घरमहाराष्ट्रनाशिकपिंप्रीफाटा चौफुली उड्डाणपुलासाठी ४० कोटी निधी

पिंप्रीफाटा चौफुली उड्डाणपुलासाठी ४० कोटी निधी

Subscribe

नाशिक-मुंबई महामार्ग उड्डाणपुलाने जोडला जाणार; खासदार हेमंत गोडसे यांच्या प्रयत्नाला यश

इगतपुरी : सर्वाधिक अपघाताचे सेंटर समजल्या जाणार्‍या इगतपुरी तालुक्यातील मुंबई आग्रा महामार्गावरील पिंप्री फाटा येथे उड्डाणपूल उभारला जावा यासाठी अनेक आंदोलने झाली. अनेक अपघातात अनेकांचे जीव गेले. अनेकांना अपंगत्व आले. त्या पार्श्वभूमीवर खासदार हेमंत गोडसे यांच्या पुढाकारातून या पिंप्रीफाटा चौफुलीवर उड्डाणपुलाचा प्रश्न मार्गी लागला. या उड्डाण पुलासाठी ४०.३९ कोटी निधीच्या खर्चालाही मान्यता मिळाली. विशेष म्हणजे समृद्धी महामार्ग व मुंबई महामार्ग या दोन्ही महामार्गांना हा पूल जोडला जाणार असल्याने अपघात कमी होण्यास मदत होईल व प्रवासातील अडथळेही दूर होतील.अपघातांना आळा बसावा, नाशिक-मुंबई प्रवासाचा कालावधी कमी व्हावा, तसेच वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी समृद्धी महामार्ग आणि नाशिक- मुंबई महामार्ग क्र. ३ यांच्यात उड्डाणपुलाद्वारे जोडणी व्हावी, यासाठी वर्षभरापासून खा. हेमंत गोडसे यांच्या सततच्या प्रयत्नांना यश आले आहे.

या प्रस्तावित उड्डाणपुलाच्या उभारणीसाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने ४o कोटी ३९ लाख रुपयांच्या खर्चाला तत्त्वत: मान्यता दिली आहे. यामुळे इगतपुरी तालुक्यातील पिंप्रीसदो येथे सहा पदरी उड्डाणपुल होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. दोन्ही महामार्गाच्या जोडणीमुळे नाशिक-मुंबई प्रवासाचे अंतर कमी होणार असून आता अवघ्या अडीच तासात नाशिककरांना मुंबईत पोहोचणे शक्य होणार असल्याची माहिती खा. गोडसे यांनी दिली आहे. वडपे ते गोंदे या दरम्यानच्या महामार्गाचा सहापदरीकरणाचा प्रस्तावही लवकरच मंजूर होणार आहे.समृद्धी महामार्गाचे काम गेल्या काही वर्षांपासून वेगाने सुरु आहे. नाशिक-मुंबई महामार्ग क्र. तीन आणि समृद्धी महामार्ग या दोन्ही महामार्गांमध्ये अंतर असल्याने प्रवाशांना कनेक्टीव्हीटीची मोठी अडचण होत होती.

- Advertisement -

हे दोन्ही महामार्ग पिंप्रीसदो शिवारापासून अगदी जवळ आहेत. वरील दोन्ही महामार्गांची जोडणी नसल्याने याठिकाणी सतत वाहतूक ठप्प होत असते. तसेच या ठिकाणी रोजच अनेक लहान – मोठे अपघात होत असतात. परिणामी वाहतूक कोलमडून पडत असल्याने प्रवाशांची मोठी कुचंबना होत असते. समृद्धी महामार्ग आणि नाशिक – मुंबई महामार्ग यांना जोडणार्‍या पिंप्री सदो शिवारात उड्डाणपुला व्हावा, यासाठी खा. गोडसे गेल्या काही वर्षांपासून प्रयत्नशील होते. या कामासाठी गोडसे यांचा सतत केंद्रीय वाहतूक मंत्रालयाकडे तसेच महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडे पाठपुरावा सुरु होता.खा. गोडसे यांची मागणी न्यायिक असल्याने केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने प्रिंपीसदो शिवारात वरील दोन ही महामार्गांना जोडणार्‍या उड्डाण पुलाला जानेवारी महिन्यात मान्यता दिलेली आहे. त्यानंतर खा. गोडसे यांनी निधीसाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडे सततचे प्रयत्न सुरुच ठेवले होते.

 खा. गोडसे यांच्या प्रयत्नांना यश आले असून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने आज प्रिंपी सदो येथील उड्डाणपुलाच्या कामासाठी तब्बल ४० कोटी ३९ लाख रुपयांच्या निधीला तत्त्वत: मान्यता दिली असुन शनिवारी सकाळी साडे दहा वाजता या कामाचा शुभारंभ खासदार हेमंत गोडसे यांच्या हस्ते होत असुन या प्रसंगी शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख निवृत्ती जाधव, तालुका प्रमुख भगवान आडोळे, माजी आमदार निर्मला गावित, काशिनाथ मेंगाळ, पांडुरंग गांगड, शिवराम झोले, जिल्हा परिषद सदस्य कावजी ठाकरे, पंचायत समिती सभापती सोमनाथ जोशी, उपसभापती विठ्ठल लंगडे, नगराध्यक्ष संजय इंदुलकर, उपनगराध्यक्ष नईम खान बाळा गव्हाणे यांच्यासह शिवसेनेचे सर्व पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित राहणार आहे

 या उड्डाण पुलाची लांबी सुमारे ७८ मीटर असणार असून हा उड्डाण पुल सहा पदरी असणार आहे. यामुळे नाशिक मुंबई हा प्रवास आता अडीच तासांवर येणार असून उद्योग व्यवसायाला मोठी चालना मिळणार.
खासदार हेमंत गोडसे

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -