घरमहाराष्ट्रनाशिकस्मार्ट सिटी कंपनीविरोधात काँग्रेसचे आंदोलन

स्मार्ट सिटी कंपनीविरोधात काँग्रेसचे आंदोलन

Subscribe

हेमलता पाटीलः ‘सीबीएस’समोरील रस्ता कामाने नागरिक त्रस्त

शहरात अशोक स्तंभ ते त्र्यंबकनाका परिसरातील मार्गावर सुरू असलेल्या स्मार्ट रस्ता कामाने नागरिक वेठीस धरले आहेत. तसेच अनेक व्यावसायिक, कामगार आणि वाहनचालक त्रस्त झालेले आहेत. या स्मार्ट सिटी अंतर्गत झालेल्या कालिदास कलामंदिर, नेहरू उद्यान आणि कलादालनाच्या कामाने नाशिकच्या सौंदर्यात भर पडेल असेही काही झाले नाही, असा आरेप करीत काँग्रेसच्या प्रदेश प्रवक्त्या हेमलता पाटील यांनी ‘स्मार्ट सिटी’विरोधात आंदोलन केले.

त्र्यंबक नाका परिसरात स्मार्ट रस्त्यावर हेमलता पाटील यांच्या नेतृत्वात काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. यावेळी स्मार्टसिटी कंपणीविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. तसेच कार्यकर्त्यांनी फलकाद्वारे नागरिकांचे प्रबोधन केले. हेमलता पाटील यांनी स्मार्ट सिटी अंतर्गत होत असलेल्या कामांवर टीका केली. त्या म्हणाल्या, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक असलेल्या स्मार्टसिटीचे काम नाशिकमध्ये सुरू करण्यात आलेले आहे. या प्रकल्पाची भाजपच्या पदाधिकार्‍यांनीच वाट लावली आहे. या स्मार्ट सिटीचे संचालक मंडळ असताना त्यांच्या मिटींगमध्ये सर्व संगनमताने घेतले जातात. पण त्यांची माहिती नगरसेवक, नागरिकांना दिली जात नाही. या उपक्रमात आतापर्यंत नेहरू उद्यान, कालिदास कलामंदिर, फुले कलादालनाचे काम करण्यात आले. मूळ निविदांमध्ये नमूद कामापेक्षा अधिक खर्च या कामावर झालेला आहे. तरीही शहराचे सौंदर्य वाढलेले नाही. तसेच ग्रीनसीटी प्रोजेक्ट शेतकर्‍यांवर लादण्यात आला आहे. पॅन सिटी व वॉटर सप्लाय प्रोजेक्टवर सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनीच बहिष्कार टाकला आहे. स्मार्ट सिटीच्या काही संचालकांनी कंपनीत भ्रष्टाचाराचा आरोप करून राजीनामा देण्याची भाषा केलेली आहे, हा अनागोंदी कारभार असल्याचे पाटील यांनी म्हटले.

- Advertisement -

अशोकस्तंभ ते त्र्यंबकनाका या स्मार्ट रस्त्याचे काम मुदत उलटूनही पूर्ण झाले नसल्याचे सांगताना हेमलता पाटील यांनी म्हटले, 17 कोटी रुपयांचे काम 20 कोटीवर कसे गेले. गत मार्चपर्यंत ठेकेदाराला काम पूर्ण करण्याची मुदतवाढ दिलेली होती. पण हे काम पूर्ण झाले नाही. त्यामुळे ठेकेदाराला दंड करण्याचा ठराव मनपाने केला होता. तर त्याच ठेकेदाराला वाढीव कामासाठी रक्कम देण्याचा ठरावही करण्यात आला होता. हा प्रकार हास्यास्पद होता. वर्दळीच्या मार्गावर नागरिक, वाहनचालक आणि व्यावसायिकांना अडचण करून स्मार्ट रस्त्याचे काम सुरू आहे. ते पूर्ण कधी होईल, याचे कोणी उत्तर देत नाही. यामुळे सामान्य नागरिकांना त्रास होत आहे, नागरिकांच्या हितासाठी आम्ही आंदोलन करीत असल्याचे पाटील यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -