घरमहाराष्ट्रनाशिकनाशिककरांना दिलासा; गंगापूर धरण ६१ टक्के भरले

नाशिककरांना दिलासा; गंगापूर धरण ६१ टक्के भरले

Subscribe

गतवर्षीच्या तुलनेत १५ टक्के घट, दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे धरणाच्या पातळीत वाढ

जिल्ह्यात यंदाही पावसाचा लहरीपणा अनुभवयास मिळत असून प्रशासनाची चिंता वाढू लागली आहे. गेल्या तीन दिवसांपासून त्र्यंबकेश्वरसह परिसरात सुरू असलेल्या पावसामुळे गंगापूर धरणाच्या पाणीपातळीत वाढ होण्यास मदत झाली आहे. गंगापूर धरण परिसरात होत असलेल्या पावसामुळे गंगापूरचा जलसाठा ६१ टक्के इतका झाला आहे. मात्र, गतवर्षीच्या तुलनेत हा साठा १५ टक्क्यांनी कमी असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. गतवर्षी या दिवशी हा साठा ७६ टक्के इतका होता.

हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार जिल्ह्यातील अनेक भागांत पाऊस सुरू झाल्याने समाधान व्यक्त केले जात आहे. गेल्या तीन दिवसांपासून शहर, जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाल्याने शेतकरी वर्गाकडून समाधान व्यक्त केला जात आहे. गंगापूर धरणक्षेत्रात गेल्या चोवीस तासात तर पावसाची संततधार सुरू झाल्याने गंगापूर धरणाच्या पातळीत वाढ झाली आहे. इगतपुरीतही पावसाचे दरमदार आगमन झाले आहे. शुक्रवारी सकाळी ८ वाजेपर्यंत झालेल्या चोवीस तासात इगतपुरीत १०५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे, तर पेठ तालुक्याने इगतपुरीलाही मागे टाकले असून, येथे १०९ मिलीमीटर पाऊस झाला आहे. त्र्यंबकेश्वरला ६१ मिलीमीटर पाऊस बरसला. शहर, जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात काही प्रमाणात वाढ नक्कीच झाली आहे. गुरुवारपर्यंत ५६ टक्के असलेले गंगापूर धरण शुक्रवारी ६१ टक्के भरले होते, तर कश्यपी ३९, गौतमी ४१ आणि आळंदी धरणातील पाणीसाठा ५२ टक्के झाला आहे. दारणा धरण ८२ टक्के भरले आहे. दारणातून २५० क्युसेक वेगाने विसर्ग करण्यात येत आहे. नांदुरमध्यमेश्वर १०० टक्के भरले असून धरणातून १६१४ क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.

- Advertisement -

धरणांत ३० टक्के साठा

जिल्ह्यातील ७ मोठे आणि १७ मध्यम अशा २४ प्रकल्पांत १९ हजार ६२६ दशलक्ष घनफूट म्हणजेच ३० टक्के जलसाठा शिल्लक आहे. गतवर्षी हा साठा ५४ टक्क्यांवर होता. गतवर्षीच्या तुलनेत हा साठा २४ टक्क्यांनी कमी आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -