घरमहाराष्ट्रनाशिककेंद्राच्या ‘आयुष्यमान भव:’ मोहिमेला नाशिक जिल्ह्यात प्रारंभ; रुग्णांना 'हे' लाभ मिळणार

केंद्राच्या ‘आयुष्यमान भव:’ मोहिमेला नाशिक जिल्ह्यात प्रारंभ; रुग्णांना ‘हे’ लाभ मिळणार

Subscribe

नाशिक : केंद्र शासनाच्या ‘आयुष्यमान भव’ मोहिमेला नाशिक जिल्ह्यात 17 सप्टेंबरपासून शुभारंभ होत आहे. या मोहिमेंतर्गत जिल्ह्यात ग्रामीण व उपजिल्हा रुग्णालयात प्रत्येक शनिवारी आयुष्यमान मेळावा घेण्यात येणार आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी या मोहिमेत सहभागी होवून आरोग्यविषयक सेवा-सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात या मोहिमेसंदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. अशोक थोरात, नोडल अधिकारी डॉ. अनंत पवार, जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. सुधाकर मोरे, निवासी वैद्यकीय अधिकारी संदीप सूर्यवंशी, अतिरिक्त जिल्हा वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र बागूल, डॉ. दीपक लोणे आदी उपस्थित होते.

- Advertisement -

जिल्हाधिकारी शर्मा पुढे म्हणाले की, आयुष्यमान भवः मोहिमेंतर्गत आरोग्यवर्धिनी उपकेंद्र व प्राथमिक आरोग्य केंद्र येथून संदर्भित झालेल्या रुग्णांना विशेषज्ञांमार्फत औषधी उपचार व शस्त्रक्रिया मोफत करण्यात येणार आहेत. यासाठी 102 व 108 रुग्णवाहिकांचा वापर करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत ‘सेवा स्वच्छता पखवाडा’ घेण्यात येणार असून, यात सर्व शासकीय रुग्णालय येथे स्वच्छता मोहिम राबविण्यात येणार आहे. 2 ऑक्टोबरला जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये आयुष्यमान सभा आयोजित केल्या जाणार आहेत. या सभांत नागरिकांना आरोग्यविषयक सर्व योजनांची माहिती, आयुष्यमान गोल्डन कार्ड व आभा कार्ड याबद्दल माहिती देण्यात येणार असून, लाभार्थ्यांचे कार्ड काढण्यात येणार आहे.

17 सप्टेंबरपासून 18 वर्षे व त्यावरील सर्व नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात येणार असून, मोफत उपचार करण्यात येणार आहेत. यासोबतच 30 वर्षे वयावरील व्यक्तींची असंसर्गिक आजारांची तपासणी, उपचार व संदर्भ सेवा प्रत्येक गावामध्ये समुदाय आरोग्य अधिकारी व त्यांचे पथकामार्फत करण्यात येणार आहे.

- Advertisement -

मेळाव्यात रुग्णांना या आजारांवर घेता येणार उपचार

जिल्हा रूग्णालय नाशिक, सामान्य रूग्णालय नाशिक सह जिल्ह्यातील उपजिल्हा रूग्णालये आणि ग्रामीण रूग्णालयांत आयुष्यमान मेळावा हा 17 सप्टेंबर 2023 पासून दर शनिवारी होणार असून या साप्ताहिक मेळाव्यात प्रामुख्याने स्त्रीरोग, बालरोग, नेत्ररोग, कान, नाक व घसा, त्वचा रोग, मानसिक आजार, दंत शल्यचिकित्सक, टेलीकन्लटेशन सेवा ईत्यादी तज्ञ यांच्यामार्फत आरोग्य सेवा पुरविण्यात येणार आहेत.

विविध उपक्रमांचे आयोजन

17 ते 2 ऑक्टोंबर 2023 या कालावधीत आरोग्य संस्थांमध्ये स्वच्छता मोहीम, रक्तदान शिबिर, अवयवदानाचे आवाहन, असे कार्यक्रम होणार आहेत. 17 ते 31 डिसेंबर 2023 या कालावधीत वय वर्षे 18 वरील नागरिकांच्या आरोग्य तपासणी मोहिमचे आयोजन केले आहे. 1 ते 8 नोव्हेंबर 2023 आणि 25 ते 30 नोव्हेंबर 2023 या कालावधीत अंगणवाडी व प्राथमिक शाळांमधील 0 ते 18 वयोगटातील मुलांची तपासणी केली जाणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -