घरमहाराष्ट्रनाशिकपाच दिवसांच्या गणरायासह तीन दिवस आलेल्या गौरींना हळव्या वातावरणात निरोप

पाच दिवसांच्या गणरायासह तीन दिवस आलेल्या गौरींना हळव्या वातावरणात निरोप

Subscribe

नाशिक : पाच दिवसांत लहानग्यांसह सर्वांच्याच कुटुंबाचा भाग बनलेल्या विघ्नहर्त्या गणरायाला शनिवारी (दि.५) पाचव्या दिवशी गणेशभक्तांनी अत्यंत हळव्या वातावरणात निरोप दिला. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या च्या घोषात बाप्पाचे विसर्जन करण्यात आले. यावेळी गणेशभक्तांनी पीओपी मूर्तीचे विसर्जन न करता त्या महापालिकेच्या मूर्तीदान केंद्रावर जमा केल्या. तर काही पर्यावरणीय संघटनांकडूनही मूर्ती संकलित करण्यात आल्या.

बहुतेकांच्या घरी बाप्पा १० दिवसांसाठी विराजमान होतात. मात्र, काही भाविकांकडे दीड, तर काहींकडे पाच दिवसांचा गणेशोत्सव साजरा केला जातो. नाशिकमध्ये पाच दिवसांच्या गणेशोत्सवाचे प्रमाण कमी आहे. शनिवारी दुपारनंतर गणेशभक्तांनी विसर्जनस्थळी आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला. शुक्रवारी (दि.२४) सायंकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे गोदापात्रात प्रवाहित झाले आहे. त्यामुळे विसर्जनादरम्यान कोणतीही अप्रिय घटना घडू नये, यासाठी जीवरक्षक तैनात करण्यात आले होते. तसेच, अनेक ठिकाणी कृत्रिम तलावही उपलब्ध करून देण्यात आले होते. यासोबतच निर्माल्यासाठीही वेगळी व्यवस्था करण्यात आली होती. भक्तांनी निर्माल्य नदीपात्रात न टाकता, निर्माल्यपात्रातच टाकावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले होते.

- Advertisement -

मूर्तीदानास अधिक पसंती

पीओपींच्या मूर्तींमुळे नद्यांसह तलाव, विहिरी, नैसर्गिक नाले यांची अपरिमित हानी होते, असे पर्यावरणप्रेमींचे मत असल्याने ते दरवर्षी शाडू मातीच्या मूर्तीच्या स्थापनेबरोबरच मूर्तीदानाचे आवाहन करतात. यंदाही महापालिकेसह सामाजिक संस्थांच्या मूर्ती दानाला मोठा प्रतिसाद मिळाला. गंगाघाटावर मूर्तींचे संकलन करण्यात आले.

गौराईला निरोप

गणपतीपाठोपाठ आलेल्या ज्येष्ठा-गौरींना शनिवारी भावपूर्ण निरोप देण्यात आला. मंगळवारी घरोघरी गणेश स्थापनेनंतर गुरूवारी ज्येष्ठा गौरींचे आगमन झाले होते. आनंद आणि समाधान देणार्‍या या सणामुळे घरोघरी उत्साहाचे वातावरण होते. गौरींच्या सजावटीबरोबरच सामाजिक आशय असलेले देखावे यंदा अनेक घरांमध्ये साकारण्यात आले होते. सायंकाळी महिलांच्या हळदी-कुंकवाचाही कार्यक्रम झाला. गौरींची खणानारळाने ओटी भरण्यात आली. तर सोमवारी गौरींना भक्तीभावाने निरोप देण्यात आला. शनिवारी सायंकाळी गौरींबरोबरच गणपती बाप्पाला निरोप देण्यात आला.

- Advertisement -

अनेकांनी घरीच केले विसर्जन

काही गणेशभक्तांनी आपल्या लाडक्या बाप्पाचे घरीच विजर्सन केले. यंदा अनेकांनी शाडूमातीच्या मूर्तीखरेदीला प्राधान्य दिले होते. अशातच या मूर्ती घरीच विसर्जित करण्यात आल्या. अनेक गणेशभक्तांनी घरीच भांड्यात फुलांच्या पाकळ्या टाकत विसर्जनाची व्यवस्था केली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -