घरमहाराष्ट्रनाशिक४ कोटी खर्चूनही पं. पलुस्कर नाट्यगृह बंदच; महापालिकेला मुहूर्त मिळेना

४ कोटी खर्चूनही पं. पलुस्कर नाट्यगृह बंदच; महापालिकेला मुहूर्त मिळेना

Subscribe

स्वप्निल येवले । पंचवटी

पंचवटीतील धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे प्रमुख केंद्र असलेल्या पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर सांस्कृतिक भवनाच्या सुशोभिकरणाच्या कामावर तीन वर्षांत तब्बल ४ कोटी रुपये खर्च होऊनही सभागृह खुले करण्यास महापालिकेला मुहूर्त सापडलेला नाही. काम पूर्ण झालेले असतानाही केवळ हस्तांतराच्या प्रक्रियेअभावी हे सभागृह बंद आहे. महापालिकेच्या स्मार्टसिटीने २ कोटी ३८ लाख रुपये खर्चाची निविदाप्रक्रिया २०१८ साली काढली होती. आतापर्यंत या सभागृहाच्या सुशोभीकरणावर ४ कोटींहून अधिक खर्च झाला आहे. मात्र, या नाट्यगृहाचा पडदा अद्याप न उघडल्याने नाट्यकलावंतांसह रसिकांमध्ये नाराजी पसरली आहे.

- Advertisement -

महापालिकेचे असलेले पंडित पलुस्कर सभागृह हे नूतनीकरणासाठी नाशिक स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कंपनीने २०१९ मध्ये काम दिले होते. या सभागृहाच्या नूतनीकरणासाठी स्मार्ट सिटीकडून जवळपास २ कोटी ३८ लाखांची निविदा काढण्यात आली होती. परंतु, नाट्यगृहाचे काम पूर्ण होईपर्यंत जवळपास ४ कोटी रुपयांपर्यंत खर्च केला गेला आहे.

गायक पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर यांच्या स्मरणार्थ २४ डिसेंबर १९९८ मध्ये हे नाट्यगृह पंचवटीतील इंद्रकुंड येथे बांधले गेले. सुरुवातीच्या काळात शहरातील अनेक सांस्कृतिक कार्यक्रम येथे झाले. नाशिकच्या या पुरातन ठेव्याला जपण्यासाठी २०१९ मध्ये स्मार्ट सिटीने या नाट्यगृहाचे रुपडे बदलण्याचे ठरवले आणि स्मार्ट सिटी कंपनीने या नाट्यगृहाच्या नूतनीकरणाला सुरुवात केली. मार्च २०२२ साली या नाट्यगृहाचे नूतनीकरणाचे काम पूर्ण झाले. स्मार्ट सिटी कंपनीने संपूर्ण नाट्यगृह हे वातानुकूलित केले. हरातील नाट्यकर्मी-रंगकर्मी, प्रतिनिधी व पालिका प्रशासन यांच्याशी केलेल्या चर्चेनुसार रंगमंच १ मीटरने मोठा करण्यात आला. तर, सभागृहातील पूर्वीच्या प्लास्टिकच्या खुर्च्यांची आसनव्यवस्था काढून तेथे कुशनच्या नवीन १६० खुर्च्या बसविण्यात आल्या. याशिवाय लाईट, ऑडिओ सिस्टिम अशा नवनवीन सुविधा कलाकारांसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या. सभागृहामागील बाजूला असलेल्या व्हीआयपी रूम्सचे नूतनीकरण करण्यात आले असून, त्यात मॉडर्न लाईट, मेकअप चेअर्स, सेंट्रलाईज एसी बसविण्यात आला आहे.

- Advertisement -

या व्यतिरिक्त नाट्यगृहाबाहेरील भागात ३०० किलोवॅटचे ट्रान्सफॉर्मर व २०० किलोवॅटचे डिझेल जनरेटर बसविण्यात आले आहे. नाट्यगृहाबाहेरही सुशोभीकरण करण्यात आले. त्यात विद्युतरोषणाई करण्यात आली, तसेच, लॉन्स टाकण्यात आले. सभागृहाबाजूच्या नाल्यावर पूर्वी स्लॅब असल्याने स्वच्छतेला अडचण येत होती. परंतु, नुतनीकरणाच्या कामांतर्गत या नाल्यावरील स्लॅब तोडून त्यातील गाळ काढण्यात आला व जवळपास दीड मीटर नाल्याची खोली वाढविण्यात आली. या नूतनीकरणात दिव्यांग व्यक्तींनाही कार्यक्रमांमध्ये सहभागी होता यावे यासाठी विशेष रॅम्पची व्यवस्था करण्यात आली आहे.

भाडे आकारणी करताना व्हावा विचार

नाट्यगृहाचे अव्वाच्या सव्वा भाडे आकारले गेल्यास नूतनीकरणासाठी खर्च केलेल्या पैशांएवढेदेखील उत्पन्न तेथून मिळणार नाही. नाट्यगृहाची १६० आसनक्षमता असल्याने भाडेआकारणीबद्दल विचार व्हावा. महापालिकेच्या अव्वाच्या सव्वा भाडेआकारणीमुळे कालिदास कलामंदिर, दादासाहेब गायकवाड सभागृह, कुसुमाग्रज स्मारक या नाट्यगृहांपेक्षा परशुराम साईखेडकर या खासगी नाट्यगृहाच्या अधिक तारखा बूक असतात.

महापालिकेकडून ताबा घेण्यास का होते दिरंगाई

स्मार्ट सिटी कंपनीकडून नाट्यगृह हस्तांतरणाबाबत पत्र देऊन जवळपास ४ ते ६ महिने लोटले आहे. मात्र, अद्यापही महापालिकेने नाट्यगृहाचा ताबा घेतलेला नाही. खरेतर आता महापालिकेला उत्पन्न वाढीसाठी ही एक चांगली संधी होती. कारण अनेक शाळा, खासगी क्लासेस यांचा वार्षिक स्नेहसंमेलने, उन्हाळी सुटीतील शिबिरे व कार्यक्रम या नाट्यगृहात झाले असते. त्यातून आपोआपच उत्पन्न मिळाले असते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -