स्टेट बँक कर्मचार्‍याकडूनच २.७ कोटींची फसवणूक

निफाड स्टेट बँक क्षेत्रीय प्रबंधक सुशील कुमार यांनी निफाड पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली

fraud
fraud

निफाड : येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या कर्मचार्‍याने अधिकृत गृह कर्ज सल्लागार आणि कर्जदार यांनी संगनमत करून खोटे दस्तावेज सादर करत बँकेची २ कोटी ७ लाख ४५ हजार १६४ रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार निफाड स्टेट बँक क्षेत्रीय प्रबंधक सुशील कुमार यांनी निफाड पोलिसांमध्ये शनिवार (दि. २) रोजी दाखल केली असल्याचे समजते.

याबाबत निफाड पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत गृहकर्ज सल्लागार व कर्जदार आरोपी हे एकमेकांचे नातेवाईक असून त्यांनी बँकेचे त्यावेळी नेमणुकीस असलेले समक्ष अधिकारी यांच्या संमतीने संगणमत करून बँकेकडे गृह कर्ज व शेती कर्ज घेणेबाबत लागणारे खोटे दस्तऐवज सादर करत कर्ज मंजूर करून घेऊन सदर कर्ज ज्या कारणासाठी घेतले ते त्यासाठी न वापरता पैशाचा अपहार केला असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

सक्षम अधिकारी व आरोपी यांच्या संगनमताने फिर्यादी नेमणुकीस असलेल्या बँकेतील व जनतेच्या पैशाची एकूण कर्ज रक्कम २ कोटी 16 लाख 97 हजार 760 मधील काही अल्प रकमेची परतफेड करून उर्वरित थकीत रक्कम २ कोटी ७ लाख 45 हजार 164 उपहार करून बँकेची फसवणूक केल्याबद्दल बँकेचे क्षेत्रीय प्रबंधक सुशील कुमार यांनी आरोपी सचिन बोडके, रा. पिंपळगाव निपाणी, प्रविण पडोळ, प्रशांत पडोळ, विजय साबळे, धनराज खाडे, सागर खाडे व त्यावेळी इतर नेमणुकीस असलेले स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा निफाडचे समक्ष अधिकारी यांचे विरुद्ध निफाड पोलिसांत फिर्याद दिल्याने स्टेट बँकेस गंडा घालणार्‍या आरोपींवर निफाड पोलिसांनी ठकबाजीचा गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती निफाड पोलिसांनी दिली. सदर गुन्ह्यातील आरोपी फरार असून कोणत्याही आरोपींना अटक करण्यात आलेली नाही. या गुन्ह्याचा अधिक तपास पो.उ.नि. अमोल पवार, पो.उ.नि. पटारे, खरात करत आहेत.