घरमहाराष्ट्रनाशिकज्ञानदीप गुरुकूल आश्रमातील मुलींच्या शोषणाप्रकरणी डीपीडीसी बैठकीत चर्चा

ज्ञानदीप गुरुकूल आश्रमातील मुलींच्या शोषणाप्रकरणी डीपीडीसी बैठकीत चर्चा

Subscribe

जिल्ह्यातील वसतिगृहांचे ऑडिट करण्याची लोकप्रतिनिधींची मागणी

नाशिक : म्हसरूळ येथील आधाराश्रमातील विद्यार्थिनींच्या लैंगिक शोषणाच्या घटनेचे पडसाद जिल्हा नियोजन समिती बैठकीत उमटले. महिला लोकप्रतिनिधींनी या घटनेचा निषेध नोंदवला. मूळात वसतिगृहे अधिकृत की अनधिकृत हेच पालकांना माहित नसते. तशी माहिती देणारी व्यवस्थाही उपलब्ध नसल्याचे सांगत लोकप्रतिनिधींनी या बैठकीत तीव्र नाराजी व्यक्त केली. अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी जिल्ह्यातील सर्व वसतिगृहांचे ऑडिट करा, अशी मागणीही त्यांनी केली. प्रत्येक तालुक्यात समिती गठीत करून वसतिगृहांची तपासणी सुरू आहे. आठवडाभरात निष्कर्ष पुढे येतील, अशी ग्वाही जिल्हाधिकार्‍यांनी दिली.

म्हसरूळ येथील ज्ञानदीप गुरुकुल आश्रमात सात विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण झाल्याचा धक्कादायक प्रकार गेल्या महिन्यात उघडकीस आला. सोमवारी (दि.१२) पालकमंत्री भुसे यांच्या अध्यक्षतेत झालेल्या बैठकीत या घटनेचे पडसाद उमटले. गुन्हा घडून गेल्यानंतर पोलीस त्यावर कारवाई करत आहेत. परंतु, जिल्ह्यात कोणते वसतिगृह अधिकृत व कोणते अनाधिकृत हे पालकांना माहितच नसल्याकडे आमदार फरांदे यांनी पालकमंत्र्यांसह उपस्थित अधिकार्‍यांचे लक्ष वेधले. अधिकृत व अनधिकृत वसतिगृहांची माहिती देणारी व्यवस्थाच उपलब्ध नसल्याबाबतही त्यांनी नाराजी व्यक्त केली.

- Advertisement -

विद्यार्थिंनींची सुरक्षितता अत्यंत महत्वाची असून, अधिकृत व अनधिकृत आश्रमशाळा, वसतिगृहांबाबत अधिकृत माहिती पुढे यासाठी यासाठी त्यांचे ऑडिट करा, अशी मागणीही फरांदेनी केली. पोलिस, महिला व बालकल्याण विभागाची एकत्रित बैठक घेऊन प्रत्येक तालुक्यात प्रांताधिकार्‍यांच्या सूचनेनुसार तहसीलदारांच्या अध्यक्षतेत पथक स्थापण्यात आले आहे. हे पथक प्रत्येक आश्रमशाळा, वसतिगृहाला भेट देत तपासणी करत आहे. त्यामुळे या पथकांचा प्रत्येक तालुक्यातील अहवाल आठवडाभरात प्राप्त होईल. अनाधिकृत आश्रमशाळांबाबतचा पुढील निर्णय घेतला जाईल अशी ग्वाही जिल्हाधिकारी गंगाथरन डी यांनी यावेळी दिली.

अंमली पदार्थांवरुन पोलीस यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह

अंमली पदार्थ विक्रेत्यांनी शहराला विळखा घातला असून, शालेय विद्यार्थी अंमली पदार्थांच्या आहारी जात आहेत. राजरोसपणे अशा पदार्थांची विक्री होत असतानाही पोलिसांना ही बाब माहित नसेल तर पोलीस करतात काय, असा संतप्त सवाल जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत उपस्थित करण्यात आला. शहरातील पान टपर्‍या, रिक्षांमधून अशा अंमली पदार्थांची विक्री सुरू आहे. विशिष्ट पध्दतीने टपरीवर टकटक केले की अंमली पदार्थ मिळतात. वडाळा परिसरात मध्यरात्री अंमली पदार्थांच्या धूराचे लोट दिसतात. हे लोकप्रतिनिधींना दिसते मग पोलिसांना का दिसत नाही, असा सवाल आमदार देवयानी फरांदे यांनी उपस्थित केला. आम्हाला माहिती द्या, आम्ही कारवाई करतो, असे पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी आवाहन करताच त्या संतप्त झाल्या. आम्ही माहिती दिल्यानंतर तुम्ही कारवाई करणार का? लोकप्रतिनिधींना माहित असते मग पोलिसांना का नाही, असा सवाल त्यांनी केला. तीन मुलांनी आत्महत्या केल्या. परंतु, त्या रेकॉर्डवर आल्या नसल्याचा आरोपही आमदार फरांदे यांनी केला. अंमलीपदार्थ विक्रीबाबत ११२ क्रमांकावर संपर्क साधून माहिती द्या, असे आवाहन नाईकनवरे यांनी केले.

- Advertisement -

 

प्रमोद उगलेhttps://www.mymahanagar.com/author/pramodu/
3 वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय.डिजिटल, प्रिंट मीडियाचा अनुभव. मनोरंजन, लाईफस्टाईल विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -