घरमहाराष्ट्रनाशिकलघू, मध्यम प्रकल्पातील गाळ काढण्यासाठी निधी द्या

लघू, मध्यम प्रकल्पातील गाळ काढण्यासाठी निधी द्या

Subscribe

माजी आमदार दीपिका चव्हाण यांची मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विरोधी पक्षनेत्यांकडे मागणी

सटाणा : कसमादेसाठी वरदान ठरणार्‍या चणकापूर, पुनंद, हरणबारी व केळझर येथील गोपाळसागर या धरणांसह सर्वच लघू-मध्यम प्रकल्पात गेल्या अनेक वर्षांपासून मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे. त्यामुळे पावसाळ्यात सर्व धरणे व प्रकल्प लवकर भरून मोठ्या प्रमाणावर पूरपाणी वाहून जाते. परिणामी, उन्हाळ्यात भीषण पाणीटंचाई निर्माण होऊन शेती सिंचनाचाही प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे राज्य शासनाने या सर्व धरणांसह लघू-मध्यम प्रकल्पातील गाळ काढण्यासाठी तात्काळ निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी बागलाणच्या माजी आमदार व राज्य महिला आयोगाच्या सदस्या दीपिका चव्हाण यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे.

कसमादेला वरदान ठरणार्‍या चणकापूर, पुनंद, हरणबारी व केळझर येथील गोपाळसागर या धरणांसह इतर लहान-मोठ्या लघू प्रकल्पांमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे. हा गाळ काढण्यासाठी शासनाने धोरणात्मक निर्णय घेतला आहे. विधानसभेमध्ये अनेक लोकप्रतिनिधींनी अनेकवेळा चर्चा घडवून आणली आहे. मात्र, याबाबत शासनाकडून अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही. याबाबत तातडीने अंमलबजावणी होणे गरजेची असून, संपूर्ण कसमादेसाठी जीवनदायिनी ठरणारे चणकापूर, पुनंद, हरणबारी व केळझर या धरणांसह इतर लहान-मोठ्या लघुप्रकल्पांमध्ये साचलेला मोठ्या प्रमाणातील गाळ काढला जावा तसेच त्यासाठी शासनाकडून लवकरात लवकर निधीही मिळणे अत्यावश्यक आहे.

- Advertisement -

गेल्या काही वर्षांपासून पावसाळ्यात धरणे लवकर भरली जातात. त्यामुळे लाखो क्युसेस पाणी डोळ्यासमोर वाहून जाते. हे पाणी पुढे समुद्राला जावून मिळत असल्यामुळे ते वाया जाते. नद्यानाल्यांना येणार्‍या पुरांमुळे वित्तहानी सहित जिवीतहानी होते. परिणामी, फेब्रुवारी व मार्च महिन्यातच अनेक ठिकाणी सिंचन व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनत आहे. त्याचा शेती उत्पादनावर मोठा फरक पडतो. तसेच टंचाई काळात पिण्याच्या पाण्यासाठी शासनाला मोठा खर्चही करावा लागतो. त्यामुळे कसमादेमधील चणकापूर, हरणबारी, पुनंद व केळझर या धरणांसह लघू, मध्यम प्रकल्पातील गाळ तात्काळा काढला जावा, त्यात प्राधान्याने कसमादेचा समावेश करावा, असे निवेदनात म्हटले आहे.

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -