे ९२ झाडे आढळून आलेत. तर प्रभाग एकमध्ये २२ व प्रभाग तीन मध्ये तीन झाडे आढळून आलीत. संपूर्ण नाशिक पश्चिम विभागात अवघे १० झाडे आढळून आलीत. त्यात प्रभाग क्र. १२ मध्ये सहा तर प्रभाग क्रमांक १३ मध्ये चार झाडे आढळून आलीत. पूर्व विभागात अवघे पाच झाडे आढळून आली असून त्यातील चार प्रभाग क्र. २३ मध्ये तर एक प्रभाग क्र. १५ मध्ये आहे. सातपूर विभागात २२ झाडे आहेत.

  त्यात प्रभाग ९ मध्ये १४, प्रभाग २६ मध्ये ७ तर प्रभाग ८ मध्ये १ झाड आहे. सिडको विभागात ६५ आपट्याची झाडे आहेत. त्यात प्रभाग ३१ मध्ये ४२, प्रभाग २७ मध्ये १०, प्रभाग २८ मध्ये ८, प्रभाग २५ मध्ये ४ तर प्रभाग २९ मध्ये १ झाड आहे. नाशिकरोड विभागात ५५ आपट्याची झाडे असून प्रभाग १७ मध्ये ४३, प्रभाग १९ मध्ये तीन, प्रभाग २१ मध्ये चार आणि प्रभाग २२ मध्ये ५ झाडांचा समावेश आहे.
शहरात आपट्याच्या वृक्षांची मोजकी संख्या पाहता त्यावर कुर्‍हाड चालवण्याऐवजी आपट्याचे रोप वाटून दसर्‍याचे सोने लुटता येईल का असा प्रयत्न झाल्यास दसरा खर्‍या अर्थाने ‘साजरा’ होईल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -