Eco friendly bappa Competition
घर महाराष्ट्र नाशिक नाशिक जिल्ह्यातही 9 थरांचा थरार, देवळ्यात यंदाही दहीहंडीचा जल्लोष

नाशिक जिल्ह्यातही 9 थरांचा थरार, देवळ्यात यंदाही दहीहंडीचा जल्लोष

Subscribe

नाशिक : देवळा येथे दहीहंडी महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. नऊ थरापर्यंत पोहचण्यासाठी गोविंदा पथकांनी आपली थरारक कसरत केली. हा उत्सव पाहण्यासाठी तालुका भरातून जनसमुदाय मोठ्या संख्येने उपस्थित होता.
येथील न्यू एकता बहुउद्देशीय संस्था व केदानाना आहेर मित्रमंडळाने आयोजित केलेला दहीहंडी महोत्सव अतिशय दिमाखात, वैविध्यपूर्ण, नैत्रदीपक, अलौकिक, डोळ्यांचे पारणे फेडणारा ठरला.

देवळा शहर व पंचक्रोशीतून हजारोंच्या संख्येने कृष्णभक्त जमले होते. एखाद्या कार्यक्रमात सर्वांचा सहभाग कसा असावा याचा उत्तम नमुना म्हणजे येथील दहीहंडी महोत्सव. बालगोपाळांपासून आबालवृद्धांपर्यत सर्वांची उपस्थिती देवळा शहराची एक नवीन सांस्कृतिक ओळख निर्माण करणारी ठरली. योगेशनानू आहेर यांनी पुढाकार घेत हा नेत्रदीपक सोहळा घडवून आणला. भावी पिढीसाठी असे कार्यक्रम हे सामाजिक बांधिलकी व सण-उत्सवापोटी जागरुकता वाढवणारी आहे.

- Advertisement -

माता – भगिनींची मोठ्या प्रमाणातील उपस्थिती देवळा शहर व पंचक्रोशीतील स्री वर्गांच्या सामजिक सक्रीयतेची एक द्योतक आहे. फटाक्यांची आतषबाजी, डीजे नृत्याने परिसर दुमदुमून गेला होता. बालगोपाळांनी विविध वेशभूषेतून लुटलेला मनमुराद आनंद, विनोद कुमावत व राणी कुमावत यांच्या प्रमुख उपस्थितीने गाण्यांनी थिरकलेला तरुण वर्ग, एसकेडीच्या बालगोपाळांनी सादर केलेले कृष्ण थिमने महाभारताची व कृष्ण लीलेची सर्वांनाच आठवण करुन दिली तर दहीहंडी फोडण्याचे थरारक दृश्याने उपस्थित अचंबित झाले.

यावेळी भाजपचे जिल्हानेते केदा आहेर यांच्या हस्ते गोविंदा पथक, विविध शाळांमधून वेशभूषा करुन आलेल्या विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी बाजार समितीचे संचालक भाऊसाहेब पगार, उपनगराध्यक्ष अशोक आहेर, गटनेते संभाजी आहेर, नगरसेवक जितेंद्र आहेर, कैलास पवार, करण आहेर, प्रवीण मेधने, मुन्ना आहेर, राजेंद्र आहेर, किशोर आहेर, हर्षद भामरे, देवा भामरे व एकता बहुउद्देशीय संस्थेचे सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी अध्यक्ष योगेश आहेर यांनी आभार मानले.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -