घरमहाराष्ट्रनाशिकदिवाळी झाली; आता महानगरपालिकेची अनधिकृत अतिक्रमणावर संक्रांत

दिवाळी झाली; आता महानगरपालिकेची अनधिकृत अतिक्रमणावर संक्रांत

Subscribe

नाशिक : शहरातील सर्वच मुख्य चौक, बाजारपेठा येथे मागील काही दिवसात अनधिकृत फेरीवाल्यांची समस्या मोठी वाढली आहे. गणपती, नवरात्र, दिवाळीच्या काळात अनधिकृत फेरीवाल्यांची संख्या लक्षणीय वाढली आहे. या अतिक्रमणामुळे वाहतुकीला मोठा त्रास होतोय, अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी होते तसेच हे अतिक्रमण अपघातांनाही कारणीभूत ठरत असल्याच्याही अनेक तक्रारी महानगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाला प्राप्त झाल्या आहेत. त्या अनुषंगाने महापालिका प्रशासनाने अनधिकृत फेरीवाल्यांच्या विरोधात धडक मोहीम हाती घेतली आहे. शहरात तब्बल पंधरा हजार अनधिकृत फेरीवाले असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

 महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने पहिल्या टप्प्यात नाशिक पूर्व व पश्चिम विभागात आजपासून माेहीम हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे. शहरात जवळपास १५ हजार अनधिकृत फेरीवाले असल्याचा अंदाज असून मंगळवार (दि. १) पासून रविवार कारंजा, मेनराेड, बाेहाेरपट्टी तसेच त्यानंतर इंदिरानगर भागात रथचक्र साेसायटी, साईनाथनगरसह अन्य भागांतील अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई केली जाणार आहे. अनधिकृत फेरीवाल्यांमुळे शहरातील रस्ते अरुंद बनले असून वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्याची प्रचिती गेल्या दाेन महिन्यांत अनेकवेळा आली. शहरातील प्रमुख बाजारपेठेतील रस्ते अरुंद असून येथून सिटी लिंकच्या बसेससह अवजड वाहने फेरीवाल्यांमुळे अडकून पडत आहेत. दुसरीकडे, फेरीवाल्यांकरीता राष्ट्रीय फेरीवाला धोरणांतर्गत हॉकर्स झोन्सची निर्मिती करून शहरातील फेरीवाल्यांची नोंदणी देखील करण्यात आली होती. त्यानुसार शहरातील सहाही विभागात तब्बल १० हजार ६१४ फेरीवाले अधिकृत असल्याचे आढळून आले होते. या फेरीवाल्यांचे हॉकर्स झोनमध्ये पूर्नवसनाची कार्यवाही प्रशासनामार्फत सुरू आहे.

- Advertisement -

मात्र, नोंदणीकृत नसलेल्या फेरीवाल्यांनी जागा बळकावल्याने तसेच अनेक ठिकाणी रस्त्यांवरच त्यांनी व्यावसाय सुरू केल्याने रस्त्यांवरील अनधिकृत फेरीवाल्यांच्या अतिक्रमणांचा प्रश्न गंभीर बनला आहे. ही बाब लक्षात घेत दिवाळीनंतर अनाधिकृत फेरीवाल्यांना हटवण्याची माेहीम हाती घेतली आहे.

गुन्हा दाखल होणार

महानगर पालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या वतीने अनधिकृत फेरीवाल्यांच्या विरोधात मोहीम राबवल्यानंतर पुन्हा काही दिवसात फेरीवाले पुन्हा त्याच जागी आपला व्यवसाय थाटतात. आणि परिस्थिती जैसेथे होते त्यातून अतिक्रमण निर्मूलन विभागाची कारवाई फार्स ठरत असल्याचे मागील कारवाई वेळी समोर आलेले आहे. ही बाब लक्षात घेता यावेळी पोलीस प्रशासनाची मदत घेतली जाणार आहे. अतिक्रमण निर्मूलनाची कारवाई केल्याच्या ठिकाणी पोलिसांकडून गस्त केली जाणार आहे. जर कारवाई केलेल्या ठिकाणी पुन्हा अनधिकृत फेरीवाले आढल्यास त्यांच्यावर गुन्हा दाखल केला जाणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -