घर उत्तर महाराष्ट्र शिपायाकडे पगाराच्या मोहबदल्यात मागितले 50 हजार; शिक्षण उपसंचालक कार्यालयातील क्लार्क 'एसीबी'च्या जाळ्यात

शिपायाकडे पगाराच्या मोहबदल्यात मागितले 50 हजार; शिक्षण उपसंचालक कार्यालयातील क्लार्क ‘एसीबी’च्या जाळ्यात

Subscribe

नाशिक : नाशिक लाच लुचपत प्रतिबंधक विभाग मागील काही महिन्यांपासून धडाकेबाज कारवाई करत असूनही लाचखोरांची खाबुगिरी कमी होताना दिसून येत नाहीये. मागील आठवड्यातच दोन मोठ्या माशांना गळाला लावल्यानंतर आता पुन्हा शिक्षण उपसंचालक कार्यालयातील कनिष्ठ लिपिकाला लाच घेताना रंगेहात अटक करण्यात आली आहे. एका खासगी शाळेतील शिपायाला कुठल्याही प्रकारचे वेतन मिळत नव्हते. ते वेतन सुरू करून देण्याच्या आमिषाने नाशिक वर्ग तीनच्या शिक्षण उपसंचालक कार्यालयातील कनिष्ठ लिपिक दिगंबर अर्जुन साळवे (वय 55 रा. टाकळी) याने 50 हजाराची लाच मागितली होती. (A junior clerk in the office of the Deputy Director of Education was arrested red-handed while taking bribe)

याबाबत तक्रारदाराने लाच लुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक यांच्याकडे तक्रार केली होती. तक्रारीची शहानिशा करून शिक्षक उपसंचालक कार्यालय, नाशिक येथे दिगंबर साळवे याला 50 हजारांची लाच स्वीकारताना एसीबीच्या पथकाने रंगेहात अटक केली आहे.

- Advertisement -

तक्रारदार एका खाजगी शाळेत डिसेंबर 2019 पासून डिसेंबर 2022 पर्यंत शिक्षण सेवक म्हणून नोकरीस होते. त्यानंतरच त्यांची शिपाई या पदावर बढती झाली. जानेवारी 2023 पासून शिपाई या पदावर कार्यरत असताना त्यांना अद्याप पर्यंत कुठल्याही प्रकारचे वेतन मिळालेले नव्हते. हे वेतन मिळण्यासाठी आवश्यक असलेलं शालार्थ क्रमांक मिळवण्यासाठी त्यांनी शाळेच्या मार्फत शिक्षणाधिकारी कार्यालयात प्रस्ताव पाठवला होता. हा प्रस्ताव मंजूर करण्यासाठी शिक्षण उपसंचालक कार्यालय, नाशिक येथील लिपिक दिगंबर अर्जुन साळवे याने तक्रारदाराकडे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पंचांच्या समक्ष 50 हजाराची लाच मागितली होती. बुधवारी (दि. 13) साळवे यास लाच स्वीकारताना रंगेहात अटक करण्यात आली आहे.

लाच लुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिकच्या अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी पोलीस उपअधीक्षक अनिल बडगुजर, पोलीस नाईक मनोज पाटील, पोलीस नाईक दीपक पवार, पोलीस अंमलदार शितल सूर्यवंशी यांनी कामगिरी पार पाडली.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -